मायबोली-लेख क्रमांक-26-प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २

Started by Atul Kaviraje, February 24, 2023, 10:19:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मायबोली"
                                    लेख क्रमांक-26
                                   ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २"

                            प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २--
                           --------------------------

     "धन्यवाद सर, तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल", ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला. वेळ किमती आहे हे माहिती असून सुद्धा ही मंडळी अचानक का फोन करतात काय माहिती! पण मी देखील 'सेल्स' मध्ये असल्यामुळे दुसऱ्याच्या 'टार्गेट' बद्दल आणि ते 'अचीव' करण्यासाठी केल्या जाणाऱ्या खटपटीबद्दल मला सहानुभूतीच आहे.

     दोन दिवसांनंतर त्यांचा पुन्हा फोन आला. पुन्हा मला माझ्या नाकारतेपणाची जाणीव करून देण्यात आली. मी काहीच करत नाही, मुलींना अप्रोच करीत नाही, निष्क्रिय आहे, कुठल्याच मुलीने अजून मला अप्रोच केलं नाही वगेरे लडिवाळ तक्रारी त्या फोनवर बोलणाऱ्या मुलीने केल्या. आणि शेवटी ह्या सगळ्या समस्येवर एक रामबाण उपाय ( तिच्यामते) असल्याचा दावा करीत तिने मला एक नवीन 'ऑफर' ऐकवली.

     "कसं आहे न सर, आम्हाला माहिती आहे तुम्ही बिझी असता, तुम्हाला वेळ नसतो.... आणि त्यामुळे न सर , आम्ही तुमच्या साठी एक खास ऑफर घेऊन आलो आहे. तुम्ही जर तीन महिन्याची आमची अमुक अमुक हजार फी भरलीत आणि त्यात अजून अमुक हजार रुपये टाकले न तर केवळ (?) एवढ्या हजारात .... एक अतिरिक्त सेवा पुरवू!" अतिरिक्त सेवा ऐक्यावर माझे लक्ष्य एकदम ती काय सांगते आहे हे ऐकण्यात गेले. कारण इतका वेळ हजाराचे आकडे ऐकू येत असल्यामुळे मी लक्षच देत नव्हतो.

     "आम्ही न तुमच्यासाठी खास रिलेशनशिप ऑफिसर ठेवू. तो तुमच्याकडून जाणून घेईल की तुमची नक्की requirement काय आहे." तिचा तो requirement शब्द ऐकून ती आधी दुकानात काम करीत असणार ह्याची मला खात्री पटली आणि मी जोरात हसणं कसं-बसं आवरलं! " जेव्हा ह्या ऑफिसरला कळेल की तुम्हाला मुलीकडून काय अपेक्षा आहेत, तुमच्या आवडी-निवडी काय आहेत तेव्हा तो तुमच्यासाठी योग्य प्रोफाईल शोधेल. आणि ह्या ऑफिसर्सन खूप वर्षांचा अनुभव असतो ह्या क्षेत्रांमधला... त्यामुळे ते तुम्हाला अगदी योग्य match शोधून देतील. आणि तुम्हाला खरं सांगू का सर.... पण तुम्हाला हे नीट नाही जमणार ...पण आमच्या अनुभवी ऑफिसर्सना नक्कीच जमेल! आणि इतकेच नाही... ते तुमच्या वतीने मुलीशी संपर्क साधतील आणि तुम्हाला दोघांना एकेठिकाणी भेटवतील आणि तुमच्यात संवाद सुरु करून देतील.... "

     लग्न अर्थात आम्ही करायचे! कारण तेवढंच बाकी ठेवलं होतं ह्या सेवेने! भारत देशात वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगार संधी कशा उपलब्ध झाल्या आहेत ह्याचा साक्षात्कार मला तेव्हा झाला.

     परंतु ह्या टेलीफोन कॉल नंतर माझे डोळे उघडले. आपण किती निष्क्रिय आहोत ह्याची जाणीव झाली. इतके निष्क्रिय की स्वतःचे लग्न लावून द्यायला देखील कुणीतरी नियुक्त करायला लागत आहे. त्या दिवशी मी निश्चय केला. आपली होणारी बायको आपणच शोधायची! कुणाचाही आधार न घेता. रोज अर्धा तास वेबसाईट वर घालवायचा, मुलींच्या प्रोफाईल चाळायच्या आणि त्यातून पसंत पडणाऱ्या मुलींना कसला ही संकोच न बाळगता डायरेक्ट पसंती कळवायची! पुढचं पुढे बघू !

--आशय गुणे
(20 October, 2014)
----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.02.2023-शुक्रवार.
=========================================