विनोदी-व्यंगात्मक कविता-गाडीने चालली, भाजी घ्यायला

Started by Atul Kaviraje, January 11, 2023, 12:25:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     रस्त्याने फिरता फिरता एक दृश्य माझ्या नेहमीच नजरेत भरते, की बाजारात भाजी घ्यायला काही गृहिणी चक्क गाडीने येतात. मला पाहून आश्चर्य वाटते, की सैर सपाटा, किंवा दूरच्या प्रवासा पुरतं ठीक, पण मंडईत भाजी घ्यायलाही या गृहिणी गाडी वापरतात ? पाहून मला गम्मत वाटली, व या विषयावर एक कविताही सुचली. वाचूया, तर या विषयावर एक विनोदी-व्यंगात्मक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "गाडीने चालली, भाजी घ्यायला"

                               "गाडीने चालली, भाजी घ्यायला"
                              -----------------------------

फॅड वाढलंय मुंबई शहरात
बहुतेक असावं साऱ्याच नगरात
गम्मत वाटतेय हे पाहायला,
गाडीने चालली, भाजी घ्यायला.

     उच्चभ्रू सदनिकेतील ही गृहिणी
     घरी भरते नळातलेच पाणी
     बाहेर निघते तोरा मिरवायला,
     गाडीने चालली, भाजी घ्यायला.

पैसे खेळती साऱ्यांकडेच आज
पैशांचा यांना आलाय वाटत माज ?
की शेजाऱ्यांना फक्त दाखवायला,
गाडीने चालली, भाजी घ्यायला.

     गाडीने उतरते, तोरा मिरवते
     फक्त कडीपत्ता आणि कोथिंबीर खरीदते,
     वर्तन अख्खी मंडई विकत घ्यायला,
     गाडीने चालली, भाजी घ्यायला.

गाडीने उतरणार, चार लोक बघणार
नजरेत त्यांच्या आश्चर्य तरळणार
नाकावर टिच्चून लागलीय चालायला,
गाडीने चालली, भाजी घ्यायला.

     गाडीत बसून लठ्ठ होणार
     व्यायामाचा त्यांच्या अभाव असणार
     काय झालंय यांना चालायला ?
     गाडीने चालली, भाजी घ्यायला.

व्यायामासाठी जिम जॉईन करणार
थोडा काळ वौकींग करणार,
पुन्हा ये रे माझ्या मागल्या,
गाडीने चालली, भाजी घ्यायला.

     या गृहिणी कधी सुधरणार ?
     आरोग्याचे महत्त्व कधी समजणार ?
     साऱ्यांनी नको का वळून पाहायला ?
     गाडीने चालली, भाजी घ्यायला.

एकीचे पाहून दुसरीही करते
मंडईत गाड्यांची रीघच लागते
आल्यात त्या मंडईला की मॉलला ?
गाडीने चालली, भाजी घ्यायला.

     गाडीने येते, लक्ष वेधिते
     जणू सेलिब्रेटी म्हणून मिरवीते
     लागते सारी मंडई पाहून हसायला,
     गाडीने चालली, भाजी घ्यायला.

गृहिणींनो, थोडी जागा द्या
इतरांनाही भाजी घेऊ द्या
हवा थोडीशी येऊ द्या,
गाडीचा तोरा बाजूस राहू द्या.

     चार पावलांवर आहे भाजी मंडई
     तू दोन पावलांवर चालत ये बाई
     गाडी नको आणूस तू भाजी घ्यायला,
     सामान्य होऊन शिक राहायला. 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2023-बुधवार.
=========================================