मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-61-ट्रोजन युद्ध भाग २.२

Started by Atul Kaviraje, January 07, 2023, 09:58:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-61
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ट्रोजन युद्ध भाग २.२"

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.
--------------------------------------------------------------------------

                हेक्टर आणि थोरल्या अजॅक्सचे द्वंद्वयुद्ध

     हेक्टर-पॅरिस हे बंधुद्वय ट्रॉयच्या गेटातून बाहेर आले आणि त्यांनी कापाकापी सुरू केली. हेक्टरने इओनेउस तर पॅरिसने मेनेस्थियस या ग्रीकांना भाले फेकून मारले. आता हेक्टरबंधू हेलेनसच्या मनात काय आले कुणास ठाऊक? तो शकुन वैग्रे जाणणारा होता. त्याने शकुनबिकुन पाहून हेक्टरला सांगितले की आजचा दिवस भाग्याचा आहे. ग्रीकांपैकी कुणालाही वन-ऑन-वन लढाईसाठी चॅलेंज कर, तू नक्की जिंकशील. मग हेक्टरने वरडून च्यालेंज दिले, "आहे का कोणी माईचा लाल"? म्हणून. पण ग्रीक गप्पच बसले. ते पाहून रागाने लाल झालेल्या मेनेलॉसने थू: तुमच्या जिनगानीवर असे म्हणून स्वतः उठून उभा राहिला. पण चतुर अ‍ॅगॅमेम्नॉनने "भावा, लैच तापायलाइस, पण हेक्टरचा नाद नको करू उगी, मरशील फुकट" असे म्हणून त्याला दाबले. थोडावेळ मग ग्रीकांत चलबिचल झाली. ते पाहून यवनभीष्म नेस्टॉरचे पित्त खवळले आणि त्याने त्यांच्या भ्याडपणाबद्दल त्यांना आपण तरुण असतो तर कसे लढलो असतो वगैरे चार शब्द सुनावले. ते ऐकून ९ लोक तडकाफडकी उठून उभे राहिले: खुद्द अ‍ॅगॅमेम्नॉन, तरणाबांड डायोमीड, थोरला आणि धाकटा अजॅक्स, क्रीटाधिपती इडोमेनिअस, त्याचा साथीदार मेरिऑनेस,युरिपिलस, थोआस आणि शेवटी ओडीसिअस हे नऊ जण एकदम उभे राहिले. तेव्हा मग फासे टाकून निर्णय घ्यावा असे ठरले. प्रत्येकाने आपापले चिन्ह अ‍ॅगॅमेम्नॉनच्या हेल्मेटमध्ये टाकले. नेस्टॉरने त्यातून रँडमली एक चिन्ह बाहेर काढले - ते होते थोरल्या अजॅक्सचे. आता हेक्टर विरुद्ध थोरला अजॅक्स अशी घमासान फाईट होणार होती. समस्त ग्रीक आणि ट्रोजन योद्धे जवळ येऊन पाहू लागले काय होते ते.

     बैलांच्या कातड्याची सात आवरणे एकावर एक चढवून शेवटचा आठवा थर ब्राँझचा लावलेली अशी मोठ्ठी जाड आयताकृती ढाल आणि भाला घेऊन थोरला भीमकाय अजॅक्स हेक्टरजवळ आला आणि त्याला पाहून क्षणभर हेक्टरलाही धस्स झाले. टिपिकल वीरश्रीयुक्त बोलाचाली झाल्यावर लढाईला तोंड फुटले. सर्वप्रथम हेक्टरने अजॅक्सवर भाला फेकला. त्याच्या ढालीचे ६ थर भेदून ७ व्या थरात तो अडकला. प्रत्त्युत्तर म्हणून अजॅक्सनेही एक भाला हेक्टरवर फेकला. तोही हेक्टरची ढाल भेदून त्याच्या चिलखताला स्पर्श करून हेक्टरला इजा करू शकला असता, पण हेक्टरने वेळीच बाजूला होऊन आपले प्राण वाचवले. नंतर दोघांनीही आपापल्या ढालीत अडकलेले भाले काढून फेकून दिले आणि एकमेकांवर तुटून पडले. हेक्टरने अजॅक्सच्या ढालीवर एकदम मध्यभागी नेम धरून एक छोटासा भाला फेकला, पण ढालीच्या ब्राँझला काही तो भेदू शकला नाही. भाल्याचे टोक मात्र वाकडे झाले. मग अजॅक्सने हेक्टरच्या ढालीच्या आरपार भाला मारला. हेक्टरच्या मानेला लागून तिथून रक्त वाहू लागले, पण हेक्टर मोठा बहाद्दर. लढणे सोडले नाही. जरा मागे होऊन त्याने हातात एक मोठा दगड घेतला आणि अजॅक्सच्या ढालीवर पुन्हा एकदा जोराने आपटला, पण ढाल काही तुटली नाही, ब्राँझचा मोठा आवाज मात्र झाला. आता दगड का जवाब बडे धोंडे से या न्यायाने सांड अजॅक्सने एक अजूनच मोठा दगड हातात घेऊन सरळ हेक्टरवर फेकला. हेक्टरने तो ढालीवर थोपवला खरा, पण त्यात त्याची ढालच मोडून पडली आणि दगडाच्या वजनाने तो खाली पडला. यानंतरही त्यांनी तलवारींनी एकमेकांचे शिरकाण नक्कीच केले असते, पण दोन्ही बाजूंच्या लोकांनी त्यांना थोपवले.हेक्टरने अजॅक्सच्या युद्धकौशल्याची स्तुती केली आणि त्याला एक चांदीच्या मुठीची तलवार दिली. बदल्यात अजॅक्सने त्याला जांभळ्या रंगाचे एक गर्डल दिले.

               ग्रीकांना हेलेन ऐवजी फक्त खजिना परत देण्याची ऑफर

     यानंतर ग्रीकांची एक सभा भरली. नेस्टॉरने एक सूचना मांडली की ग्रीकांनी आपल्या जहाजांभोवती एक संरक्षक भिंत उभारावी. ती मान्य होऊन कार्यवाहीला लगेच सुरुवात झाली. इकडे ट्रोजनांचीही एक खडाजंगी सभा भरली. अँटेनॉर नामक ट्रोजन वीर म्हणाला, की आता लै झालं. लै लोक मेलेत. त्या हेलेनला आणि तिच्याबरोबर जो खजिना आला त्याला गप गुमानं त्या मेनेलॉसला देऊन टाका. कशापायी अजून ट्रोजनांना मारायचं? हे ऐकून पॅरिस खवळला-जे साहजिक होते. त्याने खजिना परत द्यायची तयारी दर्शवली, पण हेलेन काही परत देणार नाही यावर तो ठाम होता. शेवटी खजिना परत देण्याची ऑफर घेऊन ग्रीक कँपपाशी इदाएउस नामक ट्रोजन दूत आला. ती ऑफर ऐकून डायोमीडने कठोर शब्दांत त्याचे वाभाडे काढले. अ‍ॅगॅमेम्नॉनने ट्रोजनांनी आपले मृत लोक परत घेऊन त्यांचे दहन करेस्तोवर युद्ध न करण्याला तेवढी संमती दिली आणि ट्रोजन लोक दहनविधीच्या कामाला लागले. ग्रीकही आपले मृत लोक एकामागोमाग एक दहन करू लागले. हळूहळू ग्रीकांनी संरक्षक भिंतही उभी केली.भिंत उभी करणे अन मृतांचे दहन करणे यात रात्र निघून गेली.

(क्रमशः)--
--------
(March 20, 2013)
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.01.2023-शनिवार.