मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-67-सुरकोटला अश्व: भाग 2

Started by Atul Kaviraje, January 13, 2023, 10:11:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-67
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुरकोटला अश्व: भाग 2"

                             सुरकोटला अश्व: भाग 2--
                            ---------------------

     भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञ श्री. ए.बी.शर्मा यांचा शोध आंतर्राष्ट्रीय ख्यातीचे एक शास्त्रज्ञ सॅन्डॉर ब्रोकोन्यी यांनी संपूर्णपणे मान्य केल्याने,शर्मांवर अविश्वास दाखवणार्‍या इतर पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना नाईलाजाने हा शोध मान्य करणे भागच पडले. या नंतर याच परिसंवादात श्री.ए.बी.शर्मा यांना सर्व श्रोत्यांनी 2 मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करून सन्मानित केले त्यांच्या शोधाबद्दल त्यांना पोचपावती दिली. दुसर्‍या एका खंडातून आलेल्या एका शास्त्रज्ञाने आपला शोध मान्य केल्यानंतर स्वदेशीयांनी आपल्या शोधाला मान्यता दिली याची मनाला अतिशय खंत वाटल्याने श्री..ए.बी.शर्मा या सन्मानाबद्दल फारसे समाधानी नव्हते. नंतरच्या कालात लिहिलेल्या आपल्या एका पुस्तकात ते म्हणतात.
" हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात दुख्खद दिन होता असे मी मानतो. सर्व श्रोते माझे कौतुक करत असताना माझ्या मनात हेच विचार येत राहिले की दुसर्‍या एका खंडातून एकजण आला, त्याने अस्थी अवशेष तपासले व जाहीर केले की "'शर्मा म्हणतात ते बरोबर आहे." हे होईपर्यंत माझ्या शोधाला मान्यता मिळण्यासाठी मला 2 दशके वाट पहावी लागली. दुसर्‍या देशांकडून आपल्या शोधांना मान्यता कधी मिळते ? याची वाट न बघत बसण्याचे बौद्धिक धैर्य आपण कधी दाखवणार आहोत? आपले इतिहासकार तर या बाबतीत आणखीनच मानसिक गुलामगिरीत आहेत. आर्य लोक भारतीय उपखंडाच्या बाहेरून आलेले कोणी लोक नव्हते हे सिद्ध करण्यासाठी हा सर्व प्रयत्न चालू आहे असे त्यांना वाटते."

     सॅन्डर ब्रोकोन्यी यांनी आपले मत निःसंदिग्ध रितीने परत एकदा 1993 मध्ये, पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ संचालकांना (Director-General) दिलेल्या अहवालात व्यक्त केले आहे.
" इतिहास पूर्व कालातील सुरकोटला, कच्छ, येथे डॉ. जे.पी.जोशी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उत्खननात मिळालेल्या घोड्याच्या प्रजातीच्या प्राण्याच्या अस्थी अवशेषांच्या बारकाईने व संपूर्णपणे केलेल्या अभ्यासाच्या आधारावर मी हे विधान करता आहे. सुरकोटला अश्वाचा खालचा जबडा आणि दात यावर असलेल्या एनॅमलचा आकार (pattern), पुढच्या दातांचा साईज आणि फॉर्म व खुराजवळील हाडे यांचा पुरावा लक्षात घेता हा प्राणी एक खराखुरा अश्व (Equus caballus L) आहे हे सिद्ध होते. प्लायस्टोसीन युगानंतरच्या कालात भारतीय उपखंडात रानटी घोडे अस्तित्वात नसल्याने हा अश्व पाळलेला होता या बद्दल कोणतीही शंका घेण्याची आवश्यकता नाही. या शिवाय याच अस्थी अवशेषांत असलेल्या घोड्याच्या वरच्या जबड्यामधील (inter- maxilla fragment) हिरडी व दात शाबूत असलेल्या एका तुकड्यावर, त्या घोड्याने आपला तोडांतील लगाम सतत चावल्याच्या खुणा उमटलेल्या अस्तित्वात आहेत. ही लगाम चघळण्याची वाईट सवय, जे घोडे फक्त युद्धासाठी वापरले न आता इतर कामांसाठीही वापरले जातात त्यांच्यात दिसून येते"

     सुरकोटला अश्व विवाद यानंतर जवळपास संपुष्टातच आला व हे मान्य केले गेले की सिंधू संस्कृतीतील लोकांना इ.स.पूर्व 2000 या कालानंतर पाळलेला घोडा हा प्राणी माहीत होता व त्यांच्या वापरात होता. मात्र आर्य आक्रमण सिद्धांताच्या चाहत्यांजवळच्या भात्यात, आणखी एक बाण शिल्लक होताच. या बाकी उरलेल्या सिद्धांताप्रमाणे, आर्य सेना या अनार्य सेनांपेक्षा वरचढ असण्यास आणखी एक महत्त्वाचे कारण होते. आर्य योद्धे वापरत असलेल्या रथांना आरे(spoke) असत व अनार्यांच्या रथांना आरे नसलेली सपाट घन (solid wheels) चाके असत. या कारणाने आर्य योद्ध्यांचे रथ कितीतरी जास्त गतीने प्रवास करू शकत व त्यांना अनार्यांवर विजय मिळवता येण्याचे हे एक महत्त्वाचे कारण होते.

--(क्रमशः)-
----------
--चंद्रशेखर
(March 20, 2013)
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.01.2023-शुक्रवार.