बाल-गीत-कविता-आई, मला झोपू दे ना !

Started by Atul Kaviraje, January 16, 2023, 11:00:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     थंडीचे दिवस आहेत. बाहेर गुलाबी थंडी पडली आहे. अश्यात आई सकाळी आपल्या लहान मुलाला, शाळेत जाण्यासाठी उठवत आहे. पण तो लहानगा, बिचारा, थंडी सहन न होऊन, अधिक पांघरूण आपल्या अंगावर ओढून पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. बाळाची आई त्याला अनेक कारणे देऊन उठवीत आहे. परंतु, तो उठण्याचा कंटाळा करीत आहे.  मुलाची यावर उत्तरे तयार आहेत. सरते शेवटी आई असा काही उपाय करते की बाळ पटकन अंथरुणातून उठून बसतो. वाचूया आई आणि मुलाची ही थंडीतील बाल-गीत-कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "आई, मला झोपू दे ना !"

                                    "आई, मला झोपू दे ना !"
                                   -----------------------

बाळा ऊठ, सकाळ झाली
कोंबड्याने पहा बांग दिली
अजूनही तू अंथरुणात कसा ?
तुझी शाळेची वेळ झाली.
     आई, त्या कोंबड्याला कामच नाही
     दाणे खायचे आणि बांग द्यायची
     त्याला नाही पाटी, नाही शाळा,
     नुसता कुकूच कू ओरडतोय ना !
          बाहेर खूप थंडी पडलीय ना !
          आई, मला झोपू दे ना !

बाळा, सूर्य बघ उगवला
सारा परिसर सोनेरी झाला
बघ आता उष्णता येईल,
तुझ्या अंगात ऊब येईल.
     त्या सूर्याचे काम रोजचे
     उगवायचे आणि फक्त मावळायचे 
     त्याला काय पडलेय थंडीचे ?
     मला छान रजई पाहिजे.
          बाहेर अजूनही गार वाटतंय ना !
          आई, मला झोपू दे ना !     

बाळा, पक्षी किलबिल करिती
पिल्लाना चोचीने दाणा भरविती
छान घरटे त्यांचे गवताचे,
झाडावरल्या त्या सुरक्षित फांद्यांचे.
     आई, ते पक्षी उगीचच उठले
     त्यांना दिवस रात्र नाही कळले
     त्यांना सांग तुम्ही झोपी जा,
     थंडीचा जोर वाढलाय पहा.
          बाहेर गारठा वाढलाय ना !
          आई, मला झोपू दे ना ! 

बाळा, माणसे कामाला चाललीत
काम नसले तर उपाशी राहिलीत
ती कशी जातात बाहेर थंडीत,
झोपेला गुंडाळून आपल्या बंडीत.
     आई, त्यांचे रोजचे हे काम
     सकाळी उठायचे, संध्याकाळी यायचे
     जेवायचे, झोपायचे, पुन्हा उठायचे,
     त्यांना त्यांचे काम करू दे ना !
          बाहेर अजूनही धुके आहे ना !
          आई, मला झोपू दे ना !

बाळा, ती बघ घंटा वाजली शाळेची
वेळ झाली मुलांच्या प्रार्थनेची
शिकण्याची, कवायतीची, खेळ खेळण्याची,
त्यांना नाही का भीती थंडीची ?
     आई, शाळेत रोज का जायचे ?
     दिवस आहेत हे गुलाबी थंडीचे
     अंथरुणात मस्त झोप घेण्याचे,
     अंगावर ऊबदार रजई ओढण्याचे.
          बाहेर थंडीचा कडाका वाढलाय ना !
          आई, मला झोपू दे ना !

बाळा, बस झाली तुझी कारणे
बाळा, बस झाले तुझे बहाणे
तुझ्यासाठी गरमागरम पोहे केले,
बाळ माझे असेल भुकेले.
     ऐकुनी बाळ पटकन उठला
     भूक लागलीय म्हणाला आईला
     माझी थंडी पळून जाईल,
     पोहे खाऊन गरमी येईल.

आई म्हणाली, अरे लबाडI
समजले तुझा सारा बहाणा
खाऊसाठी होते सारे नाटक,
थंडीचे आणि झोपून रहाण्याचे.
     बाळा, माझ्या कुशीत ये ना !
     तुला मायेची ऊब देते ना !
     तू लाडका माझा एकुलता एक,
     तुझी थंडी पळून जाईल ना !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.01.2023-सोमवार.
=========================================