II श्री गुरु देव दत्त II-पुण्याईचे फळ मला लाभले, गतजन्मीचे सुकृत फळा आले

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 10:16:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II श्री गुरु देव दत्त II
                                    --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज गुरुवार आहे. श्री दत्तगुरुंचा वार. "श्री गुरु देव दत्त", मंत्राचा जप करून ऐकुया दत्त-गीत. "माझे पुण्य फळ आले, आज मी दत्तगुरु पाहिले" या श्री दत्तगुरूंच्या सुप्रसिद्ध गाण्यावर हे गाणे आधारित आहे. या गाण्याचे शीर्षक आहे- "पुण्याईचे फळ मला लाभले, गतजन्मीचे सुकृत फळा आले" आपणI सर्वांना ही गुरुवार-सकाळ आनंदाची जावो.

माझे पुण्य फळ आले, आज मी दत्तगुरु पाहिले- श्री दत्तगुरूंच्या सुप्रसिद्ध गाण्यावर आधारित--
----------------------------------------------------------------------

                "पुण्याईचे फळ मला लाभले, गतजन्मीचे सुकृत फळा आले"
               ----------------------------------------------------

पुण्याईचे फळ मला लाभले,
गतजन्मीचे सुकृत फळा आले.

माझे दैवत उभे ठाकले
दत्त-प्रभू माझे गुरु एकले
पुण्याईचे फळ मला लाभले,
गतजन्मीचे सुकृत फळा आले.

अत्री-अनसूयेचा पुत्र तेजस्वी
तिन्ही देवांचे रूप प्रभावी
त्रय-मूर्ती दत्त-रुपी एकवटले,
ऐसे दत्त-गुरु मज लाभले.

दत्त-विभूती महान थोर
आहे त्यांपुढे मी लहान पोर
चंचल मनास देत दिलासा,
शांतीचे वरदान मज दिधले.

लहानाहूनी गुरु लहान झाले
एकवीस गुरूंचे शिष्य जाहले
प्रणिपात त्यांना या शिष्याचा,
माझ्या गुरूंना मी अनुभवले.

श्री गुरु-दत्त मंत्र जपुनी
उच्चार माझे शुद्ध जाहले
विषय विकारांचे विष त्यजुनी,
गुरुनामाचे अमृत मी प्राशिले.

दत्त दत्त हा माझा देव
दत्त दत्त हा माझा भाव
दत्त नामाचा प्रभाव पडूनी,
साऱ्या पातकांचे क्षालन झाले.

समाधीत मी दत्त देखिले
आशिष देउनी प्रसन्न हासले
गुरु शिष्याचे अमुचे नाते,
अबाधित मी आज राखिले.

हात दत्ताचा मस्तकी फिरता
साक्षात ब्रह्म मी अनुभवले
माझे दैवत उभे ठाकले,
दत्त-प्रभू माझे गुरु एकले.

पुण्याईचे फळ मला लाभले,
गतजन्मीचे सुकृत फळा आले.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================