प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

Started by Atul Kaviraje, January 09, 2023, 06:00:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज एकही मनुष्य भूतलावर सापडणार नाही की ज्याच्या हाती मोबाईल नाही. मित्रांनो, सारे जग पाहता-पाहतI मोबाइलमय झाले आहे. उठता-बसता, जळी-स्थळी, काष्टी-पाषाणी फक्त मोबाईल आणि मोबाईल. मोबाइलशिवाय कोणाचेही आज पानंच हलत नाही,  इतका तो अंगवळणी पडलाय. त्याचे व्यसन मला नाही वाटत या जन्मी सुटेल, इतका तो आपल्या शरीराचा अभिन्न भाग झाला आहे. ऐकुया तर मित्रांनो, मोबाईलवर एक व्यंगात्मक-विनोदी कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट"
( विशेष सूचना-येथे थाटच्या जागी सेट वाचला तरी चालेल.)   
--------------------------------------------------

"पाऊले चालती पंढरीची वाट" या विठ्ठल गीतावर आधारित ही कविता आहे.
----------------------------------------------------------------

                             "प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट"
                            ------------------------------

प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट
भरलाय बाजार, ओसंडलाय हाट 
ओळखू येईना रात्र की पहाट,
आयुष्याची त्यांच्या लागलीय वाट

     रस्तोरस्ती झाली मोबाईलची गर्दी
     आहेत बिचारे मोबाईलचे दर्दी
     आजूबाजूस त्यांचे लक्ष नाही नीट,
     प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

मोबाईलने सारी नाती तोडली हो
मोबाईलच्या संगे प्रीती जोडली हो
संसाराचा यांना आला वाटतंय वीट,
प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

     मोबाईल दारी मोबाईल घरी
     उठता-बसता मोबाईल घेऊन स्वारी
     झोपेतही पडते मोबाईलशी गाठ,
     प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

मोबाईलच्या कारणे भूक विसरला
मोबाईल वापरता तहानही भुलला
याच्या आयुष्याला लागलीय नाट,
प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

     मोबाईलने याची बुद्धी हरवली
     मोबाईलने याची मती गुंग केली
     स्वप्नातही गातो मोबाइलचाच भाट,
     प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

फुकट चालले जीवनच याचे
दोष नाही येथे त्याच्या नशिबाचे
हातीच ओढवून घातलाय घाट,
प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

     निरर्थक जीवन, अर्थ नाही उरला
     महत्त्वाचा वेळ वाया बघ चालला
     नाही परतला, गेला दाखवूनी पाठ,
     प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

प्रत्येकाने तरी आता सुधरावे
जीवनाचे भले त्याने ओळखावे
वेळ नाही गेला, आता वाग नीट,
प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

     काही नाही लाभ यानेच होईल
     वेळ तुझा सारा वायाच जाईल
     सोड याचा नाद, दुखतील बोटं,
     प्रत्येकाच्या हाती मोबाईलचा थाट

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2023-सोमवार.

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================