मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-101-भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5

Started by Atul Kaviraje, February 16, 2023, 10:41:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-101
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5"

                              भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5--
                             ----------------------------

     या राक्षसाच्या वरच्या बाजूस एका घोड्यावर आरूढ असलेल्या असलेल्या शिलेदाराचे शिल्प आहे. या स्वाराने आपले पाय रिकिबीमध्ये अडकवलेले आहेत. घोड्याच्या तोंडावर लगाम अडकवलेला असून त्याची टोके स्वाराने आपल्या डाव्या हातात धरलेली आहेत तर आपल्या उजव्या हातात त्याने एक भाला धरलेला आहे. घोड्याच्या मानेच्या खालच्या बाजूस मण्यांनी सजवलेला एक पट्टा आणि डोक्यावर मोरपीसांचा तुरा आहे. शिलेदाराच्या अंगावर गुढग्यापर्यंत येणारे धोतर आहे आणि डोक्याला मुंडासे गुंडाळलेले आहे. आहे. कानात लांब लोंबकळणारी कर्णभूषणे, हातात कंगण व गळ्यात एक मण्यांची माळ आहे. घोड्याला ज्या अलंकारानी सजवले आहे ते अलंकार या वेळेस बहुधा अतिशय प्रचलित असावेत कारण पितळखोरे गुंफांत मिळालेल्या एका बास रिलिफ शिल्पात दाखवलेल्या घोड्याच्या अंगावरही असेच अलंकार मी बघितले होते.

     या घोडेस्वाराच्या उजव्या हाताला असलेले शिल्प याच चित्राचा भाग असले तरी ते व्हरांड्याच्या उजव्या टोकाच्या भिंतीवर कोरलेले आहे. या शिल्पात, 4 अश्व ओढत असलेल्या एका रथात, उभा असलेला एक राजा दाखवलेला आहे. राजाच्या डोक्यावर एक रत्नजडित मुगुट व गळ्यात दुहेरी पदर असलेला हार आहे. राजाच्या बाजूला रथातच, दोन स्त्रिया उभ्या आहेत. राजाच्या डाव्या अंगाला असलेली स्त्री त्याच्या डोक्यावर एक छत्र धरून उभी आहे तर उजव्या अंगाला असलेली स्त्री त्याच्यावर चवरी ढाळत आहे. दोन्ही स्त्रियांच्या कानात लोंबकळणारी कर्णभूषणे, गळ्यात रत्नजडित हार आणि कंबरेला कंबर पट्टे आहेत. रथाच्या बाजूस घोड्यावर आरूढ असलेला आणखी एक शिलेदार दिसतो आहे. वर वर्णन केलेल्या शिलेदाराप्रमाणेच हा शिलेदार कोरलेला आहे.

     राजाचा रथ दोन राक्षसांच्या पाठीवरून मार्ग काढताना दाखवला आहे. कदाचित हे राक्षस राजाचे अपहरण करून त्याला आपल्या पाठीवरून घेऊन जाताना दाखवले असण्याची सुद्धा शक्यता वाटते.

     व्हरांड्याच्या उजव्या टोकाच्या भिंतीमध्ये जी भिख्खूंची कोठडी खोदलेली आहे त्याच्या एका बाजूला वर वर्णन केलेले शिल्प आहे तर दुसर्‍या बाजूला एक मोठे विलक्षण चित्र कोरलेले आहे. या चित्राचा मध्यवर्ती बिंदू हा हत्तीवर स्वार झालेला एक महाराजा आहे. या राजाच्या गळ्यात, त्याच्या पायापर्यंत लांबी असलेले फुलांचे अनेक हार दिसत आहेत. त्याच्या दंडावर कोपरापर्यंत येणार्‍या फुलांच्या पोची आहेत. त्याने आपल्या उजव्या हातात हत्तीची पराणी धरलेली आहे तर डाव्या हाताने त्याने आपल्या छातीजवळ असलेला फुलांचा हार धरून ठेवला आहे. त्याच्या मागे एक पुरुष व्यक्ती हर्त्तीवर आरूढ असून त्या व्यक्तीने बौद्ध पद्धतीचे दुहेरी त्रिशूळ हातात धरलेले आहे. हतीने आपल्या सोंडेत एक झाड पकडलेले आहे.

--चंद्रशेखर
(February 12, 2013)
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.02.2023-गुरुवार.
=========================================