मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-71-सुरकोटला’ अश्व: भाग 1

Started by Atul Kaviraje, January 17, 2023, 09:32:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-71
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "'सुरकोटला' अश्व: भाग 1"

                               'सुरकोटला' अश्व: भाग 1--
                              -----------------------

     'सुरकोटला' हे गुजरात राज्यामधील कच्छ जिल्ह्यामध्ये असलेले, एक अगदी छोटेसे खेडेगाव आहे. विकिमॅपियावरील माहितीप्रमाणे या गावाचे अक्षांश-रेखांश, साधारण 23°37′N 70°50′E असे आहेत. त्यामुळे हे खेडे कच्छची राजधानी असलेल्या भूज शहरापासून ईशान्येस साधारण 120 किमी अंतरावर तर रापर गावाच्या ईशान्येस, 22 किमी अंतरावर वसलेले आहे असे म्हणता येते. या खेड्याजवळच 16 ते 26 फूट उंच असलेले एक टेकाड बघण्यास मिळते. या टेकाडाच्या सभोवती असलेली जमीन उंचसखल असून त्यात मधेमधे लाल मातीने माखलेल्या सॅन्डस्टोन दगडाच्या छोट्या छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत. या लाल मातीमुळे या सर्व भागाला लालसर ब्राऊन रंग प्राप्त झाला आहे. हा सर्वच भाग एकूण दुष्काळी व वैराण असल्याने मधून मधून दिसणारी, निवडूंग, बाभूळ आणि पिलू या वनस्पतींची काटेरी, खुरटी झुडपे सोडली तर बाकी झाडोरा किंवा गवत असे दिसतच नाही.

     1964 साली, भारतीय पुरातत्त्व विभागाचे एक अधिकारी, श्री. जगत्पती जोशी यांनी इतिहास-पूर्व कालातील मानवी वस्तीच्या खाणाखुणा या टेकाडावर दिसत असल्याचे शोधून काढले होते. इतिहास-पूर्व कालात या टेकाडाच्या ईशान्य दिशेला एक छोटी नदी वहात होती. या नदीतील पाणी वहात जाऊन शेवटी कच्छमधील छोट्या रणात (Little Rann) पसरत असे. या नदीचे अस्तित्व हे कदाचित या ठिकाणी इतिहास-पूर्व कालातील मानवी वसाहत असल्याचे महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता होती. सध्या मात्र या इतिहासातील नदीला एका पावसाळी छोट्या ओढ्याचे स्वरूप आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी प्रथम 1970-71 मध्ये उत्खनन करण्यास प्रारंभ केला. या उत्खननात, या स्थानावर एक किल्ला व त्याच्या बाजूला वसलेले एक गाव यांचे भग्नावशेष सापडले होते. तदनंतरच्या वर्षात ( 1971-72) येथे परत एकदा उत्खनन सुरू करण्यात आले. दुसर्‍या वर्षीच्या उत्खननात, या ठिकाणी प्रत्यक्षात तीन सलग कालखंडातील मानवी वसाहती किंवा संस्कृत्यांचा राबता होता असे आढळून आले. यापैकी सर्वात जुनी वसाहत इ.स.पूर्व 2150 ते 1950 या कालखंडात अस्तित्वात होती. या सर्वात जुन्या वसाहतीला 1ए असे नाव देण्यात आले. या नंतरची किंवा 1बी हे नाव दिलेली वसाहत इ.स.पूर्व 1950 ते 1800 या कालात अस्तित्वात होती तर जमिनीच्या सर्वात वरच्या थरात खाणाखुणा सापडलेली अखेरची किंवा 1सी ही वसाहत इ.पूर्व 1800 ते 1700 या कालखंडात येथे रहात होती. या सर्व उत्खननावरून हे स्पष्ट होत होते की की या ठिकाणी अस्तित्त्वात असलेली सर्वात जुनी वसाहत ही नक्कीच ब्रॉन्झ युगातील हडाप्पा किंवा सिंधू-सरस्वती संस्कृतीचा एक भाग होती.

     1बी या नावाने ओळखला जाणारा कालखंड समाप्त होण्याच्या सुमारास संपूर्ण सुरकोटला वसाहतीला भयानक आग लागली व ही सर्व वसाहत जळून खाक झाली. या दुर्घटनेचा साक्षीदार असलेला एक कमीजास्त जाडीचा राखेचा थर या संपूर्ण वसाहतीवर पसरलेला आढळून आला. 1बी या कालखंडाच्या खुणा ज्या खोलीवर सापडत होत्या तेथपर्यंत उत्खनन केल्यावर हा राखेचा थर आढळून आल्याने या आगीचा कालखंडही उत्खनन करणार्‍या शास्त्रज्ञाना लगेचच समजू शकला. मात्र आगीमुळे भस्मसात झालेली ही वसाहत परत लगेचच बांधून काढली गेली होती व येथे परत एकदा राबता सुरू झाला होता. मात्र या पुढच्या म्हणजे 1सी या कालखंडात, येथे कोणीतरी भिन्न लोक राबत्यास आले होते व एक नवीनच संस्कृती उदयास आली होती असे सापडलेल्या खाणाखुणा व वस्तू यावरून आढळून येत होते.

     या टेकाडावर उत्खनन केल्यावर वर निर्देश केलेल्या ज्या कालखंडातील वसाहतींचे 3 थर आढळून आले होते त्या तिन्ही थरांमध्ये, विपुल प्रमाणात निरनिराळ्या पशुपक्ष्यांची हाडे आढळली होती. यातील पशूवर्गाच्या हाडांचे, पाळीव प्राणी, वसाहतीच्या निकट राहणारे डुकरे, उंदीर या सारखे प्राणी आणि शिकार केले जाणारे हरणासारखे वन्य प्राणी या 3 वर्गात विभाजन करता येत होते.

--(क्रमश):-
----------
--चंद्रशेखर
(March 14, 2013)
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.01.2023-मंगळवार.
=========================================