मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-102-भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5

Started by Atul Kaviraje, February 17, 2023, 10:50:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                   लेख क्रमांक-102
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5"

                             भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5--
                            ---------------------------

     या हतीच्या सभोवती अनेक पुरुष, स्त्रिया आणि पशु-पक्षी यांची चित्रे कोरलेली आहेत. या चित्रात मला एक बोधि वृक्ष, एक वाद्य वाजवत असलेली एक पुरुष व्यक्ती व एक नर्तिका हेओळखू येतात. या चित्रातून काहीतरी बोधपर कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे नक्की! माझ्या मताने ही कथा साधारण अशी असावी. एका राजावर राक्षसांनी हल्ला करून ते त्याला पळवून नेत आहेत. भगवान बुद्ध येऊन त्या राक्षसांचा नाश करतात. अर्थात हे राक्षस म्हणजे दुष्ट किंवा पापी विचार असले पाहिजेत. व बुद्धांच्या शिकवणीने त्यांचा समूळ नायनाट होतो; असे सूत्र या गोष्टीमागे बहुधा असावे.

     भिंतीवरील शिल्पचित्रे बघून झाल्यावर माझे छताकडे लक्ष जाते आहे. अगदी छताजवळ आळीपाळीने स्तूप व काही आकृती (बहुधा यक्षांच्या) यांची शिल्पे कोरलेला एक सलग पट्टा व्हरांड्याच्या 3 बाजूंना कोरलेला दिसतो आहे. या शिवाय पायर्‍या-पायर्‍यांचे डिझाईन असलेला एक सलग पट्टाही येथे छताला लागून कोरलेला आहे. छताला एक चतुर्थांश वर्तुळाकार कमानीचा आकार दिलेला आहे व त्यात अनेक वक्राकार तुळया कोरल्याने छत कप्याकप्यांचे दिसते आहे.

     या गुंफेला अनेक लेखकांनी सूर्यदेवाचे मंदिर असे नाव दिलेले आहे. परंतु असे नाव का दिले असावे हे समजणे कठीण आहे. ही गुंफा म्हणजे एक बौद्ध विहार आहे हे उघड आहे. मात्र या गुंफेचे वैशिष्ट्य म्हणजे व्हरांड्यातील भिंतीवर असलेली व अतिशय बारकावे दर्शवणारी शिल्पे, असे खात्रीने म्हणता येईल.

     भाजे येथील माझी भेट आता संपलीच आहे. सातवाहन कालात खोदलेल्या आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या बहुतेक महत्त्वाच्या बौद्ध गुंफांना आणि दक्षिणेकडे असलेल्या बनवासी येथील मधुकेश्वर मंदिराला मी आता भेट दिली आहे. मात्र माझ्या हातातील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला उत्तर व पूर्वेकडे असलेल्या आणखी 3 स्थळांना भेट द्यायची आहे. मात्र ही तिन्ही स्थळे महाराष्ट्राच्या बाहेर आणि बर्‍याच दूर अंतरावर आहेत. अर्थात यावरून सातवाहन साम्राज्य किती दूरपर्यंत पसरलेले होते हे खचितच लक्षात आल्यावाचून रहात नाही.

--चंद्रशेखर
(February 12, 2013)
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.02.2023-शुक्रवार.
=========================================