मायबोली-लेख क्रमांक-28-प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २

Started by Atul Kaviraje, February 26, 2023, 10:04:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "मायबोली"
                                  लेख क्रमांक-28
                                 ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २"

                            प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २--
                           --------------------------

     एरवी तिच्याशी बोलताना सुद्धा 'युरोप' हा विषय तिच्याकडून अधिक येऊ लागला. आणि शेवटी ती लग्न करू शकणार नाही असाच निर्णय तिने जाहीर केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा निर्णय सांगायच्या एका आठवड्या नंतरच तिच्यासाठी स्थळ आलं आणि तिने ते पसंत देखील केलं. ती आता लंडनला असते. आमच्याशी विशेष संपर्क नाही. मित्राची अवस्था पहिले काही महिने फार बिकट होती. पण एकूण इतक्या लगेच तिच्याकडे स्थळ सुद्धा चालून आलं ह्याचा अर्थ 'लग्न' ह्या नाटकाची सूत्र किती आधीपासून कुणीतरी सांभाळत होतं हेच दिसून आलं.

     ह्या व्यतिरिक्त स्वतःच्या गर्लफ्रेंड ना सांभाळतानाचे 'वास्तव' आता काही मित्र स्वतःहून सांगत होते. ते वास्तव त्यांना पटू लागले होते असं म्हणूया हवं तर. कॉलेज मध्ये असताना ज्या प्रश्नांचा विचार देखील केला नव्हता ते प्रश्न आता एकदम विचारले जाऊ लागले. बहुतांश गर्लफ्रेंड्स ह्या दिवसातून तीन वेळेस तरी पगार ह्या विषयावर घसरायच्या. कुणाच्या गर्लफ्रेंड्स मॉल मध्ये लटकणाऱ्या महागड्या ड्रेस कडे बोट दाखवायचे. कधी कधी हेच बोट दुसऱ्या मुलींकडे अर्थात त्यांनी घातलेल्या ड्रेसकडे जायचे. अशा वेळेस त्या मुलीकडे अधिकृत रित्या पाहणे माझे मित्र सोडत नसणार ह्याची मला खात्री आहे. परंतु 'हे मला कधी घेऊन देणार' वगेरे ऐकल्यावर त्यांना मानसिक त्रास नक्कीच होत होता. कधी कधी तर 'तुला त्याच्या एवढा पगार कधी मिळणार' वगेरे विचारल्यावर त्यांचे डोकेच फिरायचे. मग त्यांची भांडणं. हे सारे मग माझ्या कानावर यायचे. मग ह्या प्रश्नांवरून चर्चा पाच वर्ष पुढे काय, दहा वर्ष पुढे काय इकडे जायची. त्यातून फ़्रसट्रेट होऊन काही मित्रांनी टपरीवाल्यांना चांगले दिवस देखील आणले होते.

     अशी ही पार्श्वभूमी होती जेव्हा मला ह्या वेबसाईट वाल्यांचा फोन येत होता. एकंदर 'प्रेम विवाह', 'गर्लफ्रेंड' वगेरेचे ( काही लोकांचे) कटू सत्य समजत होते. शिवाय उद्या आपण एखादं स्थळ चालून आलं म्हणून लग्न केलंच आणि पुढे हे असे अनुभव मला आले तर? हा विचार सुद्धा डोक्यात होता. त्यामुळे आता आपण स्वतः शोध घ्यायचाच हे मी ठरविले! तसं पहिले काही दिवस अगदीच विचित्र वाटलं. समोर फोटो दिसतायत. त्यानंतर 'स्व' बद्दल लिहिलेला तो मजकुर वाचायचा. पण ही व्यक्ती आपली बायको होणार अशा प्रकारचा विचार एकदम कसा करायचा? पण काही दिवस गेले आणि मी अशा अर्थाने विचार करायला सज्ज झालो. आणि तेव्हा मला 'मुलगी' ह्या रहस्याचे बरेच पैलू अनुभवायची संधी मिळाली.

     आता मी स्त्रियांच्या किंवा मुलींच्या विरोधात वगेरे लिहितो आहे असे समजण्याचे काही कारण नाही. बऱ्याच मुलींना खाली लिहिणार आहे तसे अनेक अनुभव मुलांबद्दल देखील आले असतील. आणि मी मुली ( आणि अर्थात मुलीच!) बघत असल्यामुळे मला त्यांच्याच प्रोफाईल दिसणार.

     ह्या मुलींच्या प्रोफाईल चाळल्या की मला नेहमी एक प्रश्न पडत आलेला आहे. बऱ्याच मुलींनी आपल्याला इथे योग्य स्थळप्राप्ती होणार नाही हे आधीच मनात ठेवलेलं असतं काय? कारण तसं नसतं तर त्यांनी प्रोफाईल मध्ये सर्वात लक्षवेधक गोष्ट - अर्थात फोटो - नीट आणि आपण लग्नासाठी इथे आलो आहोत अशा थाटात तरी लावला असता! काही मुलींचा फोटो हा तिरका का लावलेला असतो माहिती नाही. काहींचा आपण त्यांच्याकडे बघू तर त्या कुठे तरी दुसरीकडे बघत असतात आणि आपल्याला त्यांच्या चेहऱ्यातला केवळ गाल आणि कान दिसो असा फोटो असतो. काही मुली फोटोत सुद्धा फोनवर बोलत असतात तर काही दूर एका खांबाला टेकून उभ्या असतात. काहीच्या फोटो मागे समुद्राच्या उंच उडणाऱ्या लाटा तर काहींच्या फोटो मागे घनदाट जंगल! ( असे फोटो पाहिल्यावर त्या काय करतात वगेरे बघायचे धाडसच झाले नाही माझे!) काही मुली तर फोटो म्हणजे कपाळ ते हनुवटी एवढाच भाग आला पाहिजे ह्या समजुतीने वेबसाईट वर येतात तर काही मुली स्वतःबद्दलचे रहस्य टिकवून ठेवायच्या प्रयत्नात असतात आणि त्यामुळे फोटोच लावत नाहीत. त्यांच्या फोटोवर लिहिलेलं असतं - not visible without permission. ( लग्नानंतर सगळ्या गोष्टींसाठी बायकोची परवानगी घ्यावी लागते ह्या गोष्टीची सुरुवात ह्या मुली लग्नाआधीच करीत असव्यात!) टेडी बेअर मांडीवर घेऊन बसलेल्या मुलींचे फोटो पाहिले तर बालविवाह आपल्याकडे अजून वैध आहे की काय असाच मला प्रश्न पडत आलेला आहे.

--आशय गुणे
(20 October, 2014)
---------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.02.2023-रविवार.
=========================================