मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-77-मंत्रसामर्थ्य

Started by Atul Kaviraje, January 23, 2023, 08:53:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-77
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मंत्रसामर्थ्य"

                                    मंत्रसामर्थ्य--
                                   ----------

     "गं गणपतये नम:।" या मंत्रजपाने विश्वशांतीचे संधारण,संवर्धन आणि पोषण होते ." हे तथ्यहीन विधान भोळसट श्रद्धाळूंना खरे वाटते.गणेश जयंतीला गणेशयाग करतात.दिवसभर ध्वनिवर्धकांवर "ॐ--गं गणपतये नम:।" चालू असते.ऐकून कान किटतात. शेजारच्या गल्लीत रात्री टोळी युद्ध होऊन एखादा खून पडला तरी "गं गणपतये नम:।" मंत्र विश्वशांतीचे पोषण करतो ही भोळसटांची श्रद्धा अढळ राहाते.

     हे मंत्र, तसेच "ॐ नम: शिवाय।,ॐ नमो भगवते वासुदेवाय।जय जय रघुवीर समर्थ।," असे मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण वास्तव जाणावे.थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान,प्रजाहितदक्ष होते.दुर्दैवाने तरुणपणीच त्यांना क्षय रोगाने ग्रासले.अनेक आयुर्वेदाचार्य धन्वंतरींच्या उपचारांनी गुण आला नाही.अंतिम समयीं मृत्युंजय मंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो दशग्रंथी ब्रह्मणांना नियुक्त केले.पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला.

     " माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--
"शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले.देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीच पाप मोठे. मंत्रजप व्यर्थ ठरले. झांशीवालीस गोळी लागली.भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."-----या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हे एक होते.

     अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे.त्यातील संग्रामविजय मंत्र:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"

     असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते.मंत्राने काहीही विशेष गोष्ट साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे .मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक,खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने आश्चर्यकारक चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.

--यनावाला
(March 12, 2013)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.01.2023-सोमवार.
=========================================