मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-54-सुरकोटला अश्व-भाग- 3-

Started by Atul Kaviraje, December 31, 2022, 09:57:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                   लेख क्रमांक-54
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुरकोटला अश्व-भाग 3"

                               सुरकोटला अश्व-भाग -3--
                              ---------------------

     या अभ्यासात आणखी एका गूढाचा उलगडा करता आला आहे असे हा अहवाल म्हणतो. ते गूढ म्हणजे सरस्वती नदी अदृष्य होण्यामागचे कारण. सरस्वती नदी म्हणजे सध्याची घग्गर नदी असेही हा अहवाल म्हणतो. घग्गर-हाकरा नदीच्या खोर्‍यात, हडप्पा कालात अतिशय दाट स्वरूपात वस्ती असल्याचे पुरावे या भागात केलेल्या उत्खननात आढळून आलेले आहेत. नदीच्या काठावर असलेले गाळाचे थर व नदी खोर्‍यातील भूपृष्ठभाग रचना या स्वरूपाच्या व या अभ्यासातून प्राप्त झालेल्या भूशास्त्रीय पुराव्याप्रमाणे या नदीचे पात्र खरोखरच विशाल व मुबलक पाणी असलेले होते असे दिसते. परंतु या कालात सुद्धा या नदीला असलेले मुबलक पाणी हे सध्याप्रमाणेच पण केवळ त्या काळात पडणार्‍या सशक्त मॉन्सूनच्या पावसामुळेच होते. या नदीला हडप्पा कालात सुद्धा हिमालयातून पाणी उपलब्ध होत नव्हते. त्याचप्रमाणे या नदीच्या जवळून वाहणार्‍या सतलज किंवा यमुना नद्यांमध्ये जे पाणी हिमालयातून येत होते ते या नदीच्या पात्रात वहात आल्याचा काहीच पुरावा मिळत नाही. या नदीला बारमाही पाणी असले तरी ते त्या काळातील सशक्त मॉन्सूनचेच होते.

     मात्र काही भारतीय शास्त्रज्ञ हा दृष्टीकोन अमान्य करतात त्यांच्या मताने सरस्वती नदीला मॉन्सूनच्या पावसाशिवाय, यमुना व सतलज या नद्यांचे पाणीही येऊन या काळात मिळत असे. मात्र पुढे भूगर्भातील हालचालींमुळे हे पाणी सरस्वती नदीत येऊन मिळणे बंद झाले झाले. वार्‍यामुळे सतत उडणार्‍या धुळीने हे कोरडे पात्र हळूहळू भरत गेले व सरस्वती नदी अदृष्य झाली. (शंकरन ए व्ही, 1999; रॉय व जाखर, 2001) अर्थात यापैकी कोणतीही कारण मीमांसा मान्य केली तरी अमाप पाणी कच्छ्च्या रणात वाहून नेणारी ही विशाल नदी याच सुमारास मृत झाली याच निष्कर्षाप्रत आपण शेवटी येतो.

     सिंधू सरस्वती संस्कृतीमधील दक्षिणेला असलेल्या धोलाविरा सारख्या महानगरांवर मॉन्सूनच्या पावसाच्या कमी होत चाललेल्या प्रमाणाचा थोडाफार परिणाम झाला असला तरी त्यांच्यावर मुख्य आघात सरस्वती नदी लुप्त होण्याचा झाला असे मला वाटते. कच्छ्च्या रणात भरले जाणारे सरस्वती नदीचे पाणी कमी होत गेल्याने तेथून होणारी जहाजांची ये जा बंद झाली व येथून मेसापोटेमिया आणि उत्तरेला असलेल्या कालीबंगा यासारख्या शहरांकडे सरस्वती नदीमधून होणारी मालवाहतूक संपुष्टातच आली. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या शोधाप्रमाणे याच सुमारास एक जबरदस्त भूकंप कच्छ मध्ये झाला व रणाचा सर्व भूगोलच बदलून गेला. एकेकाळी अत्यंत सुपीक असलेला हा भाग आता वाळवंटाचा आणि दलदलीचा प्रदेश बनला. जिओसान यांच्या अहवालाप्रमाणे या भागातील रहिवासी हळूहळू, जेथे वास्तव्य करण्यास जास्त अनुकूल परिस्थिती होती त्या दक्षिणेकडे (गुजरात व महाराष्ट्र) आणि पूर्वेला (राजस्थान) कडे सरकू लागले.

     काही शास्त्रज्ञांच्या मताने, सरस्वती नदी, कच्छच्या रणात सध्याच्या पाकिस्तान मधील बादिन शहराजवळ आपले पाणी आणून टाकत असे. हे पाणी व या नदीच्या थोड्या पश्चिमेला असलेल्या सिंधू नदीच्या प्रवाहाचे पाणी हे 'कोरी' नदीच्या खाडीमधून अरबी समुद्राला मिळत असावे. हे असे जर असले तर कच्छच्या रणाच्या जागी त्या वेळेस केवढा मोठा जलाशय अस्तित्वात असला पाहिजे व त्याच्या काठावर असलेल्या धोलाविरा किंवा सुरकोटला सारख्या वसाहती केवढ्या समृद्ध असल्या पाहिजेत याची सहज कल्पना करता येते.

     2 वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथे असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देण्याचा मला योग आला होता. या संग्रहालयात सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील शहरे व वसाहती जेथे होती, त्या स्थांनावर उत्खनन केल्यानंतर मिळालेल्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. यापैकी बैलगाडीचा आराखडा, स्वैपाकघरातील भांडी, पाटा-वरवंटा, मुलांची खेळणी या सारख्या अनेक वस्तूंचे साम्य अगदी 50 वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय समाजात नित्य वापरात असलेल्या वस्तूंशी कमालीच्या प्रमाणात जुळते आहे हे बघून मला सिंधू-सरस्वती संस्कृतीचे नाते भारतीय समाजाशी अजूनही जुळलेले आहे याची खात्री पटली होती.

     भारतीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संचालक, श्री. ब्रज बासी लाल यांनी 2002या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात NCERT या संस्थेच्या विद्यमाने भोपाळ येथे दिलेल्या एका भाषणात हडप्पा संस्कृतीबद्दल आणि ही संस्कृती व सध्याची भारतीय संस्कृती यातील साम्यस्थळे या बद्दल मोठे मार्मिक विवेचन केले होते. त्या भाषणातील काही भाग मी खाली देत आहे.

     " भारतीय संस्कृतीच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी त्यावर उमटलेला हडप्पा संस्कृतीचा प्रभाव अजूनही स्पष्टपणे दिसून येतो. या प्रभावाची काही उदाहरणे म्हणून शेती, स्वैपाक, वैयक्तिक प्रसाधन, अलंकार, मुलांची खेळणी, मोठ्यांचे बैठे खेळ, नदी किंवा रस्ता मार्गे होणारे दळणवळण, लोककथा, धार्मिक विचार आणि आचार यांचा उल्लेख करता येईल. या प्रभावाची काही प्रत्यक्ष उदाहरणे मी (श्री.लाल) खाली देत आहे.

--क्रमशः--

--चंद्रशेखर
----------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.12.2022-शनिवार.