मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-115-डार्विन ची वंशावळ

Started by Atul Kaviraje, March 02, 2023, 10:28:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-115
                                 --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "'डार्विन' ची वंशावळ"

                                'डार्विन' ची वंशावळ--
                               ------------------

     खऱ्या अर्थाने " सोशल डार्विनीझम " ह्या विचारप्रणालीचा उगम पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. आणि त्याची सर्वाधिक झळ ही त्या देशातील कृष्ण-वर्णीय (Black) लोकांना बसली. भांडवलशाहीच्या भस्मासूराने त्या त्या देशातील मजुरांवर अतोनात अन्याय केले. आपण केलेले हे अन्याय म्हणजे निसर्ग नियमाचाच एक भाग आहे अशी कोल्हेकुई केली जावू लागली. बहुतांश कारखानदारी व्यवसायांमध्ये कृष्णवर्णीय मजूरच असत. पाश्चिमात्य देशांमध्ये जातीव्यवस्था जरी अस्तित्वात नसली तर तितक्याच तोलामोलाची आणि अमानवीय व्यवस्था आणि ती म्हणजे 'वर्णभेद' आणि "वंशभेद" आधीच आपले बस्तान बांधून बसली होती. या व्यवस्थेमुळे कृष्णवर्णीय लोकांना मूळ प्रवाहात सामावून न घेता खऱ्या अर्थाने शिक्षण, पैसा आणि सामाजिक प्रगती यांपासून दूर ठेवले गेले. या गोष्टीचा थोडक्यात आढावा प्रसिद्ध शास्त्रज्ञ "कार्व्हर" यांनी आपल्या "एक होता कार्व्हर" या पुस्तकात मांडला आहे. आणि या सर्व गोष्टी करण्याकरिता तिथेही पुन्हा एकदा धार्मिक स्पष्टीकरणाचा आधार घेतला गेला. कुठल्याही धर्माचा मुळ इतिहास पहिला तर हे लक्षात येईल धर्माचा उगम हा मानवी नीतीमूल्यांची जपणूक करण्यासाठी आणि त्यातूनच चांगला समाज घडविण्यासाठी झाला होता. असे असताना सुद्धा धर्मांचे अस्तित्व टिकविण्याच्या नावाखाली त्यातील मुलभूत संकल्पांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला. आजची ढासळलेली समाजव्यवस्था हे त्याचेच एक जिवंत उदाहरण आहे. आणि मग या अश्या व्यवस्थांमध्ये जगतांना पोटाच्या भूकेपुढे नीतीमूल्यांची कवाडे कधी गळून पडतात हे कळत सुद्धा नाही. आणि मग हळू हळू हा समाज गुन्हेगारीकडे वळू लागतो. आफ्रिकन देशांमधील वाढते गुन्हेगारीकरण हे याचेच द्योतक आहे. आधुनिकीकरणाचे कवाडे उघडी करून देणाऱ्या आणि मुक्त विचारसरणीचा पुरस्कार पाश्चिमात्य मुलुखांमध्ये आजही वर्णभेद आणि वंशभेदाची भुते कधी कधी डोकी वर काढतांना दिसतात. तरी देखील पाश्चिमात्य देश या समस्सेतून काही प्रमाणात बाहेर पडलेले दिसतात. पण भारतात खोलवर रुजलेल्या जातिव्यवस्थेमुळे भारतीय समाज आजही त्याची झळ सोसत आहे.

     वरील काही परिच्छेदामध्ये आपण विविध व्यवस्थेमध्ये " सोशल डार्विनीझम " ने कसा शिरकाव केला आहे हे पहिले. पण " सोशल डार्विनीझम " ही केवळ एक विचारप्रणाली नसून ती एक प्रवृती आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. या प्रवृतीच्या माणसांमध्ये कुठल्याही मार्गाने जिंकण्याची इच्छा इतकी प्रबळ असते की त्यासाठी ते सर्व नितीमुल्यांना चिरडून पुढे जातात. आपल्याला असे कितीतरी लोक समाजात उघडपणे वावरतांना दिसतील. अशी लोक गुन्हेगारी प्रवृतीने वागून एका प्रकारे कृत्रिम 'कमजोर' गट तयार करण्यात अहोरात्र गुंतलेली असतात. याठिकाणी कमजोर म्हणजे खऱ्या अर्थाने कमजोर नसून नितीमुल्यांवर विश्वास ठेवून त्या प्रमाणे वागणारा समाज असतो. आणि खऱ्या अर्थाने अशा नितीमुल्याशी चिकटून राहिलेल्या समाजावरच कुठलीही सामाजिक व्यवस्था सशक्तपणे उभी राहते. ज्या समाजात नितीमुल्यांचे प्रभुत्व ऱ्हास पावत चाललेले आहे तो समाज कधीही सर्वांगाने सुखी, समाधानी आणि समृद्ध होऊ शकत नाही.

     या अशा सगळ्या व्यवस्था आणि प्रवृत्ती अप्रत्यक्षरित्या "सोशल डार्विनीझम" चे समर्थन करतांना दिसतात. आणि जेव्हा या सगळ्या अमानवीय कृत्यांना धार्मिक आधार देवून समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तेव्हा या नितीमुल्य शिकविणाऱ्या ढोंगी धर्मांची कीव येते. कोणत्याही धार्मिक साहित्यामध्ये लिहिल्या गेलेल्या जातीभेद, वंशभेद, वर्णभेद इ. भ्रामक संकल्पांना खरच जर दस्तुरखुद्द देवाने लिहिले असेल तर "देवाने ही अक्षम्य चूक केली आहे" हे म्हणण्याचे धाडसही येथे करावेसे वाटते. नितीमुल्यांवर आधारित धार्मिक व्यवस्थांना "सोशल डार्विनीझम" चे डोहाळे लागल्यामुळे संपूर्ण धार्मिक व्यवस्थाच मोडीत निघाली.

     या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी पुन्हा एकदा काळानुरूप बदललेल्या सामाजिक व्यवस्थेनुसार नितीमुल्यांवर आधारीत समाजव्यवस्थेची नव्याने बांधणी करणे आवश्यक आहे.

--Sandip
(January 17, 2013)
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.03.2023-गुरुवार.
=========================================