मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-45-चेतन ची शोकांतिका-1-

Started by Atul Kaviraje, December 22, 2022, 09:43:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-45
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "चेतन ची शोकांतिका"

                                चेतन ची शोकांतिका-1--
                               --------------------

     एखाद्या व्यक्तिचे विचार, त्याचे महात्म्य जगाला कळतच नाही. सॊक्रेटीसला त्याच्याच समाजातील विद्वान ओळखू शकले नाहीत, ज्ञानेश्वर आदी भावंडांचे मोठेपण तर त्यांच्या जन्मगावातील लोकांनाच कळले नाही. गांधींच्या लाखोंच्या संख्येने असणार्‍या भक्तांनासुद्धा गांधीजी कळलेच नाहीत (गांधींच्या शरीराचा खून नथूराम ने केला हे खरे असले तरी गांधींचा वैचारिक खून त्यांचे अनुयायी म्हणवणार्‍यांनीच केला, अन्यथा गांधींच्या तत्वाला हे तथाकथित अनुयायी जागले असते तर त्यांनी प्रतिक्रियेदाखल पुण्यात शेकडो ब्राह्मणांची घरे जाळलीच नसती).

     असो, कित्येकदा व्यक्तिचे मोठेपण जगाला, समाजाला, दूरच्या मंडळींना कळले नाही तर ते आपण समजू शकतो पण त्या व्यक्तिच्या अगदी जवळच्या मंडळींना, त्यांच्या कुटुंबीयांना समजले नाही तर आपणांस आश्चर्य वाटते.

     पण माझ्या आश्चर्याचा कडेलोट झाला जेव्हा माझ्या निदर्शनास आले की एक अतिशय महान कलाकृती बनविली गेली आणि काही काळाने तिचे मोठेपण तिचे रचनाकारच विसरून गेले. इतकेच नव्हे तर या कलाकृतीवर पुन्हा आपल्या क्षुद्रपणाचे कलम करून तिला सामान्यांहूनही खालच्या पातळीवर आणून बसविले. ही खरंच धक्कादायक गोष्ट आहे कारण कलाकृती ही निर्जीव तर तिचे निर्माते सजीव असल्याने ते नि:संशय त्या कलाकृतीहून उच्च पातळीवरच असले पाहिजे पण हे उदाहरण या संकल्पनेला अपवाद ठरते.

     १९८४ साली केरळच्या नवोदय स्टुडिओने निर्माता अप्पचन यांचा जिजो दिग्दर्शित माय डिअर कुट्टी चेतन हा मल्याळम भाषेतील चित्रपट हिंदीत छोटा चेतन या नावाने प्रदर्शित केला तेव्हा हा चित्रपट पाहण्याची मला अतिशय उत्सुकता निर्माण झाली कारण एकतर हा या दोन्ही भाषांमधीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलावाहिला थ्री-डी (थ्री डायमेन्शनल अर्थात त्रिमितीय) चित्रपट होता. दुसरे कारण माझ्यासाठी अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचे होते ते म्हणजे इतके हिंदी चित्रपट आतापर्यंत पाहण्यात आले असले तरी त्यापैकी कुठल्याच चित्रपटात नायकाचे नाव चेतन नव्हते. (खरे म्हणजे विनोदवीर असरानीने राजेश खन्नाच्या अजनबी चित्रपटात रंगविलेल्या गंभीर पात्राखेरीज त्यापूर्वीच्या इतर कुठल्याही चित्रपटात कुठल्याही पात्राचे नाव चेतन नव्हते). तेव्हा हा चित्रपट पाहणे हे माझ्या दृष्टीने अगदी 'मस्ट' होते. बरे चित्रपट खास लहान मुलांसाठीचा असल्याने बघायला 'सेफ' असणारच या विचाराने घरच्यांचीही काहीच आडकाठी नव्हती.

     तेव्हा आम्ही सहकुटुंब २४ किमी चा प्रवास करून पुण्यातील तेव्हाच्या अतिशय प्रसिद्ध अशा मंगला चित्रपटगृहापाशी आलो. दारावरच हाउसफुल्ल चा बोर्ड झळकत होता. काळ्याबाजारात चढ्या भावाने तिकीटे मिळत होती पण ती घ्यायला वडिलांचा सक्त विरोध होता. उलट त्या जास्तीच्या पैशात आपण छानपैकी हॊटेलात नाष्टा करू असे अमिष आम्हाला वडिलांनी दाखविले. मग तीनच्या ऐवजी सहाच्या खेळाची तिकीटे विकत घेण्यात आली आणि पुढच्या तीन तासांसाठी वडिलांनी आम्हाला पुणे फिरवून आणले. त्याकाळी आम्ही निगडीहून पुणे मनपापर्यंत पीएमटी बसने येत असू. तेथून पुढे पुणे शहरात फिरण्यासाठी बसची चैन आम्हाला परवडण्यासारखी नसल्याने शहरांतील पेठांमध्ये सहा - आठ किमी ची आमची भटकंती पायीच ठरलेली असे. आजच्या काळात सामान्य समजला जाणारा तीन आसनी रिक्षा किंवा वातानुकूलित खासगी चारचाकी वाहनांतून प्रवास या बाबी तर आमच्या मेंदुच्या विचारकक्षेच्या पलीकडच्या होत्या.

--चेतन सुभाष गुगळे
(April 3, 2013)
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.12.2022-गुरुवार.