मायबोली-लेख क्रमांक-43-अर्धा-दशक लहान बायको - भाग २

Started by Atul Kaviraje, March 13, 2023, 10:45:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मायबोली"
                                     लेख क्रमांक-43
                                    ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"अर्धा-दशक लहान बायको - भाग २"

                          अर्धा-दशक लहान बायको - भाग २--
                         -------------------------------

     " अरे ... मी तुला poke केलंय हं ... घरी गेल्यावर मला परत कर"
आता जाणवतं की ही देखील त्या वेळेस नववी-दहावीतच तर होती! मग वाटलं की फेसबुकची मूळ संकल्पना ह्या मुलांना समजली आहे का? फेसबुक किंवा एकंदर सगळ्याच प्रकारचा सोशल मिडिया हा संपर्क तुटलेल्या मित्र-मैत्रिणींशी पुन्हा संपर्कात येण्याचं साधन आहे हे त्याचे भारतातले विश्लेषण झाले. पण ह्याचा मूळ हेतू 'नेटवर्किंग' हा आहे. आपल्यात ज्या विशेष आवडी-निवडी आहेत आणि ज्या कालांतराने आपल्या स्वभावात प्रवेश करतात त्या आवडी-निवडी आपल्या पारंपारिक मित्र-वर्तुळात असतीलच असं नाही. सोशल मिडिया मात्र तसे वर्तुळ जमवतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक खुलवतो. फेसबुक हे आपण नेहमीच भेटतो त्या मित्र-मैत्रिणींबरोबर फोटो काढायची जागा नाही. फेसबुक काय WhatsApp आणि गेला बाजार 'एसएमएस' ह्या माध्यमांची सुद्धा आपण अशीच भेसळ केली! ह्या दोन्हींचा वापर रोजचे महत्वाचे संदेश पाठवणे हा आहे. त्यात आपण मोठ्ठाले निबंध पाठवून त्याचा वेगळाच उपयोग केला. मी वय वर्ष ४० आणि पुढे असलेल्या लोकांबद्दल एकवेळ समजू शकतो. कारण हे सारं त्यांच्या आयुष्यात एकदम आलं. काहींच्या तर उतारवयात! परंतु तंत्रज्ञाना बरोबर वाढणाऱ्या वयोगटाकडून असे निश्चित अपेक्षित नाही. त्यामुळे ही ऑफिस मध्ये गेल्यावर तिच्या तिथल्या मैत्रिणी बरोबर कॉफी पिताना फोटो काढून फेसबुकवर का टाकते माहिती नाही! रक्षाबंधन किंवा भाऊबीज साजरी झाल्यावर स्वतःच्या भावाला फेसबुक वर tag करायची विशेष गरज आहे का? ' मला हा दागिना खूप आवडला ... त्यामुळे तू मला तो घेऊन दे' अशा एका वाक्यात हिने मला tag केलेलं! गम्मत म्हणजे तसा विषय त्या दिवसानंतर एकदाही आमच्या घरी चर्चेत आलेला नाही. मग एकदा लग्न होऊन दोन महिने झाले म्हणून एका स्टेटस मध्ये मी होतो. तोच मी बाहेर जेवायला गेलो की पण असायचो. म्हणजे तिच्या बरोबर तर असायचो पण ती फेसबुक वर एकटी पडू नये न ...म्हणून तिकडे पण बरोबर असायचो! हल्ली मॉल मध्ये गेलो की मध्येच एके ठिकाणी सेल्फी साठी उभं रहावं लागतं. कधी मध्येच 'माझा फोटो काढ ना' ची फर्माइश होते आणि मग एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला ती आणि मधून जाणारी माणसं असं चित्र होतं! काही लोकं सौजन्य दाखवतात आणि फोटो होऊ देतात आणि आपल्याला आणखी खजील करतात. आणि मी विचार करू लागतो की ह्या फोटोंचे पुढे होते काय? म्हणजे एकदा असंच मॉल मध्ये काढलेल्या फोटोबद्दल मी हिला विचारलं. तर तेव्हा समजलं की तो फोटो जुन्या फोन मध्ये होता आणि आता तो फोन एकदम खराब झाल्यामुळे सापडणं कठीण आहे. मग हे फोटो काढले कशाला होते? त्याचा काही विशिष्ट अल्बम बनवला गेला का? फोटो ही एक आठवण की एक क्षणिक सोय? ह्या आणि अशा बऱ्याच प्रश्नांना मी सामोरे जात असतो. उत्तर सापडणं अवघड आहे.

--आशय गुणे
(2 October, 2015)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                    ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2023-सोमवार.
=========================================