मायबोली-लेख क्रमांक-22-अर्धा-दशक लहान बायको - भाग १

Started by Atul Kaviraje, February 20, 2023, 10:19:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मायबोली"
                                     लेख क्रमांक-22
                                    ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"अर्धा-दशक लहान बायको - भाग १"

                           अर्धा-दशक लहान बायको - भाग १--
                          -------------------------------

" गुड मॉर्निंग...", मी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. " छान होता ना मेसेज ... आताच आला मला", समोरच्या दृश्याचा फोटो काढीत हिने माझ्या नैसर्गिक शुभेच्छांचा निकाल लावला. आणि ' मी तुला फोटोच्या नव्हे खऱ्या शुभेच्छा देतो आहे' असं मी सांगेपर्यंत ७ फोटो काढून झाले होते. मीच तो नाद सोडून दिला. त्यानंतर रोज सकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान माझ्या फोन मध्ये त्याच्या शेजारी ठेवलेल्या फोन मधून शुभ सकाळ वगेरे चे मेसेज येऊ लागले.

     पण इथपर्यंत भागलं नाही. माझ्या फोन मध्ये आता काही नव्या मेसजेस नी देखील शिरकाव करायला सुरुवात केली होती. ह्यांची विशेषता अशी की हे संदेश काही विशिष्ट व्यक्तींच्या भोवतीच विणले जायचे. त्यात डॉ. कलाम, अब्राहम लिंकन आणि स्वामी विवेकानंद ह्यांचा सामावेश होता. मला खात्री आहे की ही माणसं आज जर जिवंत असती तर त्यांनी ह्या सर्वांवर अब्रु-नुकसानी पासून चुकीची माहिती पसरवल्याचा खटला नक्कीच भरला असता. म्हणजे I am not handsome but I can give my hand to someone who need help... Because beauty is required in heart not in face....असं कलाम कधी म्हणाले असतील असं वाटत नाही. हिच शिक्षा विवेकानंदांना देखील दिली होती. म्हणजे एक इंग्रज माणूस विवेकानंदांना विचारतो की तुमच्या देशात स्त्रिया 'shake hand' का करत नाही? तेव्हा विवेकानंद त्याला उलटा प्रश्न विचारतात की तुमच्या देशात तुम्ही राणीला 'shake hand' करता का .... आमच्या देशात प्रत्येक स्त्री राणी सारखी आहे --- गुड मॉर्निंग, असा तो संदेश पाहून मी चकित झालो. मला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण झाली. काही मोठ्या लोकांनी ( काका वगेरे) WhatsApp वर ग्रुप काढलेला. अजून देखील आहे. पण त्यात मी नाहीये. त्यात देखील अशाच संदेशांचा भडीमार होयचा. काही लोकसंगीत प्रकार कसे त्याचा कवी माहिती नसतो पण ती वर्षानुवर्ष पुढे सरकत आपल्या पर्यंत येतात तसंच बहुदा ह्या संदेशांचे पुढे होणार आहे. मी दहावी-अकरावीत असताना ( म्हणजे बारा वर्षांपूर्वी) ई-मेल चेक करायला महिन्यातून एकदा सायबर कॅफे मध्ये जावे लागे. तेव्हा काही फार महत्वाची ई-मेल येत नसत , नुसती फॉरवर्ड असत. त्यात एक ई-मेल असे सांगायचे की भारतातील राष्ट्रगीताला UNESCO ने जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत म्हणून सन्मानित केलंय. बारा वर्षांनी जेव्हा WhatsApp वर हाच मेसेज एका काकाने फॉरवर्ड केल्यावर मी सभात्याग करतात तसा ग्रुप-त्याग केला! इतकी वर्ष झाली तरी वाजपायी ह्यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग आणि आता मोदी हे कुणीच हा सन्मान स्वीकारायला गेले नाहीत ही साधी गोष्ट कुणाच्याही लक्षात न यावी? पण काका लोकांचं ठीक आहे. त्यांच्या हातात एकदम हे तंत्रज्ञान आले. पण शाळेपासून मोबाईल बरोबरच मोठ्या झालेल्या माझ्या बायकोला देखील अशा मेसेजसची चिकित्सा करावी वाटू नये ह्याचे मला आश्चर्य वाटले.
परंतु आश्चर्य वाटण्याची ही एक सुरुवात होती असं मला काही दिवसात कळलं. कोचीहून आम्ही आता मुन्नारला आलो होतो. तिथे आम्हाला जे हॉटेल मिळाले होते ते एकदम डोंगरात बसलेले असे होते. तिथली ती शांतता आठवली ना की आपण शहरात जन्माला आलोय ह्याचा प्रचंड पश्चाताप होतो! डोंगराचा तो भाग 'U' ह्या आकाराचा असल्यामुळे दोन बाजूंमध्ये प्रचंड मोकळी जागा होती. आमचं हॉटेल एका बाजूला तर दूर दुसऱ्या बाजूला पायथ्याशी एक मंदिर होते. परंतु परिसर इतका शांत की दूर मंदिरात लावले गेलेले दाक्षिणात्य संगीत अगदी स्पष्ट ऐकू येत होते. मी त्या जागेचा शांत उभं राहून, डोळे मिटून अनुभव घेताना हिने नेहमीप्रमाणे फोटो मोहीम सुरु केलीच! त्या दिवशी रात्री जेवायला बसलो होतो.

--आशय गुणे
(2 October, 2015)
--------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.02.2023-सोमवार. 
=========================================