कुमार मराठी विश्वकोश-अजगर (Python)

Started by Atul Kaviraje, March 10, 2023, 10:51:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "कुमार मराठी विश्वकोश"
                                 ----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अजगर (Python).

                                  "अजगर (Python)"
                                 --------------------

     अजगर हा उष्ण कटिबंधात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारत, सुमात्रा व जावा या प्रदेशात अधिक आढळते. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर अँनॅकाँडा म्हणून ओळखले जातात.

     पायथॉन रेटिक्युलेटस या सर्वात मोठ्या अजगराची लांबी १० मी. पर्यंत तर घेर २५ सेंमी. आढळला आहे. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात. प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ दोन पायांच्या अवशेषांची दोन नखे स्पष्टपणे दिसतात. आतल्या बाजूला या नखांना लागून पायांची घटलेली हाडेसुद्धा असतात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते.

     हा सर्प बोजड असला तरी भक्ष्य पकडताना तो कमालीची चपळाई दाखवतो. प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यास पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर  त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे अगर पाय यांचा अडसर होत नाही. इतर सर्पांप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते. अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात. जबड्याचा एकदा डावा भाग तर एकदा उजवा भाग आळीपाळीने पुढे सरकवत अजगर भक्ष्य गिळंकृत करतो. त्याच्या पोटात भक्ष्याची हाडेसुद्धा पचविली जातात. परिणामी अजगराच्या विष्ठेमध्ये फक्त केस, शिंगे किंवा पक्ष्यांची पिसे न पचलेल्या स्थितीत आढळतात. एकदा हरिणासारखे भक्ष्य खाल्ल्यानंतर अजगराला सहा महिन्यांपर्यंत पुन्हा शिकार करण्याची गरज भासत नाही.

     जानेवारी ते मार्च हा अजगरांचा मीलनकाळ असतो. त्यानंतर तीन महिन्यांनी अजगराची मादी ८ – १०० अंडी घालते. पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते. शरीराचे आकुंचन-प्रसरण करून ती आवश्यकतेनुसार अंड्यांसाठी ऊब निर्माण करते.

     मानवप्राणी अजगराचे नैसर्गिक भक्ष्य नाही. तो अजगराचा सर्वात प्रमुख शत्रू मात्र आहे. काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात. काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात. अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असते. म्हणूनच अजगराची चोरटी शिकार आणि त्याच्या कातड्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते.

     फार मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे अनेक भागांतील अजगर कमी झाले आहेत. भारत सरकारने अजगर पाळणे, मारणे अथवा त्याचे कातडे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी घातली आहे.

====================
अजगर (Python)
Post published:16/07/2019
Post author:शिवाप्पा किट्टद
Post category:कुमार विश्वकोश /प्राणी
====================

--मराठी विश्वकोश
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                    -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2023-शुक्रवार.
=========================================