मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-114-डार्विन ची वंशावळ-ब

Started by Atul Kaviraje, March 01, 2023, 09:56:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-114
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "'डार्विन' ची वंशावळ"

                               'डार्विन' ची वंशावळ--ब--
                              ----------------------

     आजची भारतीय व्यवस्था पाहून जर "सोशल डार्विनीझम " आणि भारत या दोन्हीचा एकत्र विचार केला तर या संकल्पनेचा जन्म भारतातच झाला होता की काय असा संशय आल्याशिवाय राहणार नाही. एक चाचणी म्हणून आपण जर ""सोशल डार्विनीझम " ची वरील व्याख्या घेतली आणि आपल्या आजूबाजूच्या समाजात चाललेल्या गोष्टीशी याचा संबंध लावला तर असे लक्षात येईल की या डार्विनच्या वंशावळीने अक्षरश समाजात हैदोस माजवला आहे. आपल्या भारतीय व्यवस्थेत तर हा सिद्धांत अगदी तंतोतंत पाळला जातो यात कुणाचेही दुमत असू शकत नाही. दादा, भाऊ, साहेब, भाई, डॉन ई. शक्तिस्थान मुजोर भांडवलशहांच्या आर्थिक पाठबळावर भारतीय व्यवस्थेची लक्तरे उघड्यावर पाडण्यात गुंग आहेत. भारतातील "सोशल डार्विनीझम" चे ठळक उदाहरण म्हणजे भारतात रुजलेली जातीव्यवस्था आणि त्यालाच जोडून आलेला 'जातीभेद' . या जातीव्यवस्थेत अशा कितीतरी पूरक गोष्टी आहेत ज्या सोशल डार्विनीझमचा उघडपणे पुरस्कार करतात (उदा. उच्च-नीच, स्पृश-अस्पृश, इ. ). जातीभेदाला धर्मांमध्ये सुद्धा कुठलेही तर्कशुद्ध स्पष्टीकरण नसतांना केवळ सामाजिक व्यवस्था नियोजनाच्या नावाखाली वेगवेगळ्या जातीमध्ये समाजाला विभागून एका प्रकारे 'शक्तिशाली' आणि 'कमजोर' गट तयार करण्याचा मोठा 'कटच' या व्यवस्थेत शिजला होता की काय अशी शंका येते. यासाठी ठराविक समाजाला शिक्षण, पैसा, युद्धनीती, इ. गोष्टींपासून कितीतरी वर्षे दूर ठेवले गेले. जातीव्यवस्था हा आपल्या भारतीय व्यवस्थेला लागलेला एक मोठा कलंक आहे हे आता जवळपास सिद्धच झालेले आहे. याच धर्तीवर नितीमुल्याची रचना करतांना सुद्धा पारदर्शकतेचे निकष पाळले गेलेले दिसत नाहीत. स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान देवून 'कमजोर' गटात भर घालण्याचे काम केले गेले. शिक्षणापासून दूर ठेवलेल्या समाजाच्या बौद्धिक क्षमतेचा विकास न झाल्यामुळे त्याचा कल साहजिकच अंधश्रद्धा, गुन्हेगारी आणि उच्च समाजाने घालून दिलेल्या पोकळ रूढी आणि परंपरांकडे वळू लागला. या गोष्टीचा एक हत्यार म्हणून वापर करून 'शक्तिशाली' समाजाने 'कमजोर' समाजावर अत्याचार सुरु केले. आणि मग साहजिकच या स्वतला "शक्तिशाली" म्हणवून घेणाऱ्या गटाकडे आर्थिक आणि राजकीय प्रभुत्व आले आणि कमजोर समाज कायमस्वरूपी गरिबीच्या, निरक्षरतेच्या खाणीत ढकलला गेला. या अर्थाने कमजोर गटाच्या व्यवस्थेला तो स्वतः नाही तर ती व्यवस्था बहुतांशी जबाबदार असते. आणि म्हणून "सोशल डार्विनीझम" ही संकल्पना नैसर्गिक नसून कृत्रिम आहे हे सिद्ध होते आणि याच मुळे "सोशल डार्विनीझम" ही एक संकल्पना नसून ती एक कुप्रवृत्ती आहे असे येथे अधोरेखित करावेसे वाटते.

--Sandip
(January 17, 2013)
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2023-बुधवार.
=========================================