मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-116-विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी

Started by Atul Kaviraje, March 03, 2023, 10:30:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-116
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी"   

                        विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी--
                       ---------------------------------

     केवळ गणिताचेच नव्हे तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे सुमारीकरण होत आहे. विद्यार्थीकेंद्रित व्यवस्थेत विद्यार्थ्याची नाराजी पत्करून शिक्षणक्षेत्राशी संबंधित असलेल्यांना जगता येत नाही. विद्यार्थ्यांनी काहीही केले तरी त्यांचे कौतुक करणे गरजेचे ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची शहानिशा करू पाहणारे शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षक इत्यादी प्रमुख घटक कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. म्हणून सर्व जण safe राहण्यातच धन्यता मानत आहेत. कायद्याचा बडगा केव्हा, कसा कोसळेल याचा नेम नाही. तुम्ही दिलेल्या मार्क्सवरून विद्यार्थी (व त्यांचे पालक) तुमच्यावर खटला भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिडा टळो म्हणत पैकीच्या पैकी मार्क्स देण्याकडे कल वाढत आहे. चुकीचे उत्तर बरोबर कसे यासाठी थोडीशी कसरत करावी लागते. तेवढे कष्ट घेण्याची तयारी परीक्षकांच्याकडे आहे.

     अशाच एका चाचणी परीक्षेत विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याच्या दबावामुळे परीक्षकांना कुठल्या कुठल्या दिव्यातून जावे लागते याचे एक मजेशीर उदाहरण!

1.भौतशास्त्र: टेबलावरील चेंडू घरंगळत कडेला आल्यानंतर चेंडू वर जाईल की खाली पडेल?
विद्यार्थ्याचे उत्तर: वर जाईल.
परीक्षकाची टिप्पणी: वर - खाली, उजवे - डावे या गोष्टी सापेक्ष असल्यामुळे सैद्धांतिकरित्या उत्तर बरोबर असू शकेल.
टेबलावरील चेंडू खाली पडून टप्पा घेतलेला चेंडू वर जाताना विद्यार्थ्यानी पाहिलेले असल्यास उत्तर बरोबर असेल.
विद्यार्थ्याचे डोके खाली व पाय वर या स्थितीत असताना पडणाऱ्या चेंडूचे निरीक्षण केल्यास चेंडू वर जाताना दिसेल.
निर्णय: स्वीकारार्ह

2.रसायनशास्त्र: या जगात सर्वात जास्त प्रमाणात कुठल्या पदार्थाचा वापर पिण्यासाठी होतो?
विद्यार्थ्याचे उत्तर: कोका कोला
परीक्षकाची टिप्पणी: विद्यार्थी हेच पेय नेहमी घेत असल्यामुळे त्याचे उत्तर प्रत्यक्ष अनुभवातून आलेले आहे. (Evidence based...) त्यामुळे तीच वस्तुस्थिती असावी. शिवाय कोकोकोलात पाण्याचे प्रमाण आहेच की.
निर्णय: स्वीकारार्ह

3.जीवशास्त्र: तुम्ही हाताच्या बोटाने लिहिता की पायाच्या बोटाने?
विद्यार्थ्याचे उत्तर: दोन्ही
परीक्षकाची टिप्पणी: याचे प्रत्यक्ष पुरावे प्रसार माध्यमात उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्याच्या उत्तरात चूक नसावी.
निर्णय: स्वीकारार्ह

4.गणित:बीजगणिताचा फायदा काय?
विद्यार्थ्याचे उत्तर: बीजगणित शेतात पेरून गणिताचे पीक घेता येईल
परीक्षकाची टिप्पणी: उत्स्फूर्तपणे दिलेल्या या उत्तरातून विद्यार्थ्याला शेतीचे ज्ञान आहे हे कळेल. त्यासाठी पूर्ण मार्क्स द्यावेत.
निर्णय: स्वीकारार्ह

5.इतिहास: भूतकाळ वा वर्तमानकाळातील कुठल्या व्यक्तीबद्दल आपल्याला अतीव आदर आहे?
विद्यार्थ्याचे उत्तर: वीरप्पन. तो खराखुरा फायटर होता.
परीक्षकाची टिप्पणी: हीरो म्हणून योग्य व्यक्तीची निवड केली आहे. त्याच्याकडे भरपूर काही शिकण्यासारखे होते.
निर्णय: स्वीकारार्ह

6.भूगोल: आपला जास्तीत जास्त वेळ कुठल्या ठिकाणी जातो?
विद्यार्थ्याचे उत्तर: मॉलमध्ये
परीक्षकाची टिप्पणी: विद्यार्थ्याच्या दृष्टीने एक अत्यंत प्रामाणिक व समर्पक उत्तर.
निर्णय: स्वीकारार्ह

7.साहित्य: तुमचा आवडता लेखक कोण व का?
विद्यार्थ्याचे उत्तर: माझा पाच वर्षाचा भाचा. तुम्ही आमच्या घराच्या भिंती बघाच. भिंत पूर्ण भरलेली आहे.
परीक्षकाची टिप्पणी: लेखक म्हणजे लिहिणारा या अर्थाने विद्यार्थ्याचा भाचासुद्धा लेखकच. विद्यार्थ्याने त्याच्या कला व साहित्य गुणाचे कौतुक केले आहे.
निर्णय: स्वीकारार्ह

--प्रभाकर नानावटी
(January 16, 2013)
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.03.2023-शुक्रवार.
=========================================