II निबंध-लेखमाला II-जीवनातील विनोदाचे महत्व, स्थान

Started by Atul Kaviraje, February 17, 2023, 10:46:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II निबंध-लेखमाला II
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून, निबंध-लेखमाला सुरु करीत आहे, निबंध-लेखमाला या मथळयI-अंतर्गत, सादर करीत आहे, (निबंध क्रमांक-5), आजच्या निबंधाचे शीर्षक आहे- "जीवनातील विनोदाचे महत्व, स्थान"

     आपल्या या दैनंदिन जीवनात विनोदाला खूप महत्वाचे स्थान आहे. आजच्या या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात विनोद खूपच महत्वाचे आहेत. या विनोदांमुळेच आपण एक सुखी आनंदी जीवन जगत आहोत आणि यापुढेही जगू शकतो. त्यासाठी दूरदर्शनवर आणि रेडिओवरही विनोदाशी निगडित अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि या धकाधकीच्या जीवनात आपण वेळ काढून ते पाहतो. खरच सर्वांनीच हे विनोदी कार्यक्रम पाहिले पाहिजेत ज्यामुळे आपले जीवन आणखीनच आनंदी आणि सुखी होईल.

     ह्या लेखामध्ये आम्ही मानवी जीवनात विनोदाचे महत्व, जीवनात विनोदाचे स्थान या विषयावर मराठी निबंध, भाषण, लेख, परिच्छेद दिला आहे. हा लेख तुम्हाला निबंध वक्तृत्व स्पर्धेमध्ये, तसेच गृहपाठामध्ये जीवनात विनोदाचे महत्व या विषयावर निबंध, भाषण तयार करण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

     जीवनातील विनोदाचे महत्व, स्थान मराठी निबंध, भाषण, लेख
"विनोद हा जीवनातील असंख्य दुःखांवरचा जालीम इलाज आहे"," विनोद ही साहित्यातील अहिंसा आहे," असे आचार्य अत्रे म्हणत. अगदी सहजगत्या हसत हसत विनोदाच्या साहाय्याने इतरांच्या दोषांवर बोट ठेवता येते. मराठीतील अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यात विनोदाचा असा मार्मिक उपयोग केला आहे. दरवर्षी भरणाऱ्या साहित्यसंमेलनातील व्यर्थ गोष्टींवर टीकेचा प्रहार करण्यासाठी कोल्हटकरांनी 'चोरांचे संमेलन' भरवले, ते देखील याच हेतूने.

     आयुष्यातील दुःखांचे हसून विस्मरण करणे हा खरा विनोदाचा उद्देश आहे. ज्या विनोदात हास्य आणि अश्रू एकत्र येतात तो विनोद म्हणजे 'सर्वश्रेष्ठ विनोद'. सध्याचे हे धकाधकीचे जीवन खूपच ताणतणावाचे झाले आहे त्यावर जालीम उपाय म्हणजे विनोद. या विनोदांमुळेच आपल्या जीवनातील ताणतणाव कमी होऊन जीवन सहज आणि सुंदर बनते. विनोदामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे काम अगदी व्यवस्थित होते. विनोदामुळेच आपला मेंदू तल्लख बनतो.आपल्याला देवाने अनेक देणग्या दिल्या आहेत त्यापैकी एक मौल्यवान आणि महत्वाची देणगी म्हणजे हास्य.

     जीवनात सदा सुखी आणि आनंदी तर जगत कोणीही राहू शकत नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काहीतरी अडचणी ह्या येतातच. आपल्या जीवनात या सर्व दुःखातून आणि अडचणीतून आपल्याला दिलासा देणारे  एकच साधन आहे ते म्हणजे हास्य. ज्यामुळे आपल्या मनाचे आरोग्य उत्तम राहते. जगात आपल्या सभोवताली अनेक हास्याचा साठा असतो पण आपला बघण्याचा दृष्टिकोन हा हास्याचा असला पाहिजे. जर सर्वांचाच बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर आपले जीवन हे सुखी आणि आनंदी नक्कीच होईल.

     अनेकदा विनोदाच्या मदतीने जीवनातील दुःखाची तीव्रता कमी करता येते. सुप्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांनी रेखाटलेल्या 'व्यक्ती आणि वल्ली' या व्यक्तिचित्रांतील अनेक व्यक्ती आपल्या दुःखांना विनोदाचे अवगुंठन घालून त्याची तीव्रता कमी करतात. पु.लं. च्या या व्यक्तिरेखांतून 'विनोद आणि कारुण्य' यांचा मनोज्ञ संगम पाहून वाचकाची अवस्था 'ओठांवर हसू आणि डोळ्यात आसू' अशी होते. म्हणूनच कुणा समीक्षकाने विनोदाला 'वाळवंटातील हिरवळ' म्हटले आहे. विनोदाच्या गुलाबपाण्याच्या शिडकावा मन प्रसन्न करतो.

     बालकांच्या निरागस जीवनातील विनोदाला व हास्याला आगळे स्थान असते. म्हणून तर सर्कशीतील विदूषकांच्या नुसत्या हातवाऱ्यांनाही ती खुदुखुदू हसू लागतात आणि विदूषकांच्या 'मर्कटलीला' सुरु झाल्या म्हणजे त्यांचा आनंद अगदी उतू जातो. टॉम व जेरी यांच्या माकडचेष्टा त्यांना हसून हसून लोळायला लावतात. अशा वेळी स्वतःला 'प्रौढ व मोठी' समजणाऱ्या माणसांनाही हसू आवरत नाही. जीवन सुसह्य होण्यासाठी खेळकरपणा अत्यंत आवश्यक असतो, हेच येथे दिसून येते.

     राम गणेश गडकरी यांनी 'बाळकराम' बनून समाजातील दांभिक प्रवृत्तीला आपल्या विनोदी लेखातून रेशमी चिमटे काढले. त्यासाठी त्यांनी कवींचा कारखाना उघडला ठकीच्या लग्नाची मोहीम उघडली, तर गृहिणींना मौलिक पदार्थांची पाककृती शिकवली. येथे विनोद हे सामाजिक प्रबोधनाचे किती प्रभावी साधन आहे, हे स्पष्ट होते. तेच काम श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी 'सुदाम्याचे पोहे' लिहून केले. सदा हसणारी व दुसऱ्यांना हसवणारी माणसे सर्वांना हवीहवीशी वाटतात, हेच जीवनातील विनोदाचे महत्व आहे.

--अजय चव्हाण
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कॅम्पस जुगाड.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.02.2023-शुक्रवार.
=========================================