मायबोली-लेख क्रमांक-29-प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २

Started by Atul Kaviraje, February 27, 2023, 10:31:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मायबोली"
                                   लेख क्रमांक-29
                                  ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २"

                           प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २--
                          -------------------------

     जी गत फोटोंची तीच गत स्वतःबद्दल लिहायच्या जागेबद्दलची! अर्थात 'about me' ची. ह्या जागेवर लिहिताना बऱ्याच मुलींना 'लग्ना संबंधितच माहिती लिहा' असे बजावले पाहिजे असे मला राहून राहून वाटते. शिवाय ह्याच जागी त्या त्यांच्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत हे देखील लिहित असतात. त्यामुळे आमच्यासाठी ही जागा अतिशय महत्वाची ठरते.

     ह्या जागेत लिहिण्याची बहुतांश मुलींची पद्धत ही एकसारखी आढळलेली आहे. सर्वप्रथम काही ठरलेल्या विशेषणांनी स्वतःचे वर्णन आटपायचे आणि थेट गाडी 'माझे मित्र-मैत्रिणी माझ्याबद्दल काय म्हणतात' इथे न्यायची! हे म्हणजे आपण नोकरीचा अर्ज करताना काही लोकांचे 'रेफरन्स' चिकटवतो तसे हे अनामिक रेफरन्स! बरं ही विशेषणं इतकी वैश्विक का असावीत ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही. उदाहरणार्थ, आमची राणी फार साधी, निरागस मुलगी आहे. ती दिसायला चांगली आहे, तिचे मन छान आहे आणि ती एक 'ग्रेट ह्युमन बिंग' आहे. ( हे आणि पुढची सारी उदाहरणं मूळ इंग्रजीतून भाषांतरीत आहेत!)

     दुसरीकडे एकीने लिहिलं होतं की मी 'हैप्पी गो लकी' आहे, ' and I am full of life' आणि मला असा मुलगा अपेक्षित आहे जो मला मी आहे तशी स्वीकारेल(!) एका मुलीने लिहिले होते की ती 'simple living high thinking' ह्या तत्वाने आयुष्य जगते आणि तिला असे लोक आवडतात जी पाठीमागे न बोलता सरळ तोंडावर बोलून मोकळी होतात आणि मला असा मुलगा हवा आहे जो माझ्यासारखा fun loving असेल!
(मला हा fun loving शब्द काय असतो माहिती नाही. fun म्हणजेच मजा ही सर्वांना आवडतेच की! त्यामुळे मुद्दाम 'मी fun loving' आहे असं वेगळं लिहायची काय गरज आहे? किंबहुना, 'fun hating' व्यक्ती जगात चुकून सुद्धा अस्तित्वात असेल असं मला वाटत नाही! )

     'Down to Earth' अर्थात पाय जमिनीवर असणे हा देखील मुलींचा स्वतःबद्दल सांगायचा आवडता गुण आहे. एका केस मागे सारीत फोटो असलेल्या मुलीने ती easy going आहे असे स्वतःबद्दल लिहून ठेवले होते. म्हणजे काय कुणाला माहिती! मला हे समजले नाही की मी माझ्या सारख्या सामान्य आणि गुण-दोष असलेल्या मुलींना शोधायला ह्या वेबसाईट वर आलो की भोवतीचे जग जिंकून वैश्विक रूप धारण केलेल्या स्त्री-संतांना? बर, ह्या गुणांचा नेमका लग्नाशी कसा संबंध जोडायचा? म्हणजे एखादी मुलगी down to earth आहे हे वयाच्या चोवीसाव्या वर्षी कसे काय सिद्ध झाले? तसे होण्यासाठी असे काय अनुभव घेतले ह्या मुलींनी देव जाणे!

     काही मुली स्वतःबद्दल लिहिताना एक विशिष्ट विरोधाभास घेऊन येतात. ह्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे ' मी एक liberal मुलगी आहे आणि मला traditional गोष्टी आवडतात. किंवा माझा परिवार हा liberal with traditional views असा आहे. ह्या संभ्रमित आणि वैश्विक गुणांमुळे भारावून गेलेल्या अवस्थेत आपण नंतरच्या कॉलम्स मध्ये प्रवेश करतो. कौटुंबिक पार्श्वभूमी, आवडी-निवडी, नक्षत्रांच्या संबंधित माहिती, शिक्षण आणि आवडी-निवडी वगेरे माहिती झाली की आपण शेवटच्या कॉलम पर्यंत येउन पोहोचतो - मुलाकडून अपेक्षा!!

     मानसिक दृष्ट्या सक्षम असाल तरच पुढे वाचा - अशी सूचना ह्या वेबसाईट वाल्यांनी आम्हा मुलांना हे वाचायच्या आधी दिली पाहिजे! तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या पदावर असाल, चांगली नोकरी करत असाल, चांगला पगार असेल, बॉसने स्तुती केली असेल तरीही एकदा हा कॉलम वाचलात की आपण आयुष्यात काहीच करू शाकेलेलो नाही अशी भावना मनात येईल! इथे सुरुवातीला जात, शिक्षण, वय, उंची, गोत्र, शिक्षण ह्या गोष्टी आपण सहज रित्या पार करतो. पण जेव्हा विषय येतो वार्षिक उत्पन्नाचा तेव्हा आपण गप गुमान त्या प्रोफाईल मधून बाहेर पडून दुसऱ्या प्रोफाईल मध्ये शिरतो. बहुतांश मुलींनी मुलाकडून अपेक्षित वार्षिक उत्पन्न हे १० लाखाच्या खाली लिहिलेले नसते. काहींनी ते अगदी वीस लाखापर्यंत नेउन ठेवलेले असते. बरं, ह्या मुलींच्या यादीत ज्या मुलींचा पगार तेवढा असतो त्यांनी ही अपेक्षा केली तर मला त्याचं काही नवल वाटणार नाही. परंतु वार्षिक उत्पन्न दोन लाख देखील नसलेल्या मुली जेव्हा वीस लाखाच्या अपेक्षा ठणकावून सांगू लागतात तेव्हा हुंडा ही परंपरा उलट्या बाजूने सुरु झाली की काय असा प्रश्न मनात उपस्थित होतो! मी एक प्रोफाईल पहिली होती. त्यात मुलीने वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा किमान ४ लाख/वर्ष ते कमाल २० लाख/वर्ष एवढी ठेवली होती. परिस्थितीशी जुळवून घेण्याची काय ती विलक्षण क्षमता! ही मुलगी चार लाख प्रति वर्ष चे आयुष्य जगू शकत होती आणि वीस लाख प्रती वर्षाचे सुद्धा! ह्या अशा मुली शक्यतो आय.टी कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलांवर नजर ठेवून असाव्यात. कारण बाहेरच्या देशातून पैसे येत असल्यामुळे का होईना, पण एवढा पगार तेच घेऊ शकतात. भारतीय कंपनीत, जिथे बहुतांश भारतीय मुलं काम करतात, पगाराचा हा आकडा गाठायला बरीच बढती गाठावी लागते. पुण्यात बऱ्याच मुली अशाप्रकारचे अप्रत्यक्ष इशारे त्यांची प्रोफ़ाइल वाचणाऱ्या मुलांना देत असतात.

--आशय गुणे
(20 October, 2014)
---------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                     ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.02.2023-सोमवार.
=========================================