इतर कविता-(क्रमांक-132)-माझ्या मना बन दगड

Started by Atul Kaviraje, February 09, 2023, 10:50:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     इतर कविता 
                                   (क्रमांक-132)
                                  ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "इतर  कविता"  अंतर्गत  मी  इतर  कवींच्या  कविता  आपणापुढे  सादर  करीत आहे .

                                माझ्या मना बन दगड
                               -------------------

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव !
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड !
हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे !
रडणा-या रडशील किती ?
झुरणा-या झुरशील किती ?
पिचणा-या पिचशील किती ?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो !

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत !
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य !
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद !

बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी ?
काय तुझे हे निःश्वास
मरणा-याला देतील श्वास ?

आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे ?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज !
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार !
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड

– विंदा करंदीकर
---------------
--संकलक-सुजित बालवडकर
--------------------------

                  (साभार आणि सौजन्य-मराठी कविता.वर्डप्रेस.कॉम)
                 ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.02.2023-गुरुवार.
=========================================