मायबोली-लेख क्रमांक-41-अर्धा-दशक लहान बायको - भाग २

Started by Atul Kaviraje, March 11, 2023, 10:45:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मायबोली"
                                     लेख क्रमांक-41
                                    ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"अर्धा-दशक लहान बायको - भाग २"

                           अर्धा-दशक लहान बायको - भाग २--
                          -------------------------------

     आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे. आमच्या घरी टी.वी सर्वप्रथम आला तेव्हा ऐकलेली ... किंवा आपण म्हणू पाहिलेली ही गाणी आहेत.

     " आमच्याकडे टी.वी आला तेव्हा सुपरहिट मुकाबला वर हे गाणं सर्वप्रथम पाहिलं ", मी एका गाण्याबद्दल हिला सांगत होतो. हिला त्याचे फार काही वाटले नाही. जी गोष्ट गाण्यांची ती गोष्ट इतर बऱ्याच गोष्टींची! तिला 'मिले सूर मेरा तुम्हारा' किंवा 'बजे सरगम' असे जुने विडीयो लावले की कंटाळा येतो . मला कधी कधी जुन्या दूरदर्शनच्या जाहिराती बघायला आवडतात. त्याने मी मधूनच सायकल आणि स्कूटर रस्त्यावर फिरत असलेल्या माझ्या लहानपणात जातो. धारा, लिरिल, बोर्नविटा, डेअरी मिल्क, रस्ना, फेविकॉल, निरमा, अमूल हे आयुष्याचा भाग नव्हते झाले अशा माझ्या बालपणी डोकावतो. हिला त्याचे विशेष काही वाटत नाही. मी आणि माझी बहिण आमचा landline फोन वाजला की तो कोण पहिले उचलतोय ह्यासाठी शर्यत लावायचो हे तिला सांगितल्यावर आपला नवरा नक्कीच लहानपणी वेडा होता अशा नजरेने ती पाहते. Landline फोन नंतरचा कॉर्डलेस फोन किंवा पेजर वगेरे चा प्रवास तिने अनुभवलेला नसावा. कारण त्याबद्दल घरी कधी विषय निघाला तर ती त्यात सहभागी होत नाही. घरी कधी दूरदर्शनच्या सिरियलच्या आठवणी निघाल्या की ही काही मिनिटांमध्ये आतल्या खोलीत निघून जाते. हिच्या आठवणी ह्या ह्रितिक रोशन पासून सुरु होतात आणि बऱ्याचशा नंतरच्या हिरो-हिरोइन्स पर्यंत येउन पोहोचतात. हिला श्रीमान-श्रीमती मध्ये रस नाही पण फ्रेंड्स मध्ये आहे. ज्या गोष्टी मला कॉलेज संपताना मिळाल्या त्या तिच्याकडे दहावीतच आल्याचे माझ्या लक्षात येत होते. ह्या साऱ्या यादीत इंटरनेट, फेसबुक आणि मोबाईल फोन ह्याचा देखील समावेश होता. तिने सायबर कॅफेचा उपयोग केवळ प्रिंट काढायला केला होत. तिला कळायला लागणाऱ्या वेळेत तिच्याकडे कॉम्पुटर आणि इंटरनेट हे दोन्हीही आले होते. त्यामुळे जुन्या टी.वी विडीयो गेम्स बद्दल बोललं तर तिला काही कळायचं नाही. पण तिला कॉम्पुटर गेम्स बद्दल सगळी माहिती होती. एकूणच असं की हे सगळं तिच्याकडे एकदम आलं होतं. माझ्यासारखी ती कोणत्याही प्रक्रियेला सामोरी गेली नव्हती.

     तिला खेळाची देखील आवड होती. पण तिचे फेडरर-प्रेम हे साम्प्रासला न बघता निर्माण झाले होते आणि सचिन तेंडुलकरची शेवटची दहा वर्ष तिने पाहिल्यामुळे तो निवृत्त झाला तरी तिचे आयुष्य सुरळीत सुरु होते.

--आशय गुणे
(2 October, 2015)
--------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.03.2023-शनिवार.
=========================================