मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-60-ट्रोजन युद्ध भाग २.२-

Started by Atul Kaviraje, January 06, 2023, 09:43:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-60
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ट्रोजन युद्ध भाग २.२"

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.
--------------------------------------------------------------------------

     विविध ट्रोजन व ग्रीकांचा पराक्रम-ग्रीकांच्या रेट्याने ट्रोजन घाबरतात

     थोरला आणि धाकटा अजॅक्स, ओडीसिअस आणि डायोमीड हे युद्धाचे नेतृत्व करीत होते. ट्रोजन हल्ल्यापुढे त्यांनी आपली फळी भक्कमपणे टिकवून धरली. इकडे अ‍ॅगॅमेम्नॉन "भले शाब्बास!" करत फिरत होता. त्याने एनिअसचा मित्र देइकून याची ढाल भेदून, त्याला मारून आपल्या भालाफेकीची चुणूक पुन्हा एकदा दाखवली. एनिअसनेही क्रेथॉन आणि ऑर्सिलोखस या दोघा ग्रीकांना ठार मारून आपल्या बळाचे दर्शन घडवले. त्यांची शरीरे लुटीसाठी ट्रोजन सैनिक ओढून नेतील म्हणून त्यांपासून संरक्षणासाठी खुद्द मेनेलॉस ग्राउंडात उतरला. एकट्या राजाला अपाय होऊ नये म्हणून नेस्टॉरचा मुलगा अँटिलोखसदेखील त्याच्याबरोबर आला. दोघांना एकत्र पाहून एनिअस मागे हटला. त्या दोघांनी नंतर पिलामेनेउस नामक ट्रोजन योद्ध्याला आणि त्याच्या सारथ्याला मारून त्याचे घोडे ग्रीक कँपकडे वळवले. पण असे करत असताना हेक्टरचे लक्ष तिकडे गेले. एक मोठी गर्जना करून तो त्यांच्या पाठलागावर आला. ते पाहून डायोमीडच्या अ‍ॅड्रिनॅलिनचा पारा अजूनच वर चढला. हेक्टरने मेनेस्थेस आणि अँखिआलस या दोघा ग्रीकांना मारले, तर थोरल्या अजॅक्सने अँफिअस या ट्रोजनाला मारले. त्याचे चिलखत ताब्यात घेऊ पाहताना ट्रोजनांनी भाल्यांचा असा मारा केला, की अजॅक्सला तिथून हटणे भाग पडले.

     प्रख्यात ट्रोजन वीर सार्पेडन याने त्लेपोलेमस या ग्रीकाला भाला फेकून मारले खरे, पण त्याच्या भाल्याने तोही जखमी झाला तेव्हा त्याला युद्धभूमीवरून हटणे भाग पडले. इकडे ओडीसिअसनेही कोएरॅनस, अलास्टर, क्रोमियस, अल्कॅन्द्रस, हॅलियस, नोएमॉन आणि प्रिटॅनिस या ट्रोजनांना मारून हात लाल करून घेतले. तो अजून कुणाला मारणार एवढ्यात हेक्टरचे लक्ष तिथे गेले. पाठोपाठ हेक्टरनेही ट्यूथ्रस, प्रसिद्ध सारथी ओरेस्टेस (अ‍ॅगॅमेम्नॉनच्या मुलाचेही नाव हेच होते पण हा वेगळा) त्रेखस, ओएनोमॉस,हेलेनस आणि ओरेस्बियस या ग्रीकांना ठार मारले.

     आता हेक्टर इतका भारी का? तर होमरभाईंच्या म्हण्ण्याप्रमाणे मार्सदेव बरोबर होता म्हणून. पण मिनर्व्हाच्या चिथावणीने डायोमीडने चक्क मार्सलाही भाल्याने जखमी केले!

     नंतर थोरल्या अजॅक्सने एकट्याने ट्रोजनांची एक फॅलँक्स तोडून टाकली आणि ट्रोजनसाथी थ्रेशियन लोकांचा राजा अकॅमस यावर जोराने भाला फेकला, तो हेल्मेट फोडून कपाळातून मेंदूपर्यंत आरपार जाऊन अकॅमस गतप्राण झाला. पाठोपाठ डायोमीडने अ‍ॅक्सिलस आणि त्याचा सारथी कॅलेसियस या दोघांना यमसदनी धाडले. नंतर युरिआलस या डायोमीडच्या साथीदाराने ड्रेसस आणि ऑफेल्टियस या दोघा ट्रोजन वीरांना मारले.पुढे पॉलिपोएतेस या ग्रीकाने अ‍ॅस्टिआलस या ट्रोजनाला मारले. इकडे ओडीसिअसने पिदितेस तर (थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ आणि मजा म्हंजे आईकडून हेक्टर अन पॅरिस यांचाही नातलग असणारा) ट्यूसरने आरेताऑन या ट्रोजनांना मारले. नेस्टॉरपुत्र अँटिलोखसच्या भाल्याने आब्लेरुस तर अ‍ॅगॅमेम्नॉनद्वारे एलातुस हे ट्रोजन योद्धे मृत्युमुखी पडले. अशीच चहूबाजूंना लढाई चालली होती. कधी ग्रीक तर कधी ट्रोजन पुढे सरकत होते. बह्वंशी ग्रीकांची सरशी होत होती, पण ट्रोजनही चिवट होते. मेनेलॉसनेही अ‍ॅड्रेस्टस नामक ट्रोजन योद्ध्याला तो सुटकेच्या बदल्यात पैशाचे आमिष दाखवत असतानाही अ‍ॅगॅमेम्नॉनच्या सांगण्यावरून ठार मारले. "नो प्रिझनर्स" हा मंत्र बुढ्ढोजी नेस्टॉरनेही सांगितल्यावर मग ग्रीक अजूनच चेकाळले. लढता लढता डायोमीड आणि ग्लॉकस नामक ट्रोजन हे समोरासमोर आले. कोण-कुठला असे विचारल्यावर दुरून ओळख लागली, मग हाय-हॅलो करून दोघांनी न लढता एकमेकांना भेटी देऊन निरोप घेतला.

     इकडे ट्रोजनांची अवस्था बिकट झाली होती. हेक्टरचा भाऊ हेलेनस याने हेक्टर व एनिअसला ट्रॉय शहरात जाऊन सर्व बायकांना देवाची प्रार्थना करायला सांगण्याची विनंती केली. त्याबरहुकूम हेक्टर आत गेला. आपली आई हेक्युबा हिला त्याने प्रार्थनेविषयी सांगितले-ती आणि इतर बाया कामाला लागल्या. तसेच बायको-पोराला भेटून तो पॅरिसकडे गेला. दोघे भाऊ तयार होऊन युद्धासाठी निघाले.

(क्रमशः)--
--------
(March 20, 2013)
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.01.2023-शुक्रवार.