कुमार मराठी विश्वकोश-

Started by Atul Kaviraje, March 09, 2023, 10:52:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "कुमार मराठी विश्वकोश"
                                  -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे-अक्रोड (Walnut).

                                  "अक्रोड (Walnut)"
                                 --------------------

     अक्रोड या वृक्षाचे शास्त्रीय नाव जुग्लांस रेजिया आहे. हा वृक्ष जुग्लँडेसी कुलातील असून मूळचा इराणमधील आहे. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब  व उत्तर प्रदेश या राज्यांत याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. या पानझडी वृक्षाची उंची २५- ३५ मी. असून खोडाचा घेर ३-४ मी. असतो. फळांसाठी लागवड करताना उंची कमी ठेवून फांद्याचा प्रसार वाढवितात. पाने एकाआड एक व संयुक्त असतात. पर्णिका अखंड व सुवासिक असतात. फुले लहान व पिवळसर हिरव्या रंगाची असतात. नर फुले लांब व लोंबत्या बारीक कणिशावर, तर मादी फुले कणिशाच्या टोकाला असतात. फळ हे ५ सेंमी. व्यासाचे, हिरवे, लांबट गोलसर व पेरूएवढे असते. फळाचे कवच जाड व कठिण असते.मेवामिठाई व आइस्क्रीम यांमध्ये अक्रोडचे बी वापरतात. सुकामेवा व मुखशुद्धीसाठी याचे बी खातात. कच्च्या फळांपासून लोणची, मुरंबे, चटणी व सरबत बनवितात. हिरव्या सालीचा तेलात किंवा मद्यार्कात अर्क काढून व त्यात तुरटी घालून केसाचा कलप बनवितात. हिरवी साल मत्स्यविष आहे. पाने पौष्टिक, कृमिनाशक असून झाडाची साल व पाने पुरळ, इसब, गंडमाळा, उपदंश इत्यादींवर उपयुक्त असतात. फळ संधिवातावर उपयुक्त आहे. बियांचे तेल खाद्य असून ते चित्रकारांचे रंग व साबण यांकरिताही वापरतात. पेंड व पाने जनावरांना खाऊ घालतात. लाकूड मध्यम कठिण, जड व बळकट असल्यामुळे सजावटी सामान व अनेक सुबक वस्तूंकरिता वापरतात. १०० ग्रॅ. अक्रोड बियांमध्ये साधारण ६५ ग्रॅ. मेद तर १५ ग्रॅ. प्रथिने असतात. अक्रोडच्या उत्पादनात चीन हा जगातील अग्रेसर देश असून अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इराण व तुर्कस्तान हे इतर प्रमुख उत्पादक देश आहेत.

     अक्रोडाची फळे प्रतिऑक्सिडीकारकाने आणि ओमेगा-३ प्रकारच्या मेदाम्लाने समृद्ध असतात. अक्रोडामध्ये आर्जिनीन हे अ‍ॅमिनो आम्लही असते. त्यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साइडची निर्मिती होत असल्याने रक्तवाहिन्या लवचिक राहतात.

======================
अक्रोड (Walnut)
Post published:26/08/2019
Post author:नरेंद्र देशमुख
Post category:कुमार विश्वकोश / वनस्पती
======================

--मराठी विश्वकोश
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.03.2023-गुरुवार.
=========================================