मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-100-भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5

Started by Atul Kaviraje, February 15, 2023, 10:48:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-100
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5"

                            भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5--
                           ---------------------------

     18 क्रमांकाच्या गुंफेचा व्हरांडा व आतील हॉल यांच्या सामाईक भिंतीच्या उजव्या कोपर्‍यात जाळीचे डिझाईन असलेले एक गवाक्ष खोदलेले आहे, त्या गवाक्षाच्या बरोबर खालच्या भिंतीवर आणि त्याच्या उजवीकडे मिळून आणखी काही विलक्षण बास रिलिफ शिल्पे दिसत आहेत. यापैकी 3 आकृत्या गवाक्षाच्या अगदी खाली कोरलेल्या आहेत. याशिवाय गवाक्षाच्या उजव्या खालच्या कोपर्‍याला लागून, शिंगे असलेले एक हरीण आपली मान वळवून बघत असल्याचे एक बास रिलिफ शिल्प आहे.

     हरिणाच्या शिल्पाखाली मागे कलून आणि दोन्ही हात मस्तकाच्या मागे घेऊन बसलेल्या एका बालकाचे शिल्प आहे. या बालकाचे डोळे मोठे, टपोरे आहेत. अनेक रिंगा गुंफलेली कर्णभूषणे कानात आहेत व उजव्या हातात 4 कंगणे दाखवलेली आहेत. त्याच्या कपाळावर एक रत्नखचित पट्टा किंवा मुगुट आहे व मस्तकामागे नेलेल्या उजव्या हातात त्याने एक काठी धरलेली आहे. बासरी हातात धरलेल्या बाळकृष्णाचे जे एक चित्र आपल्याकडे काढले जाते त्या चित्राशी मला या शिल्पाचे अतिशय साम्य वाटते आहे. या बालकाच्या डाव्या बाजूला मोठे राक्षसी डोळे आणि जबडाभर असलेले भलेथोरले दात वासून हिंस्त्र हास्य करणार्‍या एका लठ्ठमुठ्ठ राक्षसीचे शिल्प आहे. (या राक्षसीचा चेहरा तिबेटी चित्रांमधे सिंहाचा म्हणून काढतात काहीसा तसाच आहे.) या राक्षसीने आपल्या उजव्या हातात एक कुर्‍हाड धरलेली असून ती त्या कुर्‍हाडीने तिच्या उजव्या बाजूला असलेल्या बालकावर हल्ला करण्याच्या तयारीत वाटते आहे. ही राक्षसी व हरीण यांच्या मध्ये असलेले शिल्प अत्यंत अस्पष्ट आहे. माझ्या मते ते बहुधा एथना या ग्रीक देवतेचे घुबड असावे असे वाटते आहे.

     हरीणाच्या शिल्पाच्या वरच्या बाजूला असलेले शिल्प अत्यंत अस्पष्ट झालेले आहे. एकूण आकारावरून एखाद्या राक्षसाचे ते असावे असे वाटते. हा राक्षस बहुधा त्याच्या बाजूला असलेल्या रथाचे (खाली वर्णन केलेल्या) चाक धरून तो रथ थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे असे वाटते.

--चंद्रशेखर
(February 12, 2013)
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.02.2023-बुधवार.
=========================================