मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-61-ट्रोजन युद्ध भाग २.२

Started by Atul Kaviraje, January 08, 2023, 09:46:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "मला आवडलेला लेख"
                                       लेख क्रमांक-61
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ट्रोजन युद्ध भाग २.२"

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.
--------------------------------------------------------------------------

                       हेक्टरची सरशी

     जहाजांभोवती भिंत उभी करून ,दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी घाईघाईने नाष्टा वगैरे करून ग्रीक अन पाठोपाठ ट्रोजन दोघेही लढायला बाहेर पडले. ट्रोजनांची संख्या ग्रीकांपेक्षा कमी होती असे होमर म्हणतो.

     आकाशात विजांचा लखलखाट होत होता. अजॅक्स, अ‍ॅगॅमेम्नॉनसारखे अतिरथीही घाबरले आणि मागे हटले. पण नेस्टॉर मात्र हटू शकला नाही. कारण पॅरिसने त्याच्या एका घोड्याला डोक्यात बाण मारून प्राणांतिक जखमी केले असल्याने तो जागेवरून हलू शकत नव्हता. डायोमीडने ओडीसिअसला ओरडून नेस्टॉरच्या मदतीस जाण्यास सांगितले, पण ओडीसिअस काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता-तो तसाच आपल्या जहाजाकडे पळाला. ते पाहून डायोमीड स्वतः नेस्टॉरजवळ गेला आणि आपल्या रथात त्याला घेतले. डायोमीडच्या सेवकांनी नेस्टॉरच्या घोड्यांना ग्रीक छावणीकडे नेले. इतक्यात हेक्टर त्यांच्या जवळ आला. डायोमीडने हेक्टरवर नेम धरून एक भाला फेकला, तो त्याचा सारथी एनिओपेउस याला लागून तो मरण पावला. तो मेल्यावर हेक्टरने आर्किटॉलेमस या ट्रोजनाला आपला नवा सारथी म्हणून घेतले.

     आता डायोमीड परत जात असतानाच त्याच्या रथाजवळच वीज पडली. दोघेही घाबरले, त्याच्या रथाचे घोडे घाबरून खिंकाळू लागले. नेस्टॉरच्या मते हा झ्यूस देवाकडून झालेला अपशकुन होता. देव हेक्टरच्या बाजूने असल्याचे ते चिन्ह होते. इकडे हेक्टर डायोमीडला "भित्रा, बुळगा" वगैरे शिव्या घालतच होता. इतक्यात आकाशात एक गरुड आपल्या पंज्यात हरणाचे नवजात पिल्लू घेऊन जाताना दिसला. (मूळ उल्लेख " ईगल विथ अ फॉन इन इट्स टॅलॉन्स" असा उल्लेख आहे. नेटवर पाहिले असता फॉन म्हंजे नवजात हरिणशावक, साईझ एखाद्या छोट्या मांजराएवढा असे दिसले. त्यामुळे गरुडाने त्याला उचलणे तत्वतः शक्य आहे) तो शुभशकुन मानण्याची ग्रीक प्रथा असल्याने ग्रीकांना स्फुरण चढले. इथेही सर्वप्रथम डायोमीडने आगेलाउस नामक ट्रोजनाला भाला खुपसून मारले. पाठोपाठ खुद्द अ‍ॅगॅमेम्नॉन, मेनेलॉस, थोरला अन धाकटा अजॅक्स, इडोमेनिअस, युरिप्लस आणि थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ धनुर्धारी ट्यूसर हे वीर पुढे आले. ट्यूसरची युक्ती भारी होती. आपल्यावर बाण कोसळू लागले, की थोरल्या अजॅक्सच्या भल्यामोठ्या ढालीआड तो लपायचा. त्याने एका दमात ऑर्सिलोखस, ऑर्मेनस, ऑफेलेस्तेस, दाएतॉर, क्रोमियस, लायकोफाँटेस, आमोपाओन, मेलॅनिप्पस या ट्रोजन वीरांना वीरगती मिळवून दिली. त्याचा फॉर्म बघून अ‍ॅगॅमेम्नॉनने त्याची पाठ थोपटली. त्याने नंतर एक बाण सरळ हेक्टरवर सोडला, पण तो त्याला न लागता प्रिआमचा अजून एक पुत्र गॉर्गिथिऑन याला लागून तो जागीच मरण पावला. यावर ट्यूसरने अजून एक बाण हेक्टरवर सोडला. तोही त्याला न लागता त्याचा सारथी आर्किटॉलेमस याला लागून तो मरण पावला.

     आता मात्र हेक्टरचे पित्त खवळले. तो रथातून उतरला, आणि हातात एक भलाथोरला धोंडा घेऊन ट्यूसरच्या दिशेने धावला. ट्यूसर नवीन बाण प्रत्यंचेवर चढवणार इतक्यात हेक्टरने त्याच्या खांद्याच्या हाडावर तो धोंडा जोरात आदळून ते हाडच मोडले. ट्यूसर कोसळला. आपला भाऊ वेदनेने तळमळत असलेला पाहून थोरला अजॅक्स तिथे धावून आला. मेखिस्तेउस आणि अलास्तॉर या त्याच्या सेवकांनी ट्यूसरला तशाच अवस्थेत जहाजांपाशी नेले. हेक्टरने यावेळी बर्‍याच ग्रीकांना यमसदनी धाडले. पार जहाजांपर्यंत मागे हाकलले. नंतर हेक्टरने एक सभा बोलावली आणि ग्रीकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. ग्रीक कुत्र्यांना आपण माघारी हाकललेच पाहिजे, ते पळून जायचा प्रयत्न करतील तरी तेव्हा त्यांना भाले-बाणांच्या जखमा उरीशिरी वागवतच परत जायला लागले पाहिजे, वगैरे वीरश्रीयुक्त भाषण करून सभा बरखास्त झाली आणि रात्र पडली. ग्रीकांवर लक्ष ठेवणारे कितीक ट्रोजन्स अंधारात आपल्या घोड्यांसह आगींच्या उजेडात बसले होते. दुसर्‍या दिवशी काय होते याची वाट पहात.

(क्रमशः)--
--------
(March 20, 2013)
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.01.2023-रविवार.