मायबोली-लेख क्रमांक-23-अर्धा-दशक लहान बायको - भाग १

Started by Atul Kaviraje, February 21, 2023, 09:45:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मायबोली"
                                   लेख क्रमांक-23
                                  ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"अर्धा-दशक लहान बायको - भाग १"

                          अर्धा-दशक लहान बायको - भाग १--
                         -------------------------------

" काय शांत परिसर आहे ... मुंबईला जावेच वाटत नाही ", मी म्हणालो. ही मोबाईल मध्ये काहीतरी टाईप करत होती. त्यामुळे माझ्याकडे न बघता 'हं' एवढा प्रतिसाद आला. त्यामुळे काही सेकंदांनी मी देखील माझे सूप चे बाउल न्याहाळू लागलो. आणि तेवढ्यात ...
" ओह्ह्ह .... मोदी... "
टी.वी वर पंतप्रधान कुठेतरी बोलत होते त्याची बातमी दाखवत होते.
" तुला आवडतं का राजकारण?" मी विचारलं.
" ओह्ह प्लीज ... नाही आवडत ... खूप बोरिंग आहे पॉलीटिक्स", ती म्हणाली. " बट आय फाईंड मोदी वेरी कूल ", हे देखील पुढे जोडले तिने.
पंतप्रधान कूल कसे असू शकतात हा विचार मी मनात दाबून धरला.
" पण तुला माहितीय का .... मी वोट द्यायला गेले होते ना.... तर मला लिस्ट मध्ये मोदींचे नाव कुठेच दिसले नाही... ... आय वॉस सो कंफ्युज्ड..."

     पुढच्या क्षणी मला पाणी द्यायला धावलेल्या दोन वेटर्सना मी खुणेने मागे सारले होते. इतका प्रचंड ठसका लागला होता मला. पुढे मला सांगितले गेले की नेमके तिला कमळ असलेले बटण दाबा ही जाहिरात आठवली आणि कदाचित ते म्हणजे मोदी असं समजून तिने आपले मत व्यक्त केले होते. आणि तिच्या सुदैवाने ते बरोबर निघाले. मी हे सारे ऐकून घेतले. मग तिला समजवायला सुरुवात केली की कमळ ही भाजपची निशाणी आहे. आणि तू मत मोदींना नाही तर भाजपला दिले आहेस. त्यानंतर खासदार कोण, आमदार कोण आणि मोदी निवडणुकीला कुठून उभे होते वगेरे सर्व मी तिला समजावले. मोबाईल कडे पाहणे आणि माझ्याकडे पाहणे ह्याचा समन्वय साधत मान खाली-वर करीत ती सारे ऐकत होती. मागच्या निवडणुकीच्या वेळेस ती १७ वर्षांची असल्यामुळे तिची मत द्यायची संधी हुकली होती. राज्याच्या आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत तिला रस नव्हता. त्याचे कारण तिच्या शब्दात सांगायचे तर 'तेव्हा फेसबुक, ट्विटर नसल्यामुळे मला काहीही माहिती नव्हते'.

" मी गाडी चालवते तर रस्त्यावर खड्डे असतात.... आमच्या घरी पुण्यात २४ तास पाणी येत नाही... गाडी चालवते तर सारखा ट्राफिक असतो ... सो मी ठरवले की आता चेंज हवा ", तिने शेवट केला.
" पण ह्यातली कोणती कामं केंद्र सरकार करतं?" मागवलेल्या आईस-क्रीमचा फोटो काढून WhatsApp वरून पाठवणे हे माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर होते. त्यामुळे विषय तिथेच संपला. तो अजून सुरु राहिला असता तर कदाचित मी तिला सोशल मिडियाच्या पलीकडे जाउन रोजचा पेपर वाच वगेरे सांगणार होतो. परंतु ज्या प्रकारे सोशल मिडियावर चाललेल्या चर्चा अचानक संपतात (किंवा संपवल्या जातात) तसा आमचा हा विषय संपला.

--आशय गुणे
(2 October, 2015)
--------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.02.2023-मंगळवार.
=========================================