मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-42-लिनक्स विषयी थोडेसे-2-अ--

Started by Atul Kaviraje, December 19, 2022, 10:09:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-42
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "लिनक्स विषयी थोडेसे"

                            लिनक्स विषयी थोडेसे-2--अ--
                           -------------------------

     लिनक्स वापरावे कारण, लिनक्स स्थापना करण्याची सी.डी. आपल्याला कोऱ्या सी.डी. पेक्षा थोड्या जास्त किमतीत (सुमारे २५ ते १०० रु.) उपलब्ध होऊ शकते. किंवा तुमच्या मित्राकडून मोफत मिळू शकते.

     लिनक्स वापरावे कारण ते वापरणे अवघड नाही फक्त थोडेसे वेगळे आहे.

     लिनक्स वापरावे कारण ढोबळ मानाने पहाता त्याला व्हायरसचा त्रास होऊ शकत नाही.

     लिनक्स वापरावे कारण ते महिनोन्महिने दिवस रात्र अविरत चालू शकते. ते स्थिर आहे. त्याच्या वरील प्रणाली सहजासहजी कोलमडून पडत नाहीत.

     लिनक्स वापरणे अधिक सुरक्षित आहे कारण ते पारदर्शी आहे. या प्रणालीचे सर्व अंतरंग सर्वांना पहाण्यासाठी खुले आहेत. त्यामुळे कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट करणारी प्रणाली त्यात लपवणे अवघड आहे. आपण माहितीच्या जालात विहार करताना आपला संगणक इतर संगणकांना जोडलेला असतो. अशा वेळी ज्या प्रणाली पारदर्शक नसतात त्या वापरकर्त्यासाठी धोकादायक ठरू शकतात. विशेषतः संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा व व्यक्ती, राष्ट्रीय संरक्षणाबाबतची गुपिते संभाळणारे संगणक, किंवा लहान मोठ्या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार अपारदर्शी प्रणाली वापरल्याने असुरक्षित असतात.

     लिनक्स वापरावे कारण या प्रणालीत होणाऱ्या सुधारणा तत्परतेने आणि सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचतात.

     लिनक्स वापरावे कारण जागतिक दर्जाच्या प्रणाली कशा लिहिल्या आहेत ते संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना समजू शकते. या विद्यार्थ्यांना विविध प्रणाली लिहिण्यासाठीची अवजारे ती प्रणाली प्रस्थापित करतानाच संगणकावर घेता येतात. ही अवजारे मुक्त आणि मुफ्त असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणताही वेगळा खर्च करावा लागत नाही (किंवा चोऱ्या कराव्या लागत नाहीत).

     संगणकाचा हा आत्मा असा जवळजवळ फुकट वाटणे कोणाला कसे परवडते हा प्रश्न अनेकांना पडू शकेल. जगभरातले लाखो संगणकतज्ञ आपापल्या (फारसे न आवडणारे काम असणाऱ्या) नोकऱ्या संभाळून घरी आल्यावर संगणकावर ही नवी निर्मिती करतात. त्यांचा पोटाचा प्रश्न सुटलेला असतो, पण निर्मितीचे वेड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी मुक्त आणि मुफ्त लिनक्सवर त्यांनी लिहिलेली प्रणाली अनेकांच्या उपयोगी पडू शकते. उपयुक्ततेत कणभरही कमी नसणारी ही प्रणाली, विकण्याची त्यांना इच्छा नसते किंवा तसली धडपड करण्याची त्यांची कुवत नसते वा त्यांना तेवढा वेळ नसतो. मग पडेल भावात कोणातरी बड्या दादाला (बिग ब्रदर) ती विकण्यापेक्षा लिनक्स मार्फत जगभरच्या लोकांनी ती वापरली यातच त्यांचा आनंद असतो.

(हा लेख उबंटू लिनक्स १०.०४ या लिनक्स प्रणालीचा आणि लिबर-ऑफिस या उपयुक्त प्रणालीचा वापर करून टंकलिखित केला आहे.)
-------------------------------------------------------------------------

--प्रसाद मेहेंदळे
(April 12, 2013)
------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.12.2022-सोमवार.