मायबोली-लेख क्रमांक-14-डोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही

Started by Atul Kaviraje, February 12, 2023, 10:52:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मायबोली"
                                   लेख क्रमांक-14
                                  ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"डोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही"

                        डोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही--
                       ---------------------------------------

     खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाळा-कॉलेजच्या वर्षात आम्ही बिल्डींग मधली पोरं गच्चीवर क्रिकेट खेळायचो. त्या वेळेस चे पनवेल म्हणजे उंच इमारती नसलेलं आणि विशेष रहदारी नसलेलं देखील. कमी लोकांकडे गाड्या असल्यामुळे सबंध अवकाशात होर्नचा कोलाहल नसलेलं पनवेल. संध्याकाळी किंवा रात्री तीन मजल्यांच्या इमारतीच्या गच्चीवर देखील वरून जाणाऱ्या विमानाचा स्वछ आवाज ऐकू येणारे पनवेल! त्या वेळेस संध्याकाळी ६:३० च्या सुमारास घरापासून साधारण २० मिनिटे अंतरावर असलेल्या मशिदीतून अझान सुरु होयची. मशीद आणि आमची बिल्डींग ह्यांच्या मध्ये अनेक इमारतींचे अंतर नसल्यामुळे आणि एकंदर वातावरणात आवाज कमी असल्यामुळे ती अगदी स्पष्ट ऐकू यायची. आम्ही मुलं तिची अधून-मधून नक्कल करून मजा देखील उडवायचो. परंतु एकंदर मला ती ऐकायला आवडू लागली होती. संगीत आवडू लागले होते तेव्हा आणि एकंदर शांत करणारे संगीत नक्कीच प्रभावित करीत होते. एकदा गच्चीवर एकटा असताना 'हे काहीतरी अरेबिक वाटतंय' असे मी स्वतःला म्हणालो देखील होतो. कारण त्या दिवशी ते सूर मी फॉलो केले होते. नुसतं ऐकलं नव्हतं.

     मागच्या वर्षीची गोष्ट! ट्रेन ने सी.एस.टी ला जात होतो. ट्रेन बहुदा डॉकयार्ड रोड स्टेशनला थांबली आणि नेमकी तिथे अझान सुरु होती. एव्हाना माझी सांगीतिक प्रगती जरा बरी झाली असल्यामुळे मला त्या सुरावटींमध्ये 'राग सुहा/ दरबारी' ह्यांची झलक दिसली. मला एक संदर्भ माहिती होता की 'सुहा' हा मूळात अरेबिक शब्द आहे आणि सप्तर्षी ह्यांच्यातल्या 'अरुंधती' ताऱ्याला त्या भाषेत 'सुहा' असे म्हणतात. ह्याचा अर्थ 'lone star' असा वाचल्याचे देखील स्मरते. सहज डोक्यात विचार आला. 'राग' हे जर लोकसंगीतातून निर्माण झाले असतील ( संदर्भ: कुमार गंधर्व ह्यांचे विचार) तर सुहा हा राग किंवा त्याच्या आजूबाजूचे राग हे मध्य-पूर्वेतून आपल्याकडे आले असतील का? अशा विधानांना ठोस पुरावा कधीच मिळत नाही, परंतु काही सांगीतिक अनुभव किंवा संदर्भ ह्या विधानाला जोड देऊ शकतील असे तेव्हा उगीचच वाटले होते. दरम्यान असे देखील समजले होते की 'अडाणा' हा राग जो भारतीय शास्त्रीय संगीतात गायला/वाजवला जातो ते एक 'तुर्कस्थानातील' गावाचे नाव देखील आहे. माझी उत्सुकता अधिक वाढली. आणि मी ऐकून वेध घ्यायला सुरुवात केली.

     काल NCPA ला एक अनोखा कार्यक्रम झाला. उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचा तबला, ढाफेर यौसेफ ह्यांचे ऑऊड आणि हुस्नू सेनलेनडिरीकी ह्यांचे क्लेरिनेट असे एकत्रित वादन होते. ढाफेर हे ट्युनिशिया ह्या देशाचे आहेत तर हुस्नू हे तुर्कस्थानाचे! ह्या कार्यक्रमाची उत्सुकता झाकीरभाई ह्यांच्यामुळे तर होतीच परंतु मध्य-पूर्व आणि उत्तर-आफ्रिका ह्या भागातील कलाकार आणि त्यामुळेच संगीत अनुभवायला मिळणार ह्यामुळे देखील होती. कार्यक्रमाच्या आठवडा आधीपासून मी ह्यांना यु-ट्यूब वर ऐकत होतोच. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली आणि तीच गोष्ट काल प्रत्यक्ष कार्यक्रमात अनुभवायला मिळाली. हे संगीत भारतीय संगीतातील भीमपलास, काफी आणि किरवाणी ह्या रागांच्या प्रचंड जवळ जाणारे आहे. त्याच बरोबर चारुकेशी, जोग, दरबारी आणि काही प्रमाणात खमाज असे देखील राग डोकावतात. ढाफेर हा गातो देखील आणि ते गाणे म्हणजे तिथल्या सहारा वाळवंटातले मंत्रोच्चार आहेत. Desert Chants! त्या आवाजाला अशी काही फिरत आहे की तो अगदी वरच्या पट्टीतल्या सूरापर्यंत सहजरित्या पोहोचतो. त्या क्षणाला त्याचा आणि क्लेरिनेटचा आवाज असा काही बेमालूम मिसळतो की अंगावार शहारा आणि डोळ्यात पाणी हे कधी येते आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. हुस्नू ह्यांचे क्लेरिनेट हे Jazz अंगाने जाते परंतु त्या धून ज्या तो वाजवतो ते बरेच भारतीय संगीताच्या जवळ जाणारे आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाकीरभाई ह्यांनी आम्हाला ओळखल्या मुळे आम्ही प्रचंड उत्साहात होतोच. परंतु खऱ्या गप्पा ह्या कार्यक्रमा नंतर झाल्या.

--आशय गुणे
(15 February, 2016)
-----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.02.2023-रविवार.
=========================================