मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-48-ओज-शंकराची कहाणी-

Started by Atul Kaviraje, December 25, 2022, 09:33:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-48
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ओज-शंकराची कहाणी"

                                 ओज-शंकराची कहाणी--
                                ---------------------

     श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.

     भैयाजींचे प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि माध्यमिक शिक्षण सातार्‍यात झाले. ते १९४० साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. १९४२ ते १९४४ अशी दोन वर्षे त्यांनी इंडियन एअर फोर्समध्ये ग्राऊंड इंजिनिअरिंग कोर्प्समध्ये, लाहोर, कोलकाता व सिकंदराबाद येथे नोकरी केली. १९४४ साली नोकरी सोडून त्यांनी पुण्यात सरदार परशुरामभाऊ महाविद्यालयात नाव नोंदवले. १९४६ साली ते संस्कृत विषय घेऊन, विशेष प्राविण्यासह बी.ए. झाले. पुढे बी.एड. आणि एल.एल.बी.ही झाले.

     १९४८ साली संघावर बंदी आली होती तेव्हा भैयाजी सहा महिने तुरूंगात गेले. १९५० मध्ये ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. १९५८ पर्यंत एकूण आठ वर्षे मंगलोर, गुलबर्गा, रायचूर ह्या भागात प्रचारक राहिले. ते कुशल संघटक होते. उत्साही प्रशिक्षक होते आणि निष्ठावान स्वयंसेवक होते. उंच, गोरेपान, प्रसन्न व्यक्तीमत्त्वाचे भैयाजी जिथे जिथे गेले, तिथले लोक त्यांची आजही आठवण काढतात.

     १९५८ ते १९७१ भैयाजींनी, सिन्नर (नासिक), चिंचणी (ठाणे), जशपुरनगर (छत्तीसगड), वसई, निर्मळ, भुईगाव, कळंब, वाघोली (ठाणे), कोंढ्ये (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) इत्यादी निरनिराळ्या गावांत शिक्षकाची नोकरी करून उपजीविका चालवली. स्वतःचे पायावर उभे राहून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. ते उत्तम मल्लखांबपटू, प्रशिक्षक आणि प्रणेते होते. संस्कृत साहित्याचा अपार अभ्यास आणि अनेकविध स्तोत्रांचे अफाट पाठांतर असल्याने त्यांना व्यक्तीस वश करून घेण्याची कला सुरेख साधलेली होती. आदर्श शिक्षकाचा जणू ते वस्तुपाठच होते. ह्या सार्या कौशल्याचा त्यांना संघकार्यात भरपूर उपयोग होत असे.

     १९७१ सालच्या जून महिन्यात, कोढ्ये येथील नोकरी सोडून ते जाणीवपूर्वक पूर्वांचलात गेले. प्रथम इंफाळमधील पंजाबी हायस्कूलमध्ये नोकरी केली. मग १९७३ च्या जूनमध्ये ते कोंढ्याच्या जयवंत कोंडविलकर ह्या बारा वर्षे वयाच्या, सातवीत शिकणार्या मुलासह, मणिपूर राज्यातील, उख्रूल जिल्ह्यातील, न्यू तुसॉम गावात एका ख्रिश्चन-उच्च-माध्यमिक-शाळेत नोकरी करू लागले. हे त्यांच्या शिक्षणाद्वारे-राष्ट्रीय-एकात्मता साधण्याच्या ध्येयास अनुसरूनच केलेले होते. उत्तम शिक्षण आणि बहिःशाल कार्यक्रमांद्वारे ते प्रथम विद्यार्थीप्रिय झाले आणि पुढे पालकांच्याही पसंतीस उतरले. मराठी, कानडी, हिंदी, इंग्रजी,संस्कृत, मैतेयी भाषांवर त्यांची उत्तम पकड असल्याने लोकांना समजून घेऊ शकले. त्यांच्याशी सुसंवाद करू शकले. शिवाय, प्रेमळ, आर्जवी, आनंदी आणि उत्साही स्वभावामुळे ते लोकांच्या मनांत प्रवेश करू शकले. शाळेचे व्यवस्थापन ख्रिश्चन मिशनर्‍यांचे असून आणि भैयाजी स्वतः हिंदू असूनही, त्यांना वसतीगृहाचे पर्यवेक्षक नेमले गेले. पूर्ण वेळ मुलांसोबत राहून, पहाटेपासून मुलांना एकात्मतेची जाण दिली. भारतीयत्वाची जाण दिली. शारीरिक शिक्षण दिले. त्यांना मल्लखांब, निरनिराळे खेळ शिकवले. भारतीय भूप्रदेशांची, संस्कृतीची आणि प्रातस्मरणीय व्यक्तीत्वांची सम्यक ओळख करून दिली. आजारपणांत पालकांप्रमाणे शुश्रुषा केली. त्यामुळे ख्रिश्चनबहुल समुदायात त्यांचे अल्पावधीतच स्नेहबंध निर्माण झाले.

--नरेंद्र गोळे
(April 3, 2013)
-----------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2022-रविवार.