मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-76-मंत्रसामर्थ्य

Started by Atul Kaviraje, January 22, 2023, 10:38:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-76
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मंत्रसामर्थ्य"

                                     मंत्रसामर्थ्य--
                                    ----------

     परवा एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे."

     त्यांच्या या विधानात काही तथ्य आहे काय? या ऊर्जेचा प्रत्यक्ष प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला? ॐ मधील प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली भरमसाट विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक भोळसट गलिबलांना असली विधाने महान सत्ये वाटतात .ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,वा! काय विद्वत्ता आहे असे म्हणतात , हे खरे.

     भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली.त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी थोडातरी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? का त्या मंदिरात प्रत्यही ओम् ओम् जपणारे महात्मे त्यावेळी ओय् ओय् म्हणत होते? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले? आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध गेंगाणा खर्जस्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा या देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युन्निर्मिती का करत नाही? असे काही करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणण्यात काय अर्थ आहे? या ऊर्जेचा उपयोग कोणत्या क्षेत्रात ,कशा पद्धतीने होतो?

     हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून बसून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले..साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो...मी मुक्त झालो...मी ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत.त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.

     बरेच अध्यात्मप्रेमी गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे.या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात.अखिल ब्रह्मांड पवित्र करण्याचे सामर्थ्य या मंत्रात आहे.जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त ,शुद्ध आणि पवित्र होईल.असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत भारावून जातात. मग सी.डी.लावून "ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।" हा गायत्री मंत्र ऐकत बसतात. खिडकी उधडी असते.डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतात. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतात.मंत्राच्या त्याच त्या ओळी ऐकून ऐकून कंटाळतात."आता राहूं दे.नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतात.दिवा लावून डास शोधायला लागतात. आंतर जालावर गायत्री मंत्राविषयी एक लेख आहे.त्यातील दोन वाक्ये,"

....विद्वानांच्या म्हणण्या नुसार गायत्री मंत्र ही "4 1H + 2 e --> 4He + 2 neutrinos + 6 photons " या सूर्यावर हायड्रोजन वायूपासून हेलियम, मुक्त Neutrons , Photons आणि उर्जा निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन आहे"."हा गायत्री मंत्र लाल, शुभ्र असा अतिशय तप्त असल्याने त्याला ओम हा फिल्टर लावला जातो."
अशा लेखनाने अध्यात्मवादी हास्यास्पद ठरतात.

--यनावाला
(March 12, 2013)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.01.2023-रविवार.
=========================================