मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-46-चेतन ची शोकांतिका-2-अ-

Started by Atul Kaviraje, December 23, 2022, 10:26:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-46
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "चेतन ची शोकांतिका"

                          चेतन ची शोकांतिका-2--अ--
                         ------------------------

     तेव्हा अशी भरपूर पायपीट केल्यावर एका बर्‍यापैकी हॊटेलात इडली, डोसा, वडा सांबार इत्यादी हादडून आम्ही पुन्हा सायंकाळी सहाच्या खेळाला चित्रपटगृहात हजर झालो तर तिथे पडद्यावर आमच्या स्वागताला अमिताभ बच्चन, जितेंद्र अशी मोठी कलावंत मंडळी दिसू लागली. हे माननीय चित्रपटात काम करणारे नसून चित्रपट बघण्यासाठी मिळणारा चष्मा वापरण्याच्या सूचना देण्याकरिता आले होते. त्यांच्या सांगण्याचा मुख्य सूर असा होता की चित्रपट ह्या चष्म्यामुळे थ्रीडी (अंगावर आल्यासारखा) दिसणार असला तरी ती केवळ चष्म्याची एकट्याची करामत नसून चित्रपटाच्या निर्मितीत देखील काही खास तंत्र वापरले गेले आहे. तेव्हा हा चष्मा लावून इतर कुठलाही चित्रपट किंवा टीवीवरील कार्यक्रम ३डी दिसू शकणार नाहीत. सबब प्रेक्षकांनी हे चष्मे चित्रपट संपल्यावर चित्रपटगृहात परत करावेत, ढापून (तरी अनेकांनी ते ढापलेच. बाय द वे, चष्म्याला ढापण हा शब्द तेव्हाच प्रचलित झाला की काय? हे बाय द वे नसून बाय द अवे म्हणजे विषयांतर झाले म्हणायचे. असो.) घरी नेऊ नये त्याचा त्यांना काहीच फायदा होणार नाही. साधारण दहा पंधरा मिनीटे हे व्याख्यान ऐकल्यावर एकदाचा चित्रपट सुरू झाला.

     एकतर आम्ही जो खेळ पाहायला आलो होतो, त्यानंतरचा खेळ पाहात होतो, शिवाय मधल्या तीन तासात बरीच दमणूक आणि खाणे झाले होते त्यामुळे माझा धाकटा भाऊ दमुन झोपी गेला, तर आईचे डोके प्रचंड दुखू लागल्याने तिचे चित्रपटात मन रमू शकले नाही. मी आणि वडिलांनीच चित्रपट लक्षपुर्वक बघितला (आमच्या दोघांचा ह्या बाबतीतला स्टॆमिना प्रचंडच आहे कारण चित्रपट संपल्यानंतर उशिरा घरी परतल्यावरही आम्ही दोघांनी रात्री ११:३० पर्यंत जागून पुन्हा टीवी देखील बघितल्याचे मला स्पष्ट आठवते). चित्रपटात ३डी दृश्ये केव्हा आहेत ते माझ्या वडिलांना कसे काय कोण जाणे पण अगोदरच समजत होते वाटते कारण ते मला तसे आधी सांगत आणि नंतर मला ती वस्तू (उदा. ज्वाला, खेळण्यातील हेलिकॊप्टर, तरंगणारी दारूची बाटली इत्यादी) अंगावर येताना दिसे. त्यावेळी माझ्या चिकित्सक बुद्धीने मी त्याचे कारण शोधून काढले ते असे की - चित्रपटगृहात लहानांना काळ्या फ्रेमचा तर मोठ्यांना हिरव्या फ्रेमचा असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे देण्यात आले होते. मोठ्यांच्या चष्म्यात बहुधा ३डी दृश्य अगोदर दिसत असावे. पण आता मला कळून चुकलेय की त्यांची चित्रपट बघण्याची कारकीर्द प्रदीर्घ असल्यानेच त्यांना पुढच्या दृश्यांचा अंदाज येत होता. असो, तर चित्रपट मला एकुणच प्रचंड आवडला. चेतन हा त्यातला नायक, त्यातील वाईट पात्रांची जबर फजिती करतो आणि त्यासोबत ३ डी दृश्यांच्या साहाय्याने प्रेक्षकांची पुरेपुर करमणूकही. पण त्यातील काही बाबी खटकल्या देखील. त्यातील पहिली म्हणजे चेतन पुर्ण चित्रपटात धोतर नेसून वावरतो (म्हणजे नुसतेच धोतर, वरती काहीच नाही - पुर्ण उघडाबंब). दुसरे म्हणजे तो एका जादुगाराला घाबरत असतो. चेतनने असे कपडे घालावे आणि मुख्य म्हणजे कुणाला सतत घाबरावे हे काही मला आवडले नाही आणि शिवाय माझ्या त्यावेळच्या आकलनशक्तीच्या मर्यादांमुळे मला हा चित्रपट पुर्णत: समजलाच नाही.

     पुढे काही वर्षांतच हा चित्रपट एका दुपारी टीवीवर झळकला तेव्हा शाळेतील माझ्या सहाध्यायींनी वर्गातले तास बुडवून चित्रपटाकरिता शाळेतून घरी पळ काढला. मला मात्र आता पुन्हा चित्रपट पाहण्यात रस नव्हता. कारण हा चित्रपट आमच्या टीवीवर ३डी स्वरूपात दिसणार नव्हता. त्यावेळच्या माझ्या माहितीनुसार असा चित्रपट फक्त निकी-ताशा ह्या राज कपूर यांच्या कन्येने बनविलेल्या टीवीवरच ३डी स्वरूपात दिसू शकणार होता. आम्ही तेव्हा नुकताच वीडीओकॊनचा रंगीत टीवी आठ हजार रूपयांना विकत घेतला होता तर निकी-ताशा ची त्यावेळची किंमत वीस हजार रूपये होती. त्याचप्रमाणे चित्रपट बनल्यावर जर तो काही वर्षांतच टीवीवर दाखवला गेला तर तो एक अयशस्वी चित्रपट समजला जात असे (पण छोटा चेतन बाबत खरी हकीगत [जी मला नंतर कळली] अशी होती की तो सीएफएसआय - चिल्ड्रेन फिल्म सोसायटी ऒफ ईंडियाने विकत घेऊन खास बालदिनाच्या निमित्ताने दूरदर्शनवरून प्रसारित केला होता).

--चेतन सुभाष गुगळे
(April 3, 2013)
------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.12.2022-शुक्रवार.