मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-72-सुरकोटला अश्व: भाग 1

Started by Atul Kaviraje, January 18, 2023, 10:29:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-72
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "'सुरकोटला' अश्व: भाग 1"

                               'सुरकोटला' अश्व: भाग 1--
                              ----------------------

     गेल्या काही दशकांत सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यात ज्या अनेक प्राचीन वसाहती सापडल्या आहेत त्या सारखीच 'सुरकोटला' प्राचीन वसाहत ही एक असल्याने यात फार निराळे किंवा वैशिष्ट्यपूर्ण असे काही सापडेल अशी फारशी अपेक्षा शास्त्रज्ञांना नव्हती. परंतु सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यातील कोणत्याही प्राचीन वसाहतीच्या उत्खननात कधीही न सापडलेल्या एका पाळीव प्राण्याची हाडे सुरकोटला उत्खननात पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना सापडली व या शोधामुळे, गेले 1 शतक युरोपियन इतिहास लेखकांनी या सिंधू खोर्‍यातील प्राचीन संस्कृतीबद्दलची जी काही प्रमेये मांडली होती ती पूर्णपणे चुकीची ठरतात की काय असा प्रश्न निर्माण झाला व एका नव्या विवादाला तोंड फुटले.

     हा पाळीव प्राणी होता अश्व किंवा घोडा ! (Equus caballus Lin or in plain English a Horse.)

     उत्खनन करणार्‍या पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांच्या गटामधील, पशुंच्या अस्थी अवशेषांबद्दलचे विशेष तज्ञ मानले जाणारे शास्त्रज्ञ, श्री ए.के.शर्मा यांनी, 1बी या थरात सापडलेल्या हाडांमध्ये, घोड्याचे पुढचे दात व सुळे (incisor and molar teeth) व पायामधील खुराजवळील हाडे (various phalanges and other bones) ही निःशंकपणे घोड्याचीच (Equus caballus Lin (Horse) असल्या बद्दलचे आपले मत अतिशय सुस्पष्टपणे व्यक्त केले होते. या घोड्याच्या हाडांबरोबर, गाढवासारख्या तत्सम प्राण्यांची (Equus asinus and Equs hemionus khur (wild asses) हाडेही आपल्याला मिळाली असल्याचे आणि या शिवाय सर्वात वरच्या म्हणजे 1सी थरात जी हाडे सापडली आहेत जी निःशंकपणे घोड्याचीच आहेत असे म्हणणे शक्य होणार नाही हे सांगून एकूण परिस्थिती स्पष्ट केली होती.

     श्री. ए.बी.शर्मा यांचा हा शोध इतका सनसनाटी होता की जगभरातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ, इंडॉलॉजिस्ट्स आणि इतिहासकार यांच्यात खळबळ उडाली व बहुतेकांनी हा शोध मान्य करण्याचेच नाकारले. 1920 सालामध्ये जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीचा शोध लावल्या नंतरच्या कालखंडात युरोपियन इतिहासकारांनी, भारतावर आर्य टोळ्यांचे आक्रमण झाल्यामुळे भारतीय उपखंडाचा इतिहास कसा बदलला? आर्य-अनार्य यांच्यात कशी युद्धे झाली असावीत? आर्यांचा विजय का झाला? वगैरे प्रश्नांवर विसंबून जे एक भव्य दिव्य काल्पनिक चित्र रंगवले होते, त्या चित्रालाच मुळापासूनच सुरूंग या शोधामुळे लागण्याची वेळ आली.

     या युरोपियन इतिहासकारांनी रंगवलेला हा इतिहास कोणत्या प्रत्यक्ष शोधांवर आधारित होता? हे बघणे रोचक ठरेल. सिंधू संस्कृतीतील उत्खनन झालेल्या कोणत्याही ठिकाणी पाळलेला घोडा (Equus caballus Lin) या प्राण्याचे अवशेष कधीही सापडलेले नाहीत. सिंधू संस्कृती लयाला गेल्यानंतरच्या (इ.स.पूर्व 1700-1500) कालात, भारतीय उपखंडामध्ये जी वैदिक संस्कृती उदयास येऊन सर्वमान्य झाली होती, त्या संस्कृतीमध्ये पाळलेला घोडा या प्राण्याला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान दिलेले होते. या मुळे, नंतरच्या काळात घोड्यांच्या पाठीवरून तुफानी घोडदौड करत आलेल्या चेंगिझखानच्या सैन्याने जसा मध्य एशिया सहज रित्या पादाक्रांत केला होता तशाच पद्धतीने अफगाणिस्थान-इराण कडून घोड्याच्या पाठीवरून आलेल्या आर्य टोळ्यांनी आपल्या तुफानी घोडदौडीच्या बळावर सिंधू संस्कृतीतील आणि बैलगाडी हेच ज्यांचे प्रमुख वाहन होते अशा स्थानिक अनार्य वसाहतींचा संपूर्ण विनाश करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले असावे असे काहीसे चित्र या युरोपियन इतिहासकारांनी रंगवले होते. हे चित्र, या युरोपियन इतिहासकारांच्या मताने, इतके परिपूर्ण, कोणतीही शंका घेण्यास वाव नसलेले व परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होते की या इतिहासावर हा अखेरचा शब्द आहे असे मानले जाऊ लागले होते. भारतातील अनेक विद्वान मंडळींनाही हा आर्य-अनार्य सिद्धांत पसंत पडला व उत्तर भारतीय म्हणजे आर्य व दक्षिण भारतीय म्हणजे अनार्य असेही काही मंडळी म्हणू लागली.

     जगभर सर्वमान्य झालेल्या युरोपियन इतिहासकारांच्या या प्रिय सिद्धांताला भारतातील एक साधा सुधा पुरातत्त्व शास्त्रज्ञ आता आव्हान देऊ बघत होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, तथाकथित आर्य टोळ्यांचे आक्रमण भारतीय उपखंडावर ज्या काळात झाले असावे असे मानले जात होते त्याच्या 300 ते 500 वर्षे आधीपासूनच किंवा इ.स.पूर्व 2000 या कालखंडापासूनच पाळीव घोडा हा प्राणी हडाप्पा किंवा सिंधू संस्कृतीतील लोकांना परिचित होता नव्हे तर त्यांच्या वापरात होता.

--चंद्रशेखर
(March 14, 2013)
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2023-बुधवार.
=========================================