कुमार मराठी विश्वकोश-अंकुशकृमी (Hookworm)

Started by Atul Kaviraje, February 21, 2023, 09:51:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "कुमार मराठी विश्वकोश"
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अंकुशकृमी (Hookworm).

                              "अंकुशकृमी (Hookworm)"
                             ----------------------------

                    अंकुशकृमी--

     तोंडामध्ये अंकुश अथवा आकडे असलेल्या परजीवी, अपायकारक कृमीला 'अंकुशकृमी' म्हणतात. अंकुशकृमी हा सूत्रकृमी (नेमॅटोडा) संघातील असून याचे शास्त्रीय नाव अँकिलोस्टोमा ड्युओडिनेल आहे. नर आणि मादी कृमींच्या मुखात दातासारखे लहान-लहान चार अंकुश असतात. नर कृमींची लांबी ८-११ मिमी. आणि जाडी ०.४ -०.५ मिमी. असते. मादी कृमीची लांबी ११ -१३ मिमी. आणि जाडी ०.६ मिमी. असते.

     मातीत असलेल्या अंकुशकृमींच्या अंड्यांपासून डिंभ (अळ्या) तयार होतात. हे डिंभ कात टाकतात  ते मातीतून चालणा-या माणसाच्या त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. रक्ताद्वारे ते फुप्फुसात जातात. तेथून श्वासनलिकेतून तोंडात पोचतात आणि गिळले जातात. अशा रीतीने ते आतड्यात पोचतात. साधारण पाच आठवड्यांनंतर हे डिंभ पोसले जाऊन तेथे त्यांची वाढ होते. आतड्यात नर आणि मादी यांच्या समागमापासून उत्पन्न होणारी फलित अंडी मलावाटे बाहेर पडतात. अशा प्रकारे अंकुशकृमींचे जीवनचक्र पूर्ण होते. या कृमीमुळे मानवाला होणा-या रोगास 'अंकुशकृमी रोग' म्हणतात. तोंडातील अंकुशांद्वारे तो आतड्याच्या आतील भागाला चिकटून तेथून रक्त शोषून घेत असल्यामुळे हा रोग होतो.

     माणसाच्या त्वचेत डिंभाचा प्रवेश होतेवेळी पायाला, (विशेषतः बोटांमधील बेचक्यांना) खाज सुटून फोड येतात. फुप्फुसांमधून जात असताना खोकला, कफ आणि ज्वर ही लक्षणे दिसतात. एकाच वेळी हजारो कृमी आतड्यात असल्यामुळे व ते वारंवार जागा बदलत असल्यामुळे आतड्यातून पुष्कळ रक्त शोषले जाते; व आतड्याच्या आतील भागातून ते वाहत राहते. त्यामुळे पंडुरोग होतो. काही वेळा मृत्यूही संभवतो. गंभीर संसर्गात रुग्णाच्या शरीरातून   दिवसाला साठ लाख अंडी बाहेर पडतात. अंकुशकृमी १० वर्षांपर्यंत जगू शकतात.२००८ साली जगभर जवळपास जगभर जवळपास ७० कोटी लोक या रोगाने ग्रासले गेले होते. हा रोग उष्णकटिबंधात जास्त प्रमाणात आढळतो. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये हा रोग पटकन पसरतो.

     अंकुशकृमी रोगावर महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय म्हणजे नेहमी स्वच्छ राहणे. औषधाने हा रोग बरा होतो. टेट्राक्लोरोएथिलीन व थायबेंझॉल अशी ओषधे या रोगावर उपयुक्त ठरतात.

====================
अंकुशकृमी (Hookworm)
Post published:26/06/2019
Post author:अरविंद सवाने
Post category:कुमार विश्वकोश /प्राणी
====================

--मराठी विश्वकोश
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.02.2023-मंगळवार.
=========================================