मायबोली-लेख क्रमांक-27-प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २

Started by Atul Kaviraje, February 25, 2023, 10:19:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "मायबोली"
                                 लेख क्रमांक-27
                                ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २"

                             प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २--
                            --------------------------

     त्याच दरम्यान माझ्या वयाच्या मित्र-मैत्रिणींच्या लग्नाच्या, लग्न ठरण्याच्या आधीच्या आणि एकूण ह्या प्रक्रियेच्या बऱ्याच कहाण्या कानी पडत होत्या. एका मैत्रिणीच्या लग्नासाठी बोलणी होताना तर तिच्या घरी मी स्वतः उपस्थित होतो. माझी 'बेस्ट फ्रेंड'. बऱ्याच विषयांवर आम्ही इतके वर्ष गप्पा मारलेल्या. त्यामुळे आवडी-निवडीच्या हिशोबाने एकमेकांना चांगले ओळखून. कॉलेज मध्ये असताना तर 'चिडविण्याच्या यादीत' आमचे जोडी म्हणून पहिले नाव असायचे. तर 'माझे लग्न ठरताना तू सुद्धा तिकडे हवा' ही तिची विनंती मी नाकारू शकलो नाही. प्रथमिक बोलणी झाली की मला काय वाटतंय, मुलगा कसा आहे ह्याचा रिपोर्ट मला द्यायचा होता. आणि मग ती त्यावर विचार करून घरच्यांशी बोलून निर्णय घेणार होती. त्यादिवशी सकाळी मुलाकडले आले. प्राथमिक ओळखी झाल्या. माझ्या मैत्रिणीच्या आई-वडिलांना माझे तिथे असणे काहीही गैर वाटले नव्हते तरीही 'हा हिचा मित्र' अशी ओळख झाल्यावर त्या मंडळींचा चेहरा जरासा गंभीर झाला. आणि लग्नाची बोलणी होताना जे नाट्य घडतं ते माझ्या मैत्रिणीने पार पाडलं. एका ट्रे मधून सर्वांसाठी उपमा आणि नंतर कॉफी - ' हे हिने स्वतः केलंय' असा सगळीकडून जयघोष होत असताना - ती घेऊन आली. सुरुवातीला हवामान, ट्राफिक, वेळेत पोहोचणे कसे अवघड आहे, मुंबईत आलेले परप्रांतीय लोक इथपासून 'केंद्रात सरकार कसे काम करत नाही' ( 'अच्छे दिन' यायचे होते तेव्हा!) ह्या मध्यमवर्गातील आवडत्या विषयांवर मुला-मुलीकडल्या बापांनी बोलून घेतले. दोन्हीकडच्या आई 'हो ना', 'खरंय' ह्या पलीकडे बोलत नव्हत्या. माझी मैत्रीण आणि तिचा होणारा नवरा गप्प होते. मग हिच्या वडिलांनी प्रश्न केला. वास्तविक त्यांना माहिती होते तरी विचारले.

     "काय करता तुम्ही?" ह्या अशा प्रसंगात मुलीचे वडील मुलाला 'अहो' वगेरे म्हणतात आणि मुलीचा उल्लेख मात्र 'अगं' असा होतो. हे मी ऐकले होते पण आज अनुभवत होतो. मुलगा अपेक्षेप्रमाणे एका आय. टी कंपनीत कामाला होता. ह्या त्याच्या उत्तराला माझ्या मैत्रिणीच्या आजोबांपासून सर्वांनी 'वा' असा प्रतिसाद दिला. " हल्ली काय आय.टी खूप जोरात आहे", असे दहा वर्षापूर्वीचे वाक्य सुद्धा ते आजोबा बोलून गेले. आणि सगळीकडे प्रस्सनता पसरली. आणि काही मिनिटात काहीसा संकोच ठेवून मुलीच्या वडिलांनी प्रश्न विचारला. " फॉरेनला जाता ... म्हणजे पाठवू शकतात ... बरोबर ना? आय. टी मध्ये?"
हा प्रश्न ऐकल्यावर मुलाच्या बापाची कळी खुलली! आणि पुढे होकारार्थी उत्तर देऊन विषय परदेशातल्या 'सुख समाविष्ट' जीवनाकडे कधी गेला हे आम्हालाच कळलं नाही. शेवटी विषय संपला तो मुलाच्या बापाच्या वाक्याने. " आम्हाला मुलगी पसंत आहे. काय ते तारखेचं नक्की करूया!"

     "हो ... हो ... नक्की करूया! माझ्यामते वर्षाखेरीस करू! काय गं?" त्यांनी माझ्या मैत्रिणीला प्रश्न विचारला. मी पाहत होतो. ती एकदम भानावर आली. ह्या अशा प्रसंगी नाही किंवा बघुया असं म्हणणं तिला परंपरेने वर्ज्य ठरवलं होतं. ती आता न्यु-यॉर्क ला राहते. रोज मला candy crush किंवा तत्सम 'फेसबुकी' खेळांच्या रिक़्वेस्ट पाठवत असते! त्या दिवशी गप्पं असलेला तिचा नवरा तिकडे कामात गुंतलेला असतो. आपल्याला तिकडे नियमानुसार नोकरी करता येत नाही हे तिला आणि तिच्या परिवाराला माहितीच नव्हते.

     पण काही वेळेस वेगळा प्रसंग देखील घडत होता. कॉलेज मध्ये प्रेमात पडलेले माझे काही मित्र वास्तवाच्या चटक्याने भानावर येत होते. माझ्या एका मित्राचे कॉलेज मध्ये त्याच्याच वर्गातील एका मुलीशी अफेयर सुरु झाले. दोघांची गाडी रुळावरून अगदी डोलत डोलत चालली होती. अगदी दोघांनी एकाच कंपनीत नोकरी पत्करली. साऱ्या कंपनीत ह्यांचे लग्न होणार आहे हे माहिती होतं. कॉलेज पासून 'पुढचा विचार' करणं आता कंपनीत असताना सुद्धा सुरु झालं होतं. अर्थात अधिक व्यापक पद्धतीने! त्याच वेळेस मुलीला कंपनीने काही आठवड्यांसाठी युरोपला पाठवले. काही महत्वाचे काम होते. एयरपोर्ट वर आनंदाने सोडायला गेलेल्या लोकांमध्ये मी देखील होतो. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि ती निघून गेली. दोघांच्या ही घरी माहिती होतं आणि त्यामुळे दोघांचे आई-वडिल हे आनंदाने पाहत होते. पण ती तिथे असताना तिला काय झाले कोणास ठाऊक! कदाचित तिथल्या दृष्टीस येणाऱ्या श्रीमंतीला भुलून तिने परत आल्यावर त्याच्या पगाराची चौकशी करायला सुरुवात केली. हीच चौकशी तिच्या आई वडिलांकडून सुद्धा येऊ लागली आणि त्यामुळे त्याला अधिक व्यापक स्वरूप निर्माण झाले.

--आशय गुणे
(20 October, 2014)
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                     ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.02.2023-शनिवार.
=========================================