मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-89-ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण

Started by Atul Kaviraje, February 04, 2023, 10:10:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-89
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा"

             ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा--
            ---------------------------------------------------------

                 ट्रोजन युद्ध भाग पहिला

     ट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की.

                 इलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका:

     अखेरीस ८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रीक आरमारी ताफा ट्रॉयला जाण्यासाठी सज्ज झाला. ट्रॉयला येऊन ९ वर्षेही उलटून गेली. मागील भागात सांगितल्याप्रमाणे तोपर्यंत हट्टी अ‍ॅगॅमेम्नॉनला शिव्या घालत आणि अकीलिस-ओडीसियस आदि वीरांच्या पराक्रमाने थक्क होत ग्रीक योद्धे निवांत मजा करत होते. कुठे एखादे बेट लुटावे, कधी बाया पळवून आणाव्या, रात्री बैल-मेंढे मारून निवांत खावे आणि झ्यूसदेवाला अर्पण करण्याच्या नावाखाली अँफोरेच्या अँफोरे भरून दारू ढोसावी, असा त्यांचा निवांत दिनक्रम चालला होता. तसे म्हटले तर निवांत पण बोअरिंगच होते सगळे जरा. अजून ट्रोजन लोकांबरोबर "फायनल काऊंटडाऊन" झाला नव्हता. नाही म्हटले तरी ट्रॉयच्या भुईकोटाची अन हेक्टर, सार्पेडन आदि योद्ध्यांची थोडी धास्ती होतीच ग्रीकांना. त्यातच परत ग्रीक छावणीत प्लेगची साथ पसरली. साहजिकच आहे म्हणा ते. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र राहिल्यावर ते कधी ना कधी होणे हे ठरलेलेच होते.

     [इकडे ट्रोजनांची स्थितीपण काय लै भारी नव्हती. अख्ख्या ग्रीसमधले अतिरथी-महारथी आपापली शस्त्रे परजत गोळा झालेले, त्यात परत ग्रीकांकडून ट्रोजनांच्या सप्लाय लाईन्स कट करायचे प्रयत्न नेहमीच सुरू असत. ११ बेटे अन १२ शहरे ग्रीकांच्या ताब्यात गेल्यामुळे त्यांची पोझिशन तशी नाजूकच होती. त्यांचे सहकारीदेखील कमी होते.एकुणात, उभयपक्षी वातावरण टेन्स होते.]

                 इलियडचे थोडक्यात बहिरंगपरीक्षणः

     अंधकवी होमरकृत इलियड अन ओडिसी ही ग्रीकांची रामायण-महाभारतेच जणू. फरक इतकाच, की रामायण आणि महाभारतातील वर्ण्य विषय, व्यक्ती, इ. खूप वेगळ्या आहेत तर एकाच ट्रोजन युद्धाशी संबंधित ही दोन काव्ये आहेत- इलियडचा हीरो आहे अकीलिस तर ओडिसीचा हीरो आहे ओडीसियस. काव्याचे नाव इलियड असायचे कारण म्हंजे होमर ट्रॉयला इलिऑस/इलियम म्हणतो, इलियमसंबंधीचे काव्य ते इलियड. [ जसे रोमन कवी व्हर्जिलने रोम शहराच्या एनिअस नामक संस्थापकावर लिहिलेल्या काव्याचे नाव एनिअड आहे.] महाभारतात जसा पर्व-अध्याय-श्लोक असा फॉर्मॅट आहे, तसा इथे "बुक्स" चा फॉर्मॅट आहे. पूर्ण काव्य हे २४ "पुस्तकांत" विभागलेले आहे. आणि टोटल ओळी या १५,६९३ इतक्या आहेत. लै काही मोठे नाही इतके नक्कीच खरे. बाकी इलियड आणि ओडिसी या काव्यांच्या एकत्रित विस्ताराच्या ८ पट आपले महाभारत आहे असेही एके ठिकाणी वाचलेय. साधारणपणे इ.स.पू.८०० च्या सुमारास हे काव्य रचले गेले असे मानले जाते. या प्रश्नाची चर्चा नंतर विस्ताराने करूच.

     जुन्या कुठल्याही काव्याप्रमाणे, पूर्ण इलियड हे छंदोबद्ध आहे. वृत्ताचे नाव आहे "डॅक्टिलीक हेक्सामीटर". म्हंजे काय ब्वॉ? आपल्या अक्षरगणवृत्तांत जसे गण असतात, उदा. य, म त, र, ज, न, स, आणि ल, ग(अनुक्रमे र्‍हस्व आणि दीर्घ साऊंड), तसे पाश्चिमात्य छंदःशास्त्रातदेखील गण आहेतच-ती कल्पना सगळीकडे असतेच. एक फरक असा, की आपल्याकडे अक्षरगणांची रचना फारच टाईट असते, जरा जरी क्रम बदलला तरी लग्गेच वृत्त वेगळे म्हटले जाते. तिकडे तसे नाही. एक स्ट्रक्चर दिले तरी विदिन सम लिमिट्स थोडे फेरफार चालतात. असो. हां तर "डॅक्टिलीक हेक्सामीटर" म्हणजे "डॅक्टिल" नामक गण सहा वेळा वापरलेले वृत्त (हेक्सामीटर). तर आता डॅक्टिल म्हणजे कोणता गण? मुळात डॅक्टिल किंवा दाक्तिलॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे "बोट". खाली दिलेल्या चित्रावरून कल्पना स्पष्ट होईल.

--बॅटमॅन
(February 19, 2013)
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2023-शनिवार.
=========================================