मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-91-ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण

Started by Atul Kaviraje, February 06, 2023, 09:40:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-91
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा"

             ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा--
            ---------------------------------------------------------

     होमर हा देवीला आवाहन करतोय अकीलिसच्या रागाची कवने गाण्याचे. अ‍ॅगॅमेम्नॉनवर रागावून बसल्यामुळे अकीलिसने युद्धात भाग घेतला नाही. आणि अकीलिस नाही म्हणजे त्याची ती मुंग्यांसारखी खूंखार मॉर्मिदॉन सेनादेखील नाही. त्यामुळे हेक्टरादि ट्रोजन योद्ध्यांनी ग्रीक सेनेची चटणी-सांबार उडवणे यथास्थित सुरू केले. त्यातच कर्मधर्मसंयोगाने अकीलिसचा प्रिय मित्र पॅट्रोक्लीस हा हेक्टरकडून मेला. त्यामुळे चिडून अकीलिसने महायुद्ध सुरू केले आणि शेवटी हेक्टरला मारले. हेक्टर मरतो तिथे इलियडदेखील संपते. एकूणच , इलियड वाचताना जाणवत राहतो तो म्हणजे अकीलिसचा "नखरा". तुलनेने शौर्य इतके कुठे दिसून येत नाही.

     ही झाली एकपरिच्छेदी इलियडकथा. आता या कथेतले विस्तृत पदर बघू.

     यवनव्यास होमर आपल्या इलियडची सुरुवात करतो ती अकीलिस आणि अ‍ॅगॅमेम्नॉन यांमधील भांडणाने. ग्रीक सैन्यात प्लेग आलेला होता आणि टिपिकल मायसीनियन ग्रीक समजुतीप्रमाणे देवाला बळी अर्पण केल्याशिवाय त्याचे निवारण होणे अशक्य होते, कारण प्लेगचा प्रादुर्भावसुद्धा देवाच्या क्रोधामुळेच झाला होता. इथे देव आहे अपॉलो द फार डार्टर ऊर्फ भटक्या. ९०% ग्रीक देव हे झ्यूसची संततीच असतात तसाच हाही. हा तेव्हाचा धन्वंतरी म्हटला तरी चालेल. पण मग या धन्वंतरीसाहेबांना रागवायला काय झाले होते बरे असे?

     तर ग्रीकांच्या लुटीत ट्रॉयजवळचे ईतिऑन नामक एक शहर लुटले गेले, बायाही पळवून आणल्या गेल्या. त्यात अपोलोचा भटजी "क्रिसेस" याची देखणी कन्याही यवनांनी पळवली.क्रिसेसभट्ट मग यवनराज अ‍ॅगॅमेम्नॉनकडे गेले, आपल्या पोरीच्या सुटकेसाठी खूप याचना केली. पण तो कुठला ऐकतोय? दिले हाकलून. मग त्याने अपॉलोची प्रार्थना केली. आपल्या भक्तावरचा हा प्रसंग ऐकून अपॉलो आपले धनुष्यबाण घेऊन ऑलिंपस पर्वत दरदर उतरून आला आणि सपासप ग्रीकांना मारू लागला-म्हणजेच प्लेग आला. दिवसभर लोकांच्या चिता जळत होत्या.

     आता ग्रीकांचा धीर खचला. ताबडतोब सभा भरली. ग्रीकांचा मुख्य राजपुरोहित काल्खस याला कारण माहिती होते, पण सत्तेपुढे शहाणपण चालते थोडीच? त्यामुळे त्याने अकीलिसकडून अभय मागून घेतले. अकीलिसने "अगदी अ‍ॅगॅमेम्नॉन जरी तुझ्या जिवावर उठला तरी मी तुझ्या पाठीशी आहे" अशी ग्वाही दिल्यावर मग काल्खस सरळ मुद्द्यावर आला, आणि अ‍ॅगॅमेम्नॉनने क्रिसेसची मुलगी क्रिसीस हिला समारंभपूर्वक सोडून देऊन अपॉलोला बळी म्हणून बैल-बोकड अर्पण करावेत, असे तो बोलता झाला.

     यावर सर्व ग्रीकांनी आपली संमती दर्शवली, पण अ‍ॅगॅमेम्नॉन मात्र खवळला. बाकीच्या राजांनी आपले जनानखाने बाळगावेत आणि सर्वांच्या बॉसने मात्र तस्सेच बसून राहावे हे त्याला बिल्कूल पसंत नव्हते. जर अपॉलो देव चिडला असेल तर क्रिसीसला परत देऊ, पण मला रिप्लेसमेंट पाहिजे, असा त्याने धोशा लावला. त्यावर अकीलिसने त्याला लै शिव्या घातल्या. सर्व ग्रीसमध्ये पॉवरफुल असलेल्या अ‍ॅगॅमेम्नॉनला अशा तोंडावर शिव्या घालणे लैच डेअरिंगचे काम. ते ऐकून अ‍ॅगॅमेम्नॉनही चिडला, आणि क्रिसीस नाही तर अकीलिसची "ब्रिसीस" नामक रखेलच सही, असे म्हणून तिला अकीलिसपासून हिरावून घेण्याची धमकी दिली, वर "चड्डीत रहा, तुझी पायरी ओळख," असा दमही दिला.

--बॅटमॅन
(February 19, 2013)
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.02.2023-सोमवार.
=========================================