विरह कविता-माझ्या दुःखी मना तू दुःखाचे गाणे गा !

Started by Atul Kaviraje, January 11, 2023, 05:24:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, दुःखी मनाचे गाणे-तराणे. विरहात त्या मनाला काय वाटत, हे मी पुढील कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या विरह-कवितेचे शीर्षक आहे- "माझ्या दुःखी मना तू दुःखाचे गाणे गा !"   

                            "माझ्या दुःखी मना तू दुःखाचे गाणे गा !"
                           -----------------------------------

तुला किती समजावयाचे, तुला किती मनवायचे   
नाना परी विनवायचे, तरी तू उदास का ? 
      माझ्या दुःखी मना तू दुःखाचे गाणे गा !
      माझ्या दुःखी मना तू विरहाचे तराणे गा !

विसरून जा त्या स्मृती, पाठी सोड त्या आठवणी
तेव्हाचे ते प्रेम ओसरले, आता फक्त दुःखच उरले
परी झरणाऱ्या आसवांना तू बळे रोखशील का ?
     माझ्या दुःखी मना तू दुःखाचे गाणे गा !
     माझ्या दुःखी मना तू विरहाचे तराणे गा !

बहरुन आली होती प्रीत, ओठी होते प्रेमाचे गीत
पाने गेली गळून सारी, झाड अवघे वठलेले
परी उसासणाऱ्या मना, कढ तू थांबवीशी का ?
      माझ्या दुःखी मना तू दुःखाचे गाणे गा !
      माझ्या दुःखी मना तू विरहाचे तराणे गा !

नुरले काही हाती आता, गेले ते दिन गेले
प्रीत-फुलांचे ते उमलणे, कुणी दुसऱ्यानेच झेलले
उदास, विमनस्क मना आज तू नकोस आवरू स्वतःला !
      माझ्या दुःखी मना तू दुःखाचे गाणे गा !
      माझ्या दुःखी मना तू विरहाचे तराणे गा !

प्रतिसाद नाही हाकेला, चैन मिळेना मनाला
अशांत मनाचे शापित दुखणे फक्त माहित त्याला
नको सावरू, उद्विग्न मना तुझा बांध फुटू दे ना !
      माझ्या दुःखी मना तू दुःखाचे गाणे गा !
      माझ्या दुःखी मना तू विरहाचे तराणे गा !

ही प्रतीक्षा येथेच संपली, ही वाट येथेच थांबली
विरहात या अग्नीच्या, सारी अIशा जळून गेली
आता उरलेत फक्त अश्रू, हे दुःख तू पिणार का ?
      माझ्या दुःखी मना तू दुःखाचे गाणे गा !
      माझ्या दुःखी मना तू विरहाचे तराणे गा !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2023-बुधवार.
=========================================