मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-68-सुरकोटला अश्व: भाग 2

Started by Atul Kaviraje, January 14, 2023, 09:59:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-68
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुरकोटला अश्व: भाग 2"

                             सुरकोटला अश्व: भाग 2--
                            ---------------------

     मात्र हा मुद्दा कपोलकल्पित असल्याचे भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केलेल्या अनेक स्थानांवरील उत्खननांवरून आढळून आले. कालीबांगन आणि राखीगढी येथील उत्खननात भाजलेल्या मातीपासून बनवलेली मुलांच्या खेळण्यांतील अनेक चाके सापडली. या सर्व चाकांवर आंसापासून ते बाहेरच्या परिघापर्यंत रंगवलेले आरे दिसून आले. बाणावली मधील उत्खननात तर मातीमध्येच आरे कोरलेले (low relief) आढळले. धोलावीरा मध्ये दोन्ही प्रकारची चाके सापडली.

     भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या या कार्यामुळे, हडप्पाकालीन भारतावर कोणतेही आर्य आक्रमण झाले नव्हते ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. हडप्पावासीयांना घोड्याच्या पाठीवरून व रथात बसून तुफानी घोडदौड करत येणार्‍या, कोणत्याही आक्रमकांशी सामना करावा लागला नव्हता. हे जरी सगळे मान्य झाले असले तरी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हडप्पा पूर्व काल आणि सुरवातीचा हडप्पा काल (pre-Harappan) या मध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्याच उत्खनन स्थळी घोड्याचे कोणतेही अवशेष कोठेच सापडलेले नाहीत. त्याच प्रमाणे या सिंधू संस्कृतीमध्ये, वैदिक संस्कृतीत घोड्याला असलेले सांस्कृतिक महत्त्व असल्याचा कोणताच पुरावा आढळत नाही. सुरकोटला अश्वामुळे फक्त एवढेच सिद्ध होते आहे की परिपक्क्व हडप्पा कालात (mature Harappan phases) घोडा हा प्राणी पाळला जात होता. पर्यायाने याचा अर्थ असाच होतो की 1920 सालापासून इतिहासकारांना कोड्यात टाकणारा मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला आहे.
हा मूळ प्रश्न या प्रमाणे आहे:--

     पाकिस्तानमधील 'स्वात' या भागापासून, काठेवाड किनार्‍यापर्यंत दक्षिणेला आणि पूर्वेला गंगा खोर्‍यापर्यंत विस्तार असलेली ही विशाल सिंधू-सरस्वती संस्कृती अचानक नष्ट कोणत्या कारणासाठी आणि कशी झाली असावी? त्याचप्रमाणे, जहाजे किंवा नौका बांधणी करून, समुद्र मार्गाने व्यापारउदीम करणार्‍या, स्वतची लिपी असणार्‍या आणि उत्कृष्ट शहर आखणी तसेच नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याच्या अप्रतिम सोई करू शकणार्‍या या संस्कृतीने, मागे आपला कोणताही वारसा न सोडता ती इतिहासांच्या पानात गडप कशी झाली? आणि भारतीय उपखंड परत एकदा अंधकार युगात ही सर्व प्रगती विसरून कसे काय गेले?

     या शिवाय आणखीही एक प्रश्न निदान माझ्या मनाला तरी पडतो आहे. सिंधू संस्कृतीतील लोक, मानवी पुनरुत्पादन आणि फलोधारणा (fertility) यांचे पूजन करणारे मूर्तीपूजक होते. मस्तकासह असलेले किंवा मस्तक विरहित असलेले स्त्री शरीर आणि लिंग (phallic symbol) यांच्या प्रतिमांचे ते पूजन करीत. जर आर्यांचे आक्रमण त्यांच्यावर कधीच झालेले नव्हते तर ही मूर्तीपूजा सोडून देऊन त्यांनी पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करणार्‍या अमूर्त देवांना अग्नीद्वारा हविर्भाग देण्याची आर्य प्रथा का स्वीकारली असावी?

     या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजून तरी मिळाली आहेत असे मला वाटत नाही. मात्र तर्कसंगत खुलासा काही बाबतीत तरी मिळू शकतो आहे.

--(क्रमशः)-
----------
--चंद्रशेखर
(March 20, 2013)
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2023-शनिवार.