कुमार मराठी विश्वकोश-अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)

Started by Atul Kaviraje, March 01, 2023, 10:07:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "कुमार मराठी विश्वकोश"
                                 -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands).

                         "अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)"
                         -------------------------------------

               मानवी काही अंत:स्रावी ग्रंथी--

     शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविरहित ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींमध्ये विशिष्ट रासायनिक पदार्थ म्हणजेच संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके ग्रंथीद्वारे थेट रक्तात स्रवली जातात. यामुळे सजीवांना त्यांच्या शरीराच्या आतील व बाहेरील बदलत्या परिस्थितीनुसार विविध क्रियांमध्ये मेळ साधणे शक्य होते. संप्रेरकांचे निमंत्रण पश्चप्रदाय पध्दतने होते शरीराच्या निरनिराळ्या भागात काम करणार्‍या विविध अंतःस्रावी ग्रंथी मिळून अंतःस्रावी संस्था बनते.अंतःस्रावी संस्था आणि चेतासंस्था शरीरक्रिया नियंत्रित करतात. त्यांमध्ये दोन ठळक फरक आहेत. अंतस्रावी संस्थेत संप्रेरकांची क्रिया हळूहळू होते आणि त्यांचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. याउलट, चेतासंस्थेची प्रतिक्रिया जलद होते आणि ताबडतोब प्रतिसाद दिला जातो. विशिष्ट ऊतींपर्यंत संप्रेरके पोहोचण्यासाठी अंतःस्रावी संस्था ही रक्ताभिसरण संस्थेवर अवलंबून असते, तर चेतासंस्थेतील एकमेकांना जोडलेल्या चेतापेशींद्वारे संदेशवहन होते. अंतःस्रावी संस्था आणि चेतासंस्था या दोन्हींमध्ये जीवरासायनिक पदार्थांवाटे माहिती संक्रमित होते.

     वेगवेगळ्या शरीरक्रिया होत असताना शरीरातील ऊतींच्या कार्यानुसार संप्रेरके पाझरतात. शरीरातील ऊतींचा विकास, चयापचय, प्रजनन इ. क्रियांवर या संप्रेरकांचे परिणाम घडून येत असतात. अंतःस्रावी ग्रंथी भ्रूणस्तरातील निरनिराळ्या थरांपासून उत्पन्न होतात. मात्र काही अंतःस्रावी ग्रंथींचे निरनिराळे भाग निरनिराळ्या भ्रूणस्तरांपासून  उत्पन्न  होऊन नंतर एकत्र येऊन त्यांची ग्रंथी बनलेली दिसते. पीयूषिकेचे तीन भाग अथवा अधिवृक्क ग्रंथींचे दोन भाग अशी याची उदाहरणे सांगता येतील. मानवी शरीरातील वेगवेगळ्या अंत:स्रावी ग्रंथींचे थोडक्यात वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

     पीयूषिका : अंतःस्रावी ग्रंथींमधील ही एक प्रमुख ग्रंथी आहे. ही ग्रंथी अनेक संप्रेरके उत्पन्न करते. यापैकी वृध्दिसंप्रेरक स्नायू हाडांच्या वाढीला चालना देते. पीयुषिकेतून पाझरणारी संप्रेरके विविध अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य नियंत्रित करतात.

     तृतीय नेत्र पिंड : ही ग्रंथी मध्यप्रमस्तिष्कापासून म्हणजे मोठ्या मेंदूच्या मध्यभागापासून उत्पन्न होते. मेलॅटोनिन या संप्रेरकाच्या निर्मितीबरोबरच ही ग्रंथी जैविकचक्र नियंत्रित करते.

     अवटु : ही ग्रंथी मानेच्या मध्यभागी असून थायरॉक्सिन व कॅल्सिटोनिन अशी संप्रेरके  निर्माण करते. शरीराची वाढ व चयापचय क्रियेत ही संप्रेरके महत्त्वाची कार्ये करतात. स्रवलेली संप्रेरके साठवून ठेवू शकणारी ही एकमेव ग्रंथी आहे. या ग्रंथींच्या अंतःस्रावात आयोडीन असते.

     परावटू : अवटु ग्रंथीच्या पार्श्वभागात या चार ग्रंथी असतात. या ग्रंथी पॅराथॉर्मोन नावाचे एकच संप्रेरक उत्पन्न करतात. हे संप्रेरक कॅल्शियमाच्या व फॉस्फरसाच्या चयापचयाचे नियंत्रण करते.

=====================
अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)
Post published:26/08/2019
Post author:शशिकांत प्रधान
Post category:कुमार विश्वकोश / वैद्यक
=====================

--मराठी विश्वकोश
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2023-बुधवार.
=========================================