मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-42-लिनक्स विषयी थोडेसे-2-ब-

Started by Atul Kaviraje, December 19, 2022, 10:12:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-42
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "लिनक्स विषयी थोडेसे"

                             लिनक्स विषयी थोडेसे-2--ब--
                            -------------------------

     लिनक्सचे यश दडले आहे ते ज्या परवान्याखाली ते वितरित केले जाते त्या परवान्याच्या (लायसेन्स) रचनेत. हा परवाना (GNU-GPL) या नावाने प्रसिद्ध आहे. या परवान्यातील कळीचा शब्द आहे स्वातंत्र्य. ही कार्यकारी प्रणाली वापरण्याचे, कॉपी करण्याचे, इतरांना वाटण्याचे, ती वाचून त्यात योग्य ते बदल करून सुधारणा करण्याचे आणि ती विकण्याचेही स्वातंत्र्य. विविध संगणकतज्ञांनी इंटरनेटवर ठेवलेल्या त्यांच्या (GNU-GPL परवाना असणाऱ्या) मुक्त निर्मिती, विविध कंपन्या उतरवून घेतात. त्या एकत्र करतात आणि नंतर विकतात. मोठ्या कंपन्या त्यांच्या कडून या प्रणाली विकतही घेतात. कारण मोठ्या कंपन्यात काम करणाऱ्या लोकांचा वेळ वाचवण्यासाठी मोठ्या कंपन्या लिनक्स कंपन्यांकडून अडचणी सोडवण्याची सेवा मिळवतात. असे घडते कारण (GNU-GPL) परवाना कशाचीही सक्ती करत नाही .अगदी प्रणाली फुकट वाटण्याचीही.

     भारतीय संगणक तज्ञांचा यात काय सहभाग आहे ? काही सन्माननीय अपवाद वगळता अगदी थोडासाच. भारतीय बुद्धिमत्ता सेवा क्षेत्रात थोडीशी पुढे आहे पण नव्या उपयुक्त प्रणाली लिहिण्यात मात्र नाही हे मान्य करावेच लागेल. म्हणूनच कमी किंवा शून्य खर्चाची पण अतिशय ताकदवान लिनक्स वापरून नव्या उपयुक्त प्रणाली लिहिणे आणि नंतरच्या सेवा दिल्या बद्दल युरो किंवा डॉलर मिळवणे हा मार्ग नक्कीच श्रेयस्कर ठरेल.

     प्रणाली वापरण्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी लिनक्स कंपन्यांकडेच धाव घ्यावी लागते असेही नाही. जगभर चालू असणारे लिनक्स वापरणाऱ्यांचे गट (Linux User Groups) कोणाही लिनक्स वापरणाऱ्याला ही सेवा मोफत देतात. पुण्यात असा गट पुणे लिनक्स यूजर् ग्रुप (PLUG) या नावाने कार्यरत आहे. दोन हजार पेक्षा जास्त सदस्य असणारा हा गट लिनक्सचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण ना नफा या तत्वावर करीत असतो.

     तुम्ही जेव्हा लिनक्स वापरता किंवा दुसऱ्याच्या संगणकावर बसवता, तेव्हा तो दुसरा, तुमचे गिऱ्हाइक बनत नाही .मित्र बनतो. लिनक्स वापरल्याने बड्या दादाच्या खोडावरचे तुम्ही बांडगूळ बनत नाही ते सहजीवन असते. लिनक्स वापरून तुम्ही एकाच कंपनीला जगात सर्वशक्तिमान आणि एकाच व्यक्तीला सर्वात धनवान बनण्यापासून थोपवू शकता.

     उद्या येऊ घातलेल्या सर्वव्यापी संगणकविश्वात वसुधैवकुटुंबकम् हा मंत्र सांगणाऱ्या भारताला लिनक्स ही प्रणालीच सुयोग्य आणि श्रेयस्कर नाही काय?

(हा लेख उबंटू लिनक्स १०.०४ या लिनक्स प्रणालीचा आणि लिबर-ऑफिस या उपयुक्त प्रणालीचा वापर करून टंकलिखित केला आहे.)
-------------------------------------------------------------------------

--प्रसाद मेहेंदळे
(April 12, 2013)
------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.12.2022-सोमवार.