कुमार मराठी विश्वकोश-अंजीर (Common fig)

Started by Atul Kaviraje, February 23, 2023, 09:59:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "कुमार मराठी विश्वकोश"
                                ----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अंजीर (Common fig).

                               "अंजीर (Common fig)"
                              -------------------------

     वड, पिंपळ, उंबर या वनस्पतींच्या मोरेसी कुलातील हा वृक्ष असून याचे शास्त्रीय नाव फायकस कॅरिका असे आहे. हा पानझडी वृक्ष मूळचा भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील  आहे.

     अंजीर या वृक्षाची उंची सुमारे ३-१० मी. पर्यंत आढळते. याच्या फांद्या मऊ आणि राखाडी रंगाच्या असतात. पाने सु. १२-२५ सेंमी. लांब आणि सु. १०-१८ सेंमी. रुंद असून ती हृदयाकृती, किंचित खंडित व दातेरी असतात. अंजिराचे फळ ३-५ सेंमी. लांब असून प्रत्यक्षात तो फुलांचा गुच्छ आहे. या कपासारख्या पुष्पविन्यासामध्ये असंख्य एकलिंगी नर, मादी व अलिंगी फुलांची मांडणी असते. तोंडाकडील भागात नरफुले असतात तर खालच्या भागात मादीफुले असतात. तोंडाकडील बारीक छिद्रांमधून वरट (ब्लॅस्टोफॅगा) नावाच्या लहान कीटकाची मादी कपामध्ये प्रवेश करते. मादी कीटक थेट खालच्या भागातील मादीफुलाकडे जाते. तिच्या अंगाला चिकटलेले व दुस-या पुष्पविन्यासातील नरफुलाकडून आणलेले परागकण मादीफुलांवर पडून परपरागण होते. यावेळी कीटकाची मादी काही मादीफुलांमध्ये अंडी घालते. या अंड्यांपासून नवीन पिढी निर्माण होते. यांत काही नर तर बहुसंख्य माद्या असतात. त्यांचे मीलन आतच होते. मीलनानंतर नर मरून जातात. कीटकाच्या फलित माद्या नरफुलातील पराग घेऊन दुस-या मादीफुलाकडे जातात. पुष्पविन्यासाचे रूपांतर संयुक्त, औंदुबर प्रकारच्या फळात होते. मूळचा हिरवा रंग जाऊन तो 'अंजिरी' होतो. हेच अंजीर होय.

     अंजिराचे चार प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात यूरोपातील 'सामान्य' प्रकार येतो. यामध्ये (परागणाशिवाय होणारे) बीया नसलेले फळ वर्षातून दोनदा बनते. दुसरा 'स्मर्ना' प्रकार अतिशय उत्तम फळ तयार करणारा आहे. तिसरा 'रानटी' प्रकार आहे. 'सान पेद्रो' या चौथ्या प्रकारच्या अंजिराची लागवड कॅलिफोर्नियात केली जाते. याला वर्षांतून दोनदा बहार येतो.

     अंजिराचे पोषणमूल्य उच्च प्रकारचे असते. त्यापासून कॅल्शिअम मिळते. तसेच यात फॉस्फरस, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन (अजीवनसत्त्व) आणि क जीवनसत्त्व असते. इतर कोणत्याही फळापेक्षा अंजिरात तंतूमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. अंजीर विरेचक असून त्यात प्रतिऑक्सिडीकारके असतात.

     अंजिराचे पोर्तुगाल, इटली, ग्रीस, अफगाणिस्तान, इराण, टर्की हे महत्त्वाचे उत्पादक देश आहेत. भारतात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात अंजिराची लागवड केली जाते. पिकलेली ताजी अंजिरे रुचकर असतात. सुकविलेली गोड फळे तसेच त्यांचा मुरंबा खाल्ला जातो. पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी अंजिरे तयार करतात. सुके अंजीर बरेच दिवस टिकते. ती इराण, अफगाणिस्तान आणि ग्रीसमधून भारतात आयात करण्यात येतात. भारतातही थोड्या प्रमाणावर सुकी अंजिरे बनवितात. सुक्या अंजिरांची प्रतवारी त्यांच्या रंगावरून आणि आकारावरून ठरवितात. काजू, संत्री या फळांच्या बर्फीप्रमाणे अंजिराची बर्फीही बाजारात मिळते.

======================
अंजीर (Common fig)
Post published:26/06/2019
Post author:राजा ढेपे
Post category:कुमार विश्वकोश / वनस्पती
======================

--मराठी विश्वकोश
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.02.2023-गुरुवार.
=========================================