मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-66-सुरकोटला अश्व: भाग 2-अ--

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 10:11:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-66
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुरकोटला अश्व: भाग 2"

                          सुरकोटला अश्व: भाग 2--अ--
                         -------------------------

             (मागील भागावरून पुढे)--
            ----------------------     

     1971-72 या वर्षामध्ये श्री. ए.बी.शर्मा या भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञाने, सुरकोटला येथील टेकाडावर, इ.स.पूर्व 2000 या कालखंडातील घोड्याच्या अस्थी अवशेषांचा लावलेला शोध, पुढची सुमारे 20 वर्षे,जगभरच्या इतर शास्त्रज्ञांनी संपूर्णपणे अमान्यच केल्याने तसा दुर्लक्षितच राहिला. एक सुप्रसिद्ध आणि सन्मानित पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड एच मेडो (Dr. Richard H. Meadow) यांनी उलट या शोधावर टीका करताना असे सांगितले होते की:--
" छोट्या रणाजवळ असलेल्या सुरकोटला या हडप्पाकालीन उत्खनन स्थलावर सापडलेल्या तथाकथित घोड्याच्या पायाच्या खुरांजवळील हाडांच्या छायाचित्रावरून मूल्यांकन केल्यास,निश्चितपणे एका मोठ्या आकाराच्या खेचराची ही हाडे आहेत असे म्हणता येते."
(" It is on the basis of this phalanx that one can ascertain from the published photographs that the 'horse' of Surkotada, a Harappan period site in the little Rann of Kutch, ...... is likewise almost certainly a half-ass, albeit a large one.")

     इतर देशातील पुरातत्त्व शास्त्रज्ञांची मते काहीही असोत! सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील उत्खनन स्थलांवर, घोड्याच्या अस्तित्वाचे जास्त जास्त पुरावे भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांना इतर ठिकाणी केलेल्या उत्खननांमध्ये मिळू लागले होते हे स्पष्ट दिसत होते. 1955-56 साली म्हणजेच सुरकोटला मधील शोधाच्या आधी झालेल्या एका उत्खननात, सुरकोटलाच्या दक्षिणेकडे असलेल्या लोथल या जागी, भारतीय पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ श्री. एस. आर. राव व त्यांचे सहकारी यांना काठेवाड किनार्‍यावर असलेल्या सिंधू-सरस्वती संस्कृतीतील एका मोठ्या बंदराचा शोध लागला होता. या ठिकाणी जहाजांवरील मालाची चढ उतार करण्यासाठी बांधलेला एक मालधक्का आणि नवीन जहाजे बांधणे आणि नौका दुरुस्ती या साठी बांधलेली एका गोदी यांचाही शोध लागलेला होता. याच ठिकाणी केलेल्या नवीन उत्खननात, श्री. राव यांना भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या दोन अश्व प्रतिकृती (figurines of terracotta horses) सापडल्या. यापैकी एका मूर्तीतील घोड्याला आखूड शेपूट, लांब मान आणि उभे असलेले कान दाखवलेले होते. यानंतर पी.के.थॉमस व पी.पी.जोगळेकर या पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तज्ञांनी केलेल्या शिकारपूर व कुंतासी येथील उत्खननात, एम.के ढवळीकर् यांनी केलेल्या चंबळ नदीच्या खोर्‍यातील कायथ येथे केलेल्या उत्खननात, घोड्यांची हाडे सापडल्याचे त्यांनी सूचित केले होते. श्री ढवळीकरांना कायथ येथे, भाजलेल्या मातीपासून बनवलेली एका घोडीची (figurine of a mare) छोटी प्रतिकृती सुद्धा सापडली होती.

(क्रमशः)--
---------

--चंद्रशेखर
(March 20, 2013)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.