मायबोली-लेख क्रमांक-38- एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन

Started by Atul Kaviraje, March 08, 2023, 10:41:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                                   "मायबोली"
                                     लेख क्रमांक-38
                                    ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन"

                  एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन--
                 --------------------------------------------------

     रस्ता नसलेली महाराष्ट्रातील अनेक आदिवासी गावं आजही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. माची प्रबळ हे अशाच अनेक गावांपैकीच एक आदिवासी गाव, एका रस्त्याने आडलेल्या या गावातील लोकांच्या जगण्याचा मार्ग सरकार कधी सुकर करणार? हाच प्रश्न आदिवासी बांधवाना पडलेला आहे. प्रबळगडांच्या कुशीच्या पायथ्याशी असणारे हे गाव. हयाच प्रबळगडावर ब्रिटीश राजवटीत माथेरान विकसित करण्याचे ठरले होते परंतु पाण्या अभावी इग्रंजानी हा विचार मागे घेतला. आज अनेक योजना आदिवासी विकास साधण्यासाठी अस्तिवात आहेत, परंतु त्या खरच खऱ्या-खुऱ्या आदिवासी पर्यत पोहचतात का? याचे सरकारला देणे-घेणे नसते असेच म्हणावे लागेल. थोडक्यात आपल्या शासनकर्त्याना योजना बनवता येतात पण राबवता येत नाहीत हेच दिसून येते. सन २००६ च्या हिवाळी आधिवेशनात याच आदिवासी गावाला आदिवासी विभागातून रस्ता व पुल विकास कामासाठी ६३ लाख निधी मजूर झाला होता. सदर निधीचे वाटप बांधकाम विभागाकडे झाले होते. पुढे या निधीचे काय झाले या साठी माहितीच्या आधाराखाली माहिती मागितली असता सदर निधी मधून गाव ठाकुरवाडी ते गाव माची प्रबळ या दरम्यान रस्ता व पुल झाल्याची माहिती मिळाली.पण एक कटुसत्य की हा रस्ता आणि पुल फक्त बांधकाम विभागाच्या लेखी होते. प्रत्यक्षात ते काम झालेच नाही. मग प्रश्न निर्माण होतो की रस्ता गेला कुठे ? मग अशाच अनेक योजना कागदावर पुर्ण होतात. पण प्रत्येक्षात जातात कुठे ? याची जाणीव सरकारला कधी होणार कुणास ठाऊक?

     स्वातंत्र्याच्या ६६ वर्षापासून राज्यातील अनेक आदिवासी गावांना अजून रस्तेही पहायला मिळत नाही. यामुळे सरकार नावाची गोष्ट दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी गावापर्यत पोहचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यातील अशाच शेकडो दुदैवी गावापैकी असलेले ब्रिटिश राजवटीपासून हिल स्टेशन होण्यापासून वंचित राहिलेले माजी खाजदार श्री रामशेठ ठाकूर व आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल तालुक्यातील हे माची प्रबळ गाव.देशातील मुंबई, पुणे, ठाणे, नवीमुंबई,पनवेल, रसायनी या सारख्या महत्वाच्या शहरांच्या आवघ्या काही किलो मीटर आंतरावर असलेले हे गाव निसर्गाच्या आणि इतिहासाच्या कुशीत वसलेले गाव रस्ताविरहित आहे. गावात जायचे झाले तर डोंगर चढून कडया-कपाऱ्यातून वाट काढत जावे लागतं. खरं तर रस्त्याचे काय महत्व असते हे गावात गेल्याशिवाय इथल्या लोकांच्या वेदना ऐकल्या शिवाय कळत नाही. असं म्हणतात की एक रस्ता विकासाच्या अनेक वाटा गावात घेऊन येत असतो. पण इथल्या माणसांना विकासाच्या वाटांची स्वप्नच पडत नाहीत. त्यांना रस्ता हवाय तो रोजचं जगणं सुकर करण्यासाठी.गावातील गरोदर स्त्रिाया आजारी माणसे, शाळकरी मुले, तसेच वयस्कर माणसांना डोंगर उतरणे-चढणे शक्य होत नाही. परिणामी आजारी माणसांना वाहून नेण्यासाठी त्यांना जूनही डोलीचा आधार घ्यावा लागतो. उच डोंगर माथ्यावरुन खाच–खळग्यातून किलो मीटरची पायपिट करुन आलिवली प्राथमिक केंद्रात न्यावे लागते. त्यामुळे अनेकदा उपचार अभावी त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. याचा परिणाम काही वर्षापुर्वी कै.नामी गंधू वाघ या स्त्रीला सर्पदंश झाल्याने दुदैवी मरण आले .गावात चौथी पर्यत शाळा आहे. त्यासाठी दोन शिक्षक होते. परंतु मागील वर्षापासून एकाच शिक्षकाची शाळेवर हजेरी लागते. ते रोज पनवेल (नेरा) ते ठाकुरवाडी पर्यत गाडीवर येतात. पुढे माची प्रबळ पर्यत चालत येतात. शिवाय पुढील शिक्षणासाठी गावातील मुलांना पायपिट करुन दुसऱ्या गावी जावे लागते. दुसऱ्या गावात शाळेत जाण्या-जाण्याचे अंतर 8 ते 10 किलोमीटर असल्याने शिक्षणाची वाट बंद पडलीय. जी अवस्था शिक्षणाची आहे तिच अवस्था आरोग्याची आणि रोजगाराची आहे. गावातील लोक व्यवसाय म्हणून भाजीपाला लावतात व वन विभागाच्या जमिनीवर नाचणी, वरई करतात. तसेच जंगलात करवंदे, तोरण, कुळीद, कडुकंद, चिकटी, रानकेळी अश्या अनेक रानभाज्या मोठया प्रमाणात उपलब्ध असून हा तो मोठया बाजारपेठेत रस्ता नसल्याने घेऊन जाता येत नाही. त्यामुळे होईल तेवढा भाजीपाला डोक्यावर घेऊन आजुबाजुच्या गावामध्ये फिरुन विकावा लागतो. शिवाय डोक्यार लाकडे घेऊन ती विकून त्या पैस्यावर उधर्निर्वह करावा लागतो. आदिवासी लोक हा व्यवसाय अनेक वर्षापर्यत अशाच पध्दतीने करत आले आहेत त्यामुळे त्यांच्या डोईवऱ्या संघर्षाच्या ओझ्याने जीवन अतिशय कठिण बनले आहे.

--निलेश (भाऊ) भुतांबरा
संस्थापक
(प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्था)
-----------------------------------------------

--निलेश भाऊ
(13 February, 2014)
-----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================