मायबोली-लेख क्रमांक-31-प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २

Started by Atul Kaviraje, March 01, 2023, 10:01:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मायबोली"
                                     लेख क्रमांक-31
                                    ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २"

                            प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २--
                           --------------------------

     "मला वाटतं माझ्या बायकोने मला कॉमप्लीमेंट करायला हवे ...माझ्यावर अवलंबून राहिलेले मला आवडणार नाही. आणि त्यासाठी मला तिला आणि तिला मला व्यवस्थित जाणून घेणे आवश्यक आहे. सो, मला असं वाटतं की कॉफी शॉप मध्ये भेटून काही होणार नाही. रोज थोड्या गप्पा झाल्या पाहिजेत, दिवसभराच्या गोष्टी शेअर करून बघायला हव्या... बाहेर थोडे एकत्र फिरले पाहिजे ...आणि मुव्हीला जाणे वगेरे सोशल इव्हेंट्स सुद्धा एकत्र पार पाडले पाहिजेत. तरच आपण एकमेकांना नीट ओळखू शकू. माझा डेटिंग ह्या कंसेप्ट वर विश्वास आहे ... अर्थात ... आपण त्याचा फार चुकीचा अर्थ घेतो!"
मी 'चुकीचा अर्थ घेतो' एवढं म्हणेपर्यंत तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव माझ्या नजरेत पडले. तिचा चेहरा गंभीर झाला आणि शांत शब्दात ती म्हणाली,
" मला नाही वाटत माझ्या आई-वडिलांना हे पटेल!"
"पण तुला?" हा माझा प्रश्न पूर्ण होईपर्यंत ती टेबलवरून उठून निघून गेली होती. एकूण चमत्कारिक प्रसंग होता हा. माझ्याकडून काही अपशब्द बोलला गेला का, काही गैरवर्तन झाले का ह्याची मी उजळणी केली आणि तसं काही घडल्याचे माझ्या आठवण्यात आले नाही. आणि पुन्हा मी एक नवा शोध घेण्यास प्रारंभ केला.

     असेच काही दिवस गेले आणि पूर्वा नावाची एक मुलगी मी पाहत असलेल्या यादीत आली. आवडी-निवडी माझ्याशी जुळणाऱ्या होत्या. काही प्रमाणात विचार आणि एकंदर स्वतःबद्दल आत्मविश्वासाने लिहिलेला मजकूर. ह्या वेळेस भेटण्याचे ठिकाण होते दादर. दादरच्या प्रीतम हॉटेल जवळ असलेल्या एका कॉफी शॉप मध्ये मी आणि पूर्वा भेटलो. आता मात्र मी थोडा सरावलेलो होतो. विषयाला कसे यायचे माहिती झाले होते. सुरुवातीची प्रस्तावना नेमकी किती वेळ सुरु ठेवायची हे मला आता माहिती झाले होते. बोलण्यात असे आले की पूर्वा ही एक फ्रीलान्स चित्रकार होती. नोकरी करता करता छोटे मोठे प्रोजेक्ट्स हाती घ्यायची. लग्न झाल्यावर काही दिवसांनंतर ती नोकरी सोडून केवळ ह्या क्षेत्रात काम करणार होती. मला हा आत्मविश्वास भावला आणि त्याला माझी काहीच हरकत नसणार होती. बोलता बोलता मी देखील माझ्या आवडी-निवडी सांगितल्या. नोकरीतील बऱ्यापैकी वर्ष पार पडल्यानंतर मला लेखक म्हणून काम करायचे होते. अर्थात ही गोष्ट काय पाच वर्षात होणार नव्हती. चांगली सेटलमेंट आल्यावरच होणार होती. अगदी मुद्द्याला धरून चांगले बोलणे झाले आमचे आणि आम्ही पुढे भेटायचे ठरविले. मनात मिश्र भाव ठेवून मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी माझ्या मोबाईल मध्ये मेसेज झळकला.

     'मला वाटत नाही आपलं जमेल. मला एक वेल सेटल्ड मुलगा हवा आहे. तो जर वेल सेटल्ड असेल तरच मी माझ्या योजना पुढे नेऊ शकते. तुला पुढे नोकरी सोडायची आहे असे तू सांगितल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतो आहे. धन्यवाद!'

     इतक्या लवकर विचार बदलला! प्रभावित करणारे घरचेच असणार असं म्हणायला खूप जागा होती. एकूण काय, मुलाने स्वतःच्या आवडी-निवडींचा विचार करू नये. त्याने फक्त कमवावे. असो.

     मी आता अशा एका पातळीवर होतो जिथे मला प्रोफाईल वरून मुली सापडत होत्या. परंतु वाटाघाटीत गाडी अडत होती. काही मुलींचे म्हणणे होते की पहिल्याच बोलण्यात घरच्यांना समाविष्ट करायचे जे मला अजिबात मान्य नव्हते तर काहींना माझे घरी न सांगून परस्पर स्वतः निर्णय घेऊन मुलींना भेटणे मान्य नव्हते. काहींचे सारे निर्णय 'घरचेच घेतात' ह्या स्वरूपाचे होते आणि त्या 'फक्त भेटून घे' असं घरच्यांनी सांगितलं ह्या सदरात मोडत होत्या. फक्त भेटून ये म्हणजे काय? लग्न गृहीत धरलं आहे असा अर्थ काढायचा का? काही मुलींचे वडील भेटायच्या दिवशी सकाळपासून reminder calls द्यायचे आणि मुलीशी बोलायला निर्माण केलेला माहोल उध्वस्थ करायचे. माझे विचार स्पष्ट होते. हा निर्णय आयुष्यातील सर्वात महत्वाच्या निर्णयांच्या सदराची सुरुवात आहे. इथून पुढे सारे निर्णय जर मिळून घ्यायचे असतील तर ह्या निर्णयात घरच्यांचा प्रभाव सुरुवातीलाच का आणायचा? आपल्या क्षमतेनुसार, आकलनानुसार हा निर्णय आपण नक्कीच घेऊ शकतो. पुढे घरच्यांशी बोलायचे आहेच. त्यांना अंधारात ठेवा असे मला मुळीच म्हणायचे नव्हते. परंतु ही गोष्ट बऱ्याच मुलींना पटणारी नव्हती. कदाचित आपल्याकडे मुलींना 'तुझे डोके कुणाच्या तरी खांद्यावर ठेवायचे आहे' ह्याच प्रकारचे धडे दिले जातात म्हणून असे होत असेल. तुमची देखील ,मान ताठ असू शकते ही शिकवण फार कमी मुलींना मिळते. दुसरी मला जाणवलेली गोष्ट म्हणजे मुलाचा पगार हा मुलीपेक्षा जास्त (च) पाहिजे हा हट्ट मुलीकडले अधिक करतात. बऱ्याच मुलींची देखील हीच समजूत असते. जी गोष्ट पगाराची तीच गोष्ट डिग्रीची!

--आशय गुणे
(20 October, 2014)
----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2023-बुधवार.
=========================================