मायबोली-लेख क्रमांक-18-पद्मा आजींच्या गोष्टी ७ : अज्ञात गृहस्थ

Started by Atul Kaviraje, February 16, 2023, 10:45:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मायबोली"
                                     लेख क्रमांक-18
                                    ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"पद्मा आजींच्या गोष्टी ७ : अज्ञात गृहस्थ"

                          पद्मा आजींच्या गोष्टी ७ : अज्ञात गृहस्थ--
                         ---------------------------------

     मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

     तुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.

     ही गोष्ट तशी फार जुनी आहे. तेव्हा माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीच्या लग्नाचा विषय चालला होता. माझे वडील तिच्यासाठी स्थळे बघत होते. पण कुठे काही जमत नव्हते. त्याच दरम्यान माझे मोठे काका, जे गोंदियाला जेठाभाई माणिकलाल शाळेचे मुख्याध्यापक होते ते संघाचे कार्यकर्ते असल्याने तुरुंगात गेले होते. फार कट्टर स्वयंसेवक होते. तेव्हा संघाचे कार्यकर्ते बऱ्याच वेळा तुरुंगात असायचे.

     अश्याच त्या दरम्यान, एकदा माझे वडील कोर्टात जायच्या तयारीत होते. सकाळचे पक्षकार नुकतेच गेलेले, त्यामुळे वडिलांची कोर्टाची तयारी चालू होती.

     तेवढ्यात आमच्या लाकडी जिन्याचा आवाज झाला. आम्ही तेव्हा अनगळ वाड्यात राहायचो. आमचा जिना फारच कुरकुरे. त्यामुळे कोणी आले किंवा गेले तर लगेच समजायचे.

     वडील बघतात तर काय, एक गृहस्थ वर आले. चांगले उंच, पागोटेवाले, कपाळाला मोट्ठे गंध. वडिलांना वाटले पक्षकार आहे. म्हणून त्यांनी म्हटले आता काही भेटणे शक्य नाही कारण कोर्टाची वेळ झाली आहे.

     तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, 'वकील साहेब, जर पाणी पाहिजे. देता का?'
'अहो, पाणीच काय? या जेवायला. मी बसतोच आहे.'

     तो नाही नाही म्हणत असताना वडिलांनी आग्रह केला म्हणून थांबला. वडिलांनी मला सांगितले कि आईला म्हणा एक ताट अजून वाढ. तेव्हा आमच्या कडे जेवायला कोणीन कोणी असायचे, म्हणून आईनेहि काही न विचारता ताट मांडले.

     जेवण शांततेत झाले. मीच वाढत होते त्यांना. जेवण झाल्यावर त्या गृहस्थाने विचारले कि वकील साहेब तुम्ही कुठल्या तरी काळजीत दिसत आहात. सुरुवातीला वडिलांनी टाळले कारण त्यांना उशीर होत होता. पण जेव्हा त्याने परत विचारले तेव्हा वडिलांनी सांगितले कि मोठ्या भावाची काळजी आहे तुरुंगात असल्यामुळे.

     तो गृहस्थ म्हणाला काही काळजी करू नका. मी सांगतो ती तारीख लिहून ठेवा. त्या दिवशी सुटेल म्हणजे सुटेल. वडिलांनी फार काही आश्चर्य दाखविले नाही. तो माणूस पुढे म्हणाला तुम्हाला मुलीच्या लग्नाची काळजी आहे का? तेव्हा मात्र वडिलांनी सांगितले. 'हो हो लग्न जुळत नाही आहे. बरेच प्रयत्न केले.'

     तो गृहस्थ लगेच म्हणाला अहो, तुम्ही तर भेटला तुमच्या जावयाला दोन दिवसा पूर्वी. ट्रेनमध्ये. नागपूरच्या. तुमच्या शेजारीच बसला होता कि. तुम्ही बोलला त्याच्याशी.
वडिलांनी लगेच चाचपून विचारले. "तुम्हाला कसे माहिती? तुम्ही काय ज्योतिषी आहात का?'

     तेव्हा तो हसला. व म्हणाला, 'अहो थोडा विचार केला कि समजते सगळे. जोतिष्य कशाला पाहिजे त्याला. चला तुम्हाला हि उशीर होतो आहे. निघतो मी."

     असे म्हणत तो जिना उतरू लागला. वडील त्याला काहीतरी पुढे विचारायचे म्हणून घाईघाईत मागे गेले तर काय, त्या माणसाचा पत्ता नाही. जिना हि पूर्ण उतरला नव्हता तो. कारण आवाजावरून समजायचे कि अजून पायऱ्या शिल्लक होत्या.

     वडिलांनी लगेच माझ्या भावाला पाठविले शोधायला. पण तोही परत आला, म्हणत कि कुठेही दिसला नाही तो. वाड्या समोर दोन तीन भाजीवाले असायचे. त्यांना विचारले तर म्हणे कोणी माणूस खाली उतरलाच नाही. जणू हवे मध्ये गायब झाला तो.

     झाले आम्ही नंतर विसरूनही गेलो सगळे. परंतु जेव्हा दोन महिन्यांनी काका सुटला तुरुंगातून तेव्हा परत आठवण झाली. कारण त्याने जी तारीख सांगितली होती, बरोबर त्या तारखेलाच सुटला होता काका.

     त्या नंतर मात्र वडिलांनी त्या माणसाने सांगितलेल्या स्थळासाठी प्रयत्न केले आणि बहिणीचे लग्न तिथे जुळले सुद्धा पटकन. तेव्हा वडील सगळ्यांना त्या माणसाची गोष्ट सांगायचे व गोष्ट सांगताना नमस्कार करायचे.

     मला माहित आहे लग्नाच्या दिवशी वडिलांनी एक पान शेजारी मांडून ठेवले होते -- त्या माणसासाठी.

     गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

--पद्मा आजी
(3 March, 2016)
-------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.02.2023-गुरुवार.
=========================================