कुमार मराठी विश्वकोश-अंतर्गेही प्रदूषण (Indoor Pollution)

Started by Atul Kaviraje, March 05, 2023, 10:44:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "कुमार मराठी विश्वकोश"
                                -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अंतर्गेही प्रदूषण (Indoor Pollution).

                            "अंतर्गेही प्रदूषण (Indoor Pollution)"
                           ------------------------------------

                काही अंतर्गेही प्रदूषके--

     घर, कारखाना, दुकान, शाळा, कार्यालय इत्यादी वास्तूंमधील प्रदूषणास अंतर्गेही प्रदूषण म्हणतात. धूर, धूळ, मातीचे सूक्ष्मकण, सूक्ष्मजीव, बुरशी, पाळीव प्राण्यांचे केस, पिसवा, केरकचरा, सांडपाणी इ. प्रमुख प्रदूषके वास्तूत असतात. घरात स्वयंपाकासाठी पारंपारिक इंधनाचा वापर केल्यानेही अंतर्गेही प्रदूषण होते. जगातील ५०% पेक्षा अधिक घरात पारंपारिक इंधनाचा वापर केला जातो. त्यात प्रामुख्याने जळाऊ लाकूड, गोव-या, कोळसा, रॉकेल इत्यादींचा समावेश होतो. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाने धूर व दूषित वायू बाहेर पडतात. ते घरातील हवेत मिसळतात. या धूरात कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनॉक्साइड हे वायू असतात. काही घरांतून इंधन म्हणून वायूचा (एलपीजी) वापर केला जातो. या इंधन वायूच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, ओझोन इ. प्रदूषक वायू बाहेर पडतात. वास्तुबांधणी योग्य नसल्यास आणि वायुवीजनाचा अभाव असल्यास अपायकारक धूर, वाफ भिंतींमुळे अडविले घरातील हवा प्रदूषित होते. इमारतीच्या पायासाठी वापरलेल्या दगडांतून किंवा जमिनीच्या खालच्या थरात निसर्गतः रेडॉन व इतर वायू निर्माण होतात. हे वायू बंद इमारतीतील हवेत मिसळल्यास तेथील हवा प्रदूषित होते. घरात, शाळेत, कार्यालयात भित्तिपत्रकांना वापरलेला गोंद हवाबंद राहिल्याने निर्माण होणारे वायू, वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांपासून बनविलेले कृत्रिम गालिचे इत्यादींतून कार्बन मोनॉक्साइड आणि इतर वायू बाहेर पडून हवेत मिसळतात. धूम्रपानामुळे घातक धूर हवेत मिसळतात. धूम्रपान हेही अंतर्गेही प्रदूषणाचे एक कारण आहे.

     घरातील पर्यावरणीय प्रदूषण इतर वास्तूतील पर्यावरणीय प्रदूषणापेक्षा अधिक घातक व परिणामकारक असते. यामुळे घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे सर्दी, खोकला, दमा इ. फुप्फुसाचे, श्वसनमार्गाचे विकार होऊ शकतात. कर्करोग, हृदयरोग, आतड्याचा व्रण (अल्सर) असे रोग होण्याची शक्यता असते. घरातील प्रदूषित हवेमुळे थकवा येणे, डोळ्यात व घशात जळजळ होणे, डोके दुखणे, इ. विकार होतात.

     कारखान्यात निरनिराळ्या उत्पादनासाठी विषारी पदार्थ वापरले जातात. त्यांची योग्य काळजी न घेतल्यास तसेच टाकाऊ पदार्थ, कचरा यांची योग्य विल्हेवाट न लावल्यास कारखान्यातील पर्यावरण प्रदूषित होते. यंत्राच्या प्रचंड आवाजामुळे कारखान्यात अंतर्गेही ध्वनिप्रदूषणही होत असते.

     अंतर्गेही प्रदूषण टाळण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी. वास्तूचे बांधकाम हवेशीर, सूर्यप्रकाश पुरेसा मिळेल, असे असावे. इमारतीस योग्य अशी वायूवीजनाची सोय असावी. तसेच वास्तुभोवती, खिडक्यांजवळ झाडे लावावीत. वास्तू व परिसर स्वच्छ ठेवावा. स्वयंपाकगृहाच्या तळक्षेत्राच्या किमान २०% आकारमानाची खिडकी स्वयंपाकगृहास असावी. घरात जीवाश्म इंधनाचा वापर कमी करावा. प्रदूषण न होणा-या  इंधनाचा वापर करावा. त्यासाठी निर्धूर चुली, सौरचुली यांचा वापर करावा.

======================
अंतर्गेही प्रदूषण (Indoor Pollution)
Post published:26/08/2019
Post author:हिरालाल डोईफोडे
Post category:कुमार विश्वकोश /पर्यावरण
======================

--मराठी विश्वकोश
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.03.2023-रविवार.
=========================================