इतर कविता-(क्रमांक-151)-जन्मातही नव्हते कधी मी

Started by Atul Kaviraje, February 28, 2023, 10:59:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      इतर कविता 
                                    (क्रमांक-151)
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "इतर  कविता"  अंतर्गत  मी  इतर  कवींच्या  कविता  आपणापुढे  सादर  करीत आहे .

                                जन्मातही नव्हते कधी मी
                               ----------------------

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.

– भाऊसाहेब पाटणकर
---------------------
--संकलक-सुजित बालवडकर
--------------------------

                   (साभार आणि सौजन्य-मराठी कविता.वर्डप्रेस.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.02.2023-मंगळवार.
=========================================